..आणि महाराज.



४०० वर्षानंतरही मनात तीच आत्मीयता, तोच स्वाभिमान, तीच राष्ट्रनिष्ठा, तेच स्वराज्य प्रेम.. हे वैभव इतिहासात लाभलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना.. महाराजांचं व्यक्तिमत्व त्या काळात किती कर्तृत्वान, प्रभावी आणि दैदिप्यमान असेल जे आजच्या काळात सुद्धा भावून जात.

आज महाराजांवर लिहावंसं वाटलं कारण पण तसंच. काल महाराजांची वेशभूषा करण्याचं भाग्य अजून एकदा नशिबात आलं. महाराजांची वेशभूषा करणं म्हणजे एक जबाबदारी, एक आत्मसन्मान, एक वेगळंच कुतुहूल. स्वराज्यप्रेम आणि स्वराज्यनिष्ठा त्या काळात अनुभवायला भेटली असेल किंवा नसेल पण त्या गोष्टींचा अनुभव ह्या भूमिकेतून अनुभवायला भेटलं. महाराजांचा वेश चढवताना सुद्धा तो पाय पडून चढवला जातो. प्रत्येक गोष्टीत वेशभूषाकार आपलं कलेचं सर्वस्व लावून देतो. मावळ्यांच्या भूमिकेत असणारे आपल्या राजाच्या श्रद्धेपायी स्वतःला त्या भूमिकेतून दाद देताना दिसतात. आणि राहील रसिक मायबापाच, ते तर आपली मराठमोळी अस्मिता आणि त्यात महाराज म्हणजे डोक्यावरच घेतात. तो रसिकांच्या चेहऱ्यावरचा भाव जणू राजदरबाराचा निष्टेचा सहवास दिसत होता. आणि नेहमीप्रमाणे महाराजांच्या भूमिकेला प्रत्क्षात उतरवणं म्हणजे जणू सौभाग्यापेक्षा काही कमी नाही. हे सौभाग्य लाभलं आणि रंगमंचाकडे जाताना स्वतः महाराजच वेशभूषेत सामावून गेलेत आणि पुढे काय झालं ती श्रींची इच्छा होती.

महाराज साकारताना जबाबदारी निभावून नेल्यानंतर जो आनंद असतो तो शब्दात व्यक्त करता येत नाही. त्या वेशभूषेची किमया काही निराळीच आहे. महाराजांवरची गाणी, सर्वांची वेशभूषा आणि रसिकांचा प्रतिसाद मराठी अस्मितेच्या मानबिंदूला जणू प्रत्यक्षात साकारत होती. सगळं सगळं अभूतपूर्व होत...

महाराजांची वेशभूषा नेहमी करायला भेटो, महाराजांच्या संस्कारांचा वारसा नेहमी प्रज्वलित राहो हीच मनोभावे इच्छा. हिंदुस्थानातील जनतेला खरं आणि पहिलं प्रजासत्ताक देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना प्रजासत्ताक दिनी मानाचा मुजरा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

स्वराज्यरक्षक संभाजी..


महाराष्ट्रासह जगाला शिवाजी महाराज जितके माहित झाले तितके संभाजी महाराज माहित नसल्याचं दुःख मनात कुठंतरी खटकत. अलीकडेच झी वाहिनीवरील डॉ. अमोल कोल्हे दिग्दर्शित "स्वराज्यरक्षक संभाजी" ह्या मालिकेने संभाजी महाराजांचा इतिहास जगाच्या हृदयात बसवण्याचा खूप मोठा प्रयत्न करतायेत आणि त्याला प्रेक्षकवर्गही तितकी दाद देताना दिसत आहेत. सरनौबत हंबीरमामा मोहितेंपासून ते अनेक स्वराज्य शिलेदार ह्या मालिकेतून जनमाणसांना समजताना दिसत आहेत.

आजपर्यंत संभाजी महाराजांवर अनेक नाटक, चित्रपट झालीत पण ह्यातून खऱ्या इतिहासाला कुठं तरी कात्री लावून, युवराज संभाजी राजांना बदनामीच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जन्मापासून ते मरेपर्यंत छोट्यामोठ्या अनेक अवहेलना भोगत असताना स्वराज्य आत्मसात करून स्वराज्यरक्षण करणारा राजा काळाच्या ओघात इतिहासाने समजूनच घेतला नाही.

जिजाऊंच्या छायाछ्त्राखाली वाढलेलं स्वराज्याचे दुसरे छत्रपती लहानपणापासूनच आपली लीलया दाखवत होते. वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषणं नावाचा ग्रंथ लिहून तत्कालीन ज्ञानपंडितांना अवाक करणारे संभाजी राजांनी अजून दोन ग्रंथ लिहिलीत. इंग्रजी, उर्दू, डच सारख्या १४ भाषा येणारे भाषा पंडित संभाजी राजे. युद्धशास्रातील सर्व विद्या अल्पवयात पारंगत करून सुरतेवर स्वतःच्या हिमतीवर चाल करणारे युवराज संभाजी. योग्य न्यायनिवाडा करून कायद्यातील तरतुदींना योग्यवेळी अधोरेखित करून तत्कालीन कायदेपंडितांना विचारात पडणारे राजे संभाजी. लहान वयात जयसिंगराजांना बुद्धिबळात बुद्धिचातुर्य दाखवणारा बुद्धिमान राजा संभाजी. औरंगजेबाला त्याच्या दरबारात प्रतिउत्तर देऊन आपल्या राजपणाचा ठसा उमटवणारे सुज्ञ संभाजी राजे. जगाच्या पाठीवर एकही लढाई न हारता, स्वधर्माचं पालन करताना, छत्रपती शिवरायांचा पुत्र असल्याचं शौर्य असणारा राजा मरणाला सुद्धा हसत हसत हरवून गेला...

संभाजी महाराज उभ्या महाराष्ट्राला आणि जगाला समजायचा असेल तर स्वराज्यरक्षक संभाजी हि मालिका नक्कीच पाहावी आणि आपल्या मराठीपणाची खरी ओळख करून घ्यावी. अशा शूर राजाचा, स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा राज्यभिषेकाचा आजचा दिवस..

डॉ. प्रशांत शिरोडे ..

स्वराज्य रणरागिणी....


स्वराज्य ह्या आपुलकीच्या स्वप्नाला प्रत्यक्षात भूपटलावर साकारणाऱ्या स्वराज्य निर्मात्या राजमाता जिजाऊ..

सह्याद्रीच्या छातडावर सगळीकडे अत्याचाराचा काहूर माजला होता. गणिमीन माणुसकीच कावड लावून घेतलं होत. आयाबहिणी जगण्याचे दिवस मोजत होत्या. गुलामगिरी राजाश्रय घेत होती. स्वाभिमान हैवानांच्या बाजारात हरवला होता. धर्म, संस्कृती आणि संस्कार पोरकी झाली होती. अन्याय, अधर्म आणि अपमान जणू उगवत्या दिवसाचा दिनक्रम झाला होता.. साधुसंतानचा पराक्रमाचा इतिहास जणू वाहत्या पाण्याबरोबर वाहून गेला होता. आपुलकी, स्नेहभाव आणि शिष्टाचार जणू वाऱ्याबरोबर हवेत दिशाहीन झाला होता.. सगळं सगळं काही अघटित घडत होत.

सह्याद्रीला मोकळ्या श्वासाची, माणुसकीला माणूसपणाची, आयाबहिणींना जगण्याची, गुलामगिरीच्या अस्ताची, स्वाभीमाच्या अभिमानाची, धर्म, संस्कृती आणि संस्कार रक्षणाची, आपुलकी, स्नेहभाव आणि शिष्टाचार जपण्याची, साधुसंत शूर पराक्रमाची यशोगाथा उजळण्याची... ह्या सगळ्या सगळ्यांना आस लागली होती स्वातंत्र्याची.. ह्याच स्वातंत्र्याची आस जिजाऊंच्या मनाला कासावीस करत होती.. जिजाऊंना हे सगळं बघवलं जात नव्हतं .. दिवसामागून दिवस जात असताना जिजाऊंच्या मनात एक अस्तित्व उभं राहील आणि ते म्हणजे स्वराज्य... आणि ह्या स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी जिजाऊंनी घडवलं एक छत्रपती शिवाजी महाराज नावाचं रामराज्य...

हे स्वराज्य जन्माला घालण्यासाठी जिजाऊंनी काय केलं हे सर्वात महत्वाचं... ह्या स्वराज्यासाठी स्वराज्यप्रमुख जन्माला घातले. नुसते जन्माला नाही घातले तर त्यांना संस्कारांची विचारगाथा मनात रुजवली. अगदी बाळ पोटात असताना रामायण आणि गीतेतून धर्म आणि माणुसकी संरक्षण संस्कार, बाळ जन्माला आल्यावर साधुसंतांच्या संस्कृतीचे संस्कार, बाळ रेंगाळू लागल्यावर इतिहासाच्या पराक्रमाचे संस्कार, बाळ चालू लागल्यावर मैत्रीतल्या प्रेमभावनेचे संस्कार, बाळा पळू लागल्यावर सह्याद्रीच्या यशोगाथेचे संस्कार, बाळ समजू लागल्यावर रणांगणातील शस्राचे संस्कार, बाळ वयात आल्यावर सर्वभूत राजकारणाचे संस्कार, आणि बाळ पराक्रमी झाल्यावर राज्याभिषेकाचे संस्कार.. हे सगळे सगळे संस्कार जिजाऊंनी दिले आणि स्वराज्य प्रत्यक्षात जन्माला आले..

शिवाजी राजांना संस्कारानी घडवणाऱ्या, संभाजी महाराजांना शास्त्रपंडित पराक्रमी घडवणाऱ्या, जनतेला न्यायाच आणि स्वाभिमानाच स्वराज्य देणाऱ्या, साधुसंताना आणि संस्कृतीला उभारी देणाऱ्या, सह्याद्रीला स्वाभिमानाचा ताठ कणा देणाऱ्या राजमाता जिजाऊंना जन्मदिनी मानाचा मुजरा..

जय जिजाऊ.. जय शिवराय..

जय हिंद.. जय महाराष्ट्र..

डॉ. प्रशांत शिरोडे..

साहित्य अन संमेलन...



मराठी भाषा... जगाच्या पाठीवरची एकमेव भाषा, ज्या भाषेचं गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य संमेलन आयोजित केलं जात. ह्या वर्षी ९२ व  मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे जेष्ठ साहित्यिक "अरुणा ढेरे" ह्यांच्या अध्येक्षतेखाली पार पडणार आहे. १८७८ मध्ये पहिले मराठी साहित्य संमेलन "न्यायमूर्ती रानडे" ह्यांच्या अध्येक्षतेखाली पुण्यात झालं. मराठी भाषेची हि साहित्य संमेलन गोवा, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि पंजाब सारख्या इतर राज्यातील मराठी संस्कृतीशी निगडित असलेल्या शहरात झालीत.

साहित्य म्हणजे भाषेचं वैभवच ज्यात लेखक, कवी, संगीत, संस्कृती आणि कला ह्यांचा समावेश असतो. ह्या सर्व गोष्टींचा सन्मान जिथे होतो त्याला साहित्य संमेलन म्हणावं लागेल. साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणाला एक वेगळच महत्व असत ज्यातून साहित्याचं, सामन्याच्या मनातलं आणि चालू घडामोडींवर भाष्य केलं जात. अध्यक्षीय भाषणाची दखल सरकारी दरबारातही घ्यावी लागते.

ह्या वर्षीच मराठी साहित्य संमेलन नेहमीसारख वादाच्या भोवऱ्यात सापडलं. जणू साहित्य संमेलन हे कुठल्यातरी वादाशिवीय चालूच होत नाही, हे जणू समीकरणच झालंय. राजकीय वादात तर कुठलीही गोष्ट सापडते आणि ह्या वेळेचं संमेलनही त्याचाच एक भाग झालं. एका इंग्रजी साहित्यिकाला प्रमुख पाहुणे बोलवून, राजकीय द्वेषापोटी त्याची उपस्थिती न राहण्यासाठी नाट्य घडवून आणण्यात आलं. ह्या घटनेनंतर सर्व साहित्यिकांना, लेखकांना जणू बळच आलं. एरवी शेतकऱ्यांची आत्महत्या, सरकारची कामाची पद्धत ह्या विषयात आपली लेखणी बाजूला ठेवणारे जणू कादंबरी लिहतात कि काय? अशी परिस्थती झाली.

असो, आजच चालू होणार अधिवेशन हे ९२ वर्षात पाचव्या अध्यक्षीय महिलेच्या म्हणजेच अरुणा ढेरे च्या मार्गदर्शनाखाली पार पडतंय. हि मराठी साहित्य आविष्काराची यशोगाथा अशीच चालू राहो ह्याच शुभेच्छा.

डॉ. प्रशांत शिरोडे.

नवसंकल्पवर्ष



हे वर्ष किती लवकर संपलं ना? साहजिकच एक वर्ष संपत असताना दुसऱ्या वर्षी नेहमी येणारा सामान्य प्रश्न? कधी चर्चा इंग्रजी नवीन वर्षाची तर कधी मराठी नवीन वर्षाची.. कधी दिवाळीतील नवीन वर्ष तर कधी धर्माच्या रितीनुसार नवीन वर्ष.. इंग्रजांच्या सानिध्यानंतर आणि जागतिक गरजेनुसार इंग्रजी नवीन वर्षाला थोडं जास्त महत्व प्राप्त झालं.

नवीन वर्ष नेहमी काहीतरी नवीन करण्याच्या उमेदीने उगवत. नवीन संकल्पना, नवीन स्वप्न, नवीन स्पर्धा, नवीन लक्ष.. सगळं काही नवीन नवीन मनात येत आणि नावीन्याला किती प्रमाणात सत्यात उतरवायचं हे व्यक्तिपर अवलंबून असत. जुन्या थांबलेल्या गोष्टींना पुढे नेण्याचा संकल्प सुद्धा नवीन सुरवातच असू शकतो.

आता तर बातमी पण वाचायला भेटते कि १ जानेवारीला जिमला व्यायामाला येणाऱ्यांची संख्या खूप असते आणि आठ दिवसात ती पुन्हा आहे तीच होते. म्हणजे व्यायामाचं स्वप्न नवीन वर्षापुरते असते आणि हळू हळू ते कमी होते. संकल्प करायचा तर तो पूर्णत्वाला न्यायचाच असतो आणि तो ध्येय ठेवून वेळात पूर्ण केला तर नक्कीच नवीन वर्षाचं नावीन्य संकल्पपूर्तीनंतर पुन्हा जाणवत.

२०१८ ला अलविदा करताना २०१९ च नवीन ३६५ पानाचं पुस्तक चांगल्या गोष्टींनी लिहलं जावो ह्याच सद्धीच्छा. हे वर्ष नवीन संकल्पनांबरोबर, गावापासून देशापर्यंत आणि देशापासून विश्वापर्यंत सुखाचं जावो. नवीन कल्पना, नवीन स्वप्न, नवीन ध्येय आणि सर्व नवीन प्रत्यक्षात येवो ह्याच हृदयापासून शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे..

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...