सुशांत..


आज दुपारनंतर सगळीकडे सुशांत सिंग राजपूत ह्या अभिनेत्याने आत्महत्या केल्याची बातमी आली आणि सगळीकडे एकच हळहळ पसरली. कमी वयात एका विशिष्ट उंचीवर पोहोचलेला अभिनेता. सगळं छान चालू असतांना त्याच अचानक सोडून जाण त्याच्या परिवाराला, त्याच्या चाहत्यांना लागून गेलं.

सुशांत हा मेकॅनिकल इंजीनिअर शिक्षण असलेला, इंजिनिअरिंगच्या AIEEE परीक्षेत देशात सातवा असणारा, फिजिक्स ऑलंम्पियाड मिळवलेला हुशार व्यक्ती. शिक्षणात वेगळी उंची गाठल्यानंतर अभिनयात येण्याची इच्छा असल्यामुळे तो बिहारच्या पटण्याहून मुंबईत पोहोचला. सुरवातीला सहायक डान्सर म्हणून काम केलं. त्यानंतर छोट्या पडद्यावर येत टीव्ही सिरीयल 'पवित्र रिश्ता' मध्ये एक प्रेक्षणीय भूमिका बजावली. त्यानंतर त्याचा मोठ्या पडद्यावरचा प्रवास चालू झाला. त्याला स्वतःला सुद्धा वाटलं नसेल इतका छान त्याचा हा प्रवास चालू झाला होता आणि थोड्या कालावधीत तो यशाच्या शिखरावर येऊन पोहोचला होता. ह्या यशाच्या शिखरावरून तो आज घसरला आणि जगापलीकडच्या खाईत जाऊन विसावला.. कुठलीही अभिनयाची पार्श्वभूमी नसलेल्या माणूस मेहनतीच्या जोरावर इतक्या उंचीवर येतो आणि त्या उंचीवर त्याला कुणाची तरी नजर लागते आणि तो अचानक कायमचा पडद्याआड होतो..

शिक्षण, परिवार, व्यवसाय आणि इतर सर्व क्षेत्रात यशस्वी असलेला अभिनेता. अनेकांची इच्छा असलेल्या अभिनय क्षेत्रात चांगली प्रगती करणारा अभिनेता. माणूस म्हणून अप्रतिम असणारा अभिनेता. सगळं व्यवस्थित असतांना आयुष्यात आत्महत्येचं पाऊल टाकून अनेक प्रश्नांना उपस्थित करून जाण हे मात्र चुकीचं करणारा माणूस.

माणसाच्या आयुष्यात यश असेल पण समाधान नसेल तर त्याला महत्व नाही. पैसा माणसाला संपत्तीने मोठं करतो पण त्याबरोबर मनानेही मोठं होणं महत्वाचं आहे. आयुष्यात मोठं होतांना आपले मित्र बरोबर असणं तितकच महत्वाचं असतं. कोणी समजून घेणार असेल तर त्याच्या जवळ व्यक्त होता येत आणि ती व्यक्ती नेहमी जवळ असायला हवी. हे सगळं असावं म्हणजे आत्महत्येसारखा विचार कुठेतरी थांबू शकतो.

नावात शांत असणारा सुसंस्कृत असणारा सुशांत अचानक शांत झाला. चंदेरी दुनियेत यशाच्या उंचीवर उचललेलं हे टोकाचं पाऊल चुकीचंच आहे. तू ह्यातून बाहेर पडला असता तर तुझ्या छिचोरे सिनेमाचं तुझं वक्तव्य आज आत्महत्या करणाऱ्या अनेकांना रोखू शकलं असतं. पण आता त्यावर तूच शंका उपस्थित करून गेलास. तू चुकलास मित्रा.. तू गेलास पण तुझं छिचोरे सिनेमाच वक्तव्य नेहमीच अबाधित राहो आणि अनेकांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी उपयोगी पडो.. "तुम्हारा रिझल्ट डिसाईड नही करता है की तुम लुजर हो कि नही.. तुम्हारी कोशिश डिसाईड करती है..."

डॉ. प्रशांत शिरोडे.

मी मुंबई...


संकट आणि मी जणू एकमेकांचे मित्रच झाले आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यावर कधी आतंकवाद्यांचं तर कधी बेसुमार गर्दीच तर कधी निसर्गाचं संकट येतंच आहे. कुठलंही संकट असलं तरी मी लगेच सावरते. पण सध्या आलेलं कोरोनाच संकट माझ्याभोवती विळखा घालून बसलय. त्यातून मला नेहमीसारखं लगेच सावरता येत नसताना मला चक्रीवादळाने ग्रासलं. सगळी संकट जणू माझ्यावर डोळा ठेवून आहेत, मग ते दुसऱ्या राज्यातले राजकारणी माझा आर्थिक कणा निकामी करण्यासाठी असो वा निसर्गाचा कोप असो. ह्या सर्व संकटांमध्येही मी माझा स्वाभिमानाचा कणा मात्र ताठ ठेवलाय. तुम्हाला समजलंच असेल मी मुंबई बोलतेय.. तुमची स्वप्नांची नगरी, तुमच्या स्वप्नातील नगरी..

मला आजपर्यंतच्या संकटांच कधीच दुःख झालं नाही इतकं कोरोनाच्या ह्या संकटात झालं. त्याच कारणही तसंच माझी जीवनवाहिनी "मुंबई लोकल" जी थांबली आहे आणि ती कधीच इतक्या काळासाठी थांबली नव्हती. कोरोनाच्या संकटात माझी जीवनवाहिनी थांबली आणि माझा श्वासच गुदमरल्यासारखं होतंय. हि लोकलची गती थांबल्यामुळे माझ्यातील संकटानंतर पुन्हा जोमाने उभं राहण्याची ऊर्जा जणू कमीच झाल्यासारख मला जाणवत. ह्यादरम्यान अजून एका गोष्टीच मला वाईट वाटलं, माझ्या संकटाच्या काळात परप्रांतातून आलेला माणूस मला सोडून गेला. ज्याच्यावर मी माझ्या भूमिपुत्रांसारखं प्रेम केलं होत. माझ्या लेकरांवर, माझ्या मुंबईकरांवर ह्या कोरोनाचे आघात पाहून माझं मन हेलावलं. ह्या संकटाला तोंड देत असतांना कालच्या चक्रीवादळाचा तडाखा बसल्यावर मलाच माझा प्रश्न पडला कि अजून किती संकट अंगावर घ्यावी लागतील?

गेल्या तीन महिन्यापासून माझा मुंबईकर किती शांतपणे घरात बसला. त्याच्यातील घड्याळाच्या काट्यांसारखी धावपळीची चक्रे थाबंलीत. पोटासाठी धावणारा मुंबईकर जीवासाठी घरात थांबला. ह्या संकटात सगळीकडे एकच चर्चा आहे कि मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाला, पण कोणीही त्यामागची कारण समजून घेतली नाही. सर्वात जास्त परदेशातून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या माझ्याच विमानतळावरून होते आणि ह्या परदेशातून आलेल्या लोकांमुळे मी कोरोनाला जास्त प्रमाणात बळी पडले. पुढे दाट वस्तीत राहणाऱ्या मुंबईकरांपर्यंत हे संकट पोहचलं आणि ते वाढतच गेलं. माझी काही लेकर ह्याही स्थितीत आपलं कर्तव्य निभावताना आणि दुसऱ्याची मदत करतांना पाहून माझं मन लगेच भरून येत. मला स्वच्छ ठेवण्यासाठी माझे सफाई कामगार रोजच कामावर येतांना पाहून मला त्यांच्या जीवाची काळजी खूप वाटतेय. माझं आरोग्य ठीक रहावं म्हणून माझ्या मुंबईकरांसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आरोग्यसेवकांचं मला मनापासून कौतुक करावस वाटत.

माझ्यातील सहनशीलता अजूनही जिवंत आहे. मी संकटांशी दोन हात करण्यास नेहमीसारखी सज्ज आहे आणि ह्याही संकटाला मी नक्की हरवणार ह्याचा मला आत्मविश्वास आहे. माझा मुंबईकर सुरक्षित रहावा म्हणून मी त्याच्यासाठी लवकर ह्या संकटातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या गणरायाचा उत्सव मला साजरा करायचा आहे आणि त्यासाठी मला ह्या संकटाला लवकर हरवायचंय. अनेकांचे स्वप्न माझ्याकडून पूर्ण व्हायचे बाकी आहेत त्यासाठी मला माझ्यातली ऊर्जा तेवत ठेवावी लागणार आहे. माझा मुंबईकर स्वतःची काळजी घेईल आणि दुसऱ्याचीही घेईल...आणि तीच माझी काळजी घेतल्यासारखं माझ्यासाठी असेल.

चला तर मग सुरक्षित राहून ह्या संकटातून लवकर मुक्त होऊ.. मी नेहमीसारखी तुमच्यासोबत असेलच..

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...