मराठी रंगभूमी... कडक..



कडक.. शब्द थोडा वेगळा वाटला ना.. हो वेगळाच आहे त्याच असं कि ह्या आठवड्यात दोन मराठी चित्रपटांनी हिंदी चित्रपटांना तिकीट खिडकीवर चांगलंच खाली खेचल, त्याच एका चित्रपटातील हा मुख्यशब्द. ज्या चित्रपटगृहांना नेहमी मराठीच वावडं असत त्या चित्रपटगृहांनी "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" आणि "नाळ" ह्या दोन मराठी चित्रपटांना जास्त शो देऊन हिंदीतले बादशाह अमिताभ बच्चन आणि अमीर खान यांची भूमिका असलेला "ठग्ज ऑफ हिंदुस्थान" ह्या चित्रपटाचे शो कमी केलेत. आकडे सांगायचे झाले तर ठग्ज ऑफ हिंदुस्थान १३३३ च्या शो वरून १५० शो केलेत आणि नाळ चे ३०० वरण ४०० शो केले त्याबरोबर आणि डॉ.काशिनाथ घाणेकरचे १७७ वरण ३१० शो केलेत.

मराठी रंगभूमीचे सध्याचे चित्रपट काही वेगळेच आहेत. श्वास चित्रपटापासून ते मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, सैराट, नटसम्राट सारख्या एकाहून एक अभूतपूर्व चित्रपटांची हि यशस्वी शृंखला "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" आणि "नाळ" ह्या जबरदस्त चित्रपटांपर्यंत येऊन पोहचली. ह्या दोन्ही चित्रपटांनी जणू मराठी रसिकवर्गाला पुन्हा तिकीट खिडकीवर खेचून हिंदी चित्रपटांना नुसत मागे टाकलं नाही तर अमराठी प्रेक्षकांनाही आपल्या कलेच्या मोहात ओढलं. खरं तर मराठी चित्रपट हे मुद्देसूद आणि एक योग्य कथानकाला जोडून असतात पण हिंदीच्या वर्चस्वापुढे कुठे तरी कमी पडतात. असो पण आता दिवस बदलतायेत.

"आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" ह्या चित्रपटात मराठी नव्हे तर साऱ्या चित्रपट श्रुष्टीवर अदभूत लाभेलला एक कलाकार ज्याने ह्या भूमीवर कलेचा वेगळा अविष्कार पहिल्यांदा दाखवला. मराठी रंगभूमीला पहिली टाळी, पहिली शिट्टी मिळवून देणारा आणि मुख्य कलाकाराच नाव शेवटी सांगण्याची प्रथा देणारा कलाकार म्हणजे डॉ. काशिनाथ घाणेकर. ह्या महान कलाकाराच्या भूमिकेला तितकीच कडक दाद देणारा सुबोध भावे मनाला खूप भावून जातो.

"नाळ" ह्या चित्रपटातून रसिकप्रेक्षकांना भावुक करणारी एक वेगळी निर्मिती समोर आणली आहे. ८ वर्षाच्या श्रीनिवास पोखळे च्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमीच. एका लहान मुलाने प्रेक्षकांच्या नजरा शेवटपर्यंत टिकवून, चित्रपटातील भूमिकेला पूर्ण न्याय देताना उत्तम कथानकातून रसिकप्रेक्षकांच्या डोळ्यातील अश्रुना वाट मोकळी करून देतो.

मराठी रंगभूमीची यशस्वी शृंखलेची हि "नाळ" अशीच टिकून राहो आणि रसिकप्रेक्षकांना एकसे बढकर एक चित्रपट भेटीला येवो ह्याच "कडक" सद्धीच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

सरसेनापती मराठीमनाचा ..


महाराष्ट्राच्या मातृभूमीने अनेक संतांना, वीरपुरषांना, स्वातंत्र्यसैनिकांना, शूरवीरांना, सैनिकांना आणि शास्त्रज्ञाना जन्म दिला. ह्या पावन भूमीची शौर्याची यशोगाथा अगणित आणि अविभूतीत आहे. हिमालयाला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा हा सह्याद्री हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. ह्या मराठमोळ्या भूमीने जन्म दिला संत तुकारामांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना, ज्योतिबा फुलेंना आणि ह्याच शृंखलेत जन्म दिला बाळासाहेब ठाकरेंना ...

शूरवीरांच्या भूमीला नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाला नव्हे नव्हे तर पूर्ण जगाला राजकारणाची वेगळी ओळख करणारा एक वेगळा राजकारणी. अस्सल ठसठशीत मराठमोळा अभिमान असणारा मराठी माणूस, शिवरायांच्या यशोगाथेला अभिमानाने गौरवास्पद करणारा शिवसैनिक, शिवसेना नावाची मराठीमोळी संघटना उभा करणारा क्रांतिकारी, मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी लढणारा महाराष्ट्र सैनिक, व्यंगचित्रांच्या रेषांतून परिस्थितीची जाण करून देणारा व्यंगचित्रकार, हिंदुस्थानातील हिंदूंसह सर्व धर्माना धर्माभिमान शिकवणारा धर्मप्रेमी, सामान्यांना आपलं वाटणारा असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणज़े बाळासाहेब..

राजकारणात सत्ता नसताना सुद्धा समांतरित सत्ता लोकांच्या हिमतीवर चालवणारे, तोंडातून एकदा निघालेला शब्द कधीच परत न घेणारे, कुणाचीही मदत करण्यासाठी नेहमी आपली सत्ता वापरणारे, शिवरायांना डोक्यापासून तर हृदयापर्यंत आत्मसात करणारे, परदेशी लोकांनी ह्या भूमीत येण्याअगोदर शिवरायांचं नाव घ्यावं म्हणून मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव देणारे, देशातील पहिली ट्रेन ज्या स्थानकावर धावली त्या स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव रूपाला आणणारे, मुंबईत राहून पाकिस्तान सारख्या विरोधकांना धडकी भरवणारे, अश्या अनेक अनेक राजकारणाचे पैलू असताना सतेच एकही पद न घेता देशहितासाठी असंख्य गोष्टी करणारे अदभूत शिवसेनाप्रमुख...

बाळासाहेब नावाचं वादळ हे शेवटच्या श्वासापर्यंत मराठमोळ्या, हिंदुस्थानी आणि शिवसैनिकांच्या मनात बसलेलं आहे. अखेरच्या श्वासात सुद्धा जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत सारा देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. जगाचा निरोप घेताना सुद्धा बाळासाहेबांनी पराक्रमाची गाथा चालू ठेवली. हिंदुस्थानातील सर्वात मोठी अंतयात्रा हि लोकमानसात प्रेम असल्यामुळे दिसून आली आणि त्या दिवशी खर्याअर्थानें कधी न थांबणारी मुंबई नावाची धावती दुनिया सुद्धा थांबली होती.

बाळासाहेब तुम्ही महाराष्ट्र नावाच्या शिवरायांच्या विश्वात जन्माला आलात हा आम्हा मराठीमाणसाचा गौरवच म्हणावा लागेल. बाळासाहेब तुम्ही गेलात हे आज पण खरं वाटत नाही कारण तुमच्याबद्दलचा आदर आणि तुमचा दरारा आज पण तेवढाच आहे आणि भविष्यात तो तसाच राहील.. आपण खरंच अदभूत आणि अद्वितीय होता आणि राहाल..

राजकारणापलीकडचा महामाणूस, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली..

जय हिंद, जय महाराष्ट्र ..

(राजकीय वारसा -२)

डॉ. प्रशांत शिरोडे.

अनाथांची माय .. सिंधुताई सपकाळ



माणसाचा जन्म झाल्यावर माणूसपण अनुभवायला भेटलच पाहिजेल. माणसात जन्माला येऊन माणूसुकीच माणूसपण विसरली तर होणारी वेदना असह्य असते. माणुसकीच्या दुनियेत अमाणूसपणा भेटल्यानंतर माणुसकी निभावणार उत्तम उदाहरण म्हणजे "सिंधुताई सपकाळ". स्वतः अनाथ झाल्यानंतर परिस्थितीवर मात करून अनेक अनाथांची माय झालेल्या सिंधुताई.

१४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्ध्यातील नवरगाव येथे सिंधुताईंचा जन्म झाला. चौथी पर्यंत शिक्षण झालेल्या सिंधुताईंचं लग्न वयाच्या नवव्या वर्षी झालं. गुर वळून शेण गोळा करणे हा सिंधुताईंचा रोजचा दिनक्रम. हेच गोळा केलेलं शेण जमीनदार कुठलाही मोबदला न देता विकत असत, त्याचा मोबदला भेटत नसल्यामुळे सिंधुताईंनी आवाज उठवला. सिधुताईंच्या ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविल्यामुळे जमीनदाराने त्यांच्यावर तीन मुलांनंतर पोटात असलेलं बाळ आपलंच असल्याची अफवा पसरवली आणि ह्या अफवेमुळे नवऱ्याने त्यांना मारत मारत घराबाहेर काढलं आणि त्यापाठोपाठ गावानेही वाळीत टाकलं. माहेरी गेल्यावर जन्मदात्यांनीही पाठ दाखवली. सुरवातीच्या काळात स्मशानातील अंतिमसंस्कारासाठी वापरलेलं पीठ स्मशानातील विस्तवावर भाजून पोट भरताना तिथल्या कावळ्यांनीही त्यांना टोचा मारून स्मशानतला मुक्काम हलवायला लावला. पावलापावलवरच्या संकटाना सामोर जाताना अनाथ अवस्था उपभोगल्यानंतर तीच भावना त्यांना अनेक अनाथांच्या संगोपनाकडे घेऊन गेली.

अनाथांची सेवा करण्याची इच्छा सिंधुताईंना रेल्वे स्टेशनवर भीक मागणाऱ्या आईच्या देहाशेजारील ८ महिन्याच्या मुलीला आश्रय देण्यापासून झाली ती सुमारे १०५० अनाथांपर्यंत येऊन पोहचली. अनाथांची सेवा करण्यासाठी ममता बाल सधन, बाल निकेतन, सावित्रीबाई फुले मुलींचे वस्तीगृह, अभिमान बाल भवन, गोपिका गाई रक्षण केंद्र सारख्या संस्था सुरु केल्या. अनाथांच्या उदरनिर्वाहासाठी जगभरात आपल्या उत्तम वक्तृत्वाच्या जोरावर पदर पुढे करून आजही भीक मागतात. गावस्थरापासून ते आंतरराष्ट्रीय स्थरावर आपल्या कार्याच्या आणि वक्तृत्वाच्या जोरावर एक वेगळाच गौरव उभारला. त्यांच्या ह्या कार्यासाठी त्यांना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आणि एक मराठी चित्रपट त्यांच्यावर बनवून त्यांना गौरविण्यात आलं.

माणुसकीने दगा दिल्यानंतर संकटाच्या काटेरी वाटेला समोर जाऊन अनेकांना आश्रय देऊन जगवलं, वाढवलं आणि शिकवलं. ज्या नवऱ्याने घराच्या बाहेर काढलं त्याच नवऱ्याला म्हातारपणात आपल अनाथ बाळ म्हणून आश्रय देणाऱ्या मोठ्या मनाच्या अनाथांच्या मायेला जन्मदिनी दीर्घायुष्य लाभो ह्याच शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

तमाशा...


रसिक होऊ दे दंग, चढू दे रंग असा खेळाला,
साता जन्मांची देवा पुण्याई लागू दे आज पणाला,
हाथ जोडतो आज आम्हाला दान तुजा दे संग,
नटरंग उभा ललकारी नभा स्वर ताल झाले दंग ..

हे गाण्याचे बोल नटरंगला म्हणजे कलेच्या देवतेला वंदन करून रसिकप्रेक्षकांसमोर आपल्या स्वरांचा, नृत्याचा आणि कलेचा खेळ सुखरूप होण्यासाठी  विनंती करण्याचे बोल आहेत.

महाराष्ट्राची लोककला "तमाशा".. सहसा घरात काही भांडण झालं का आपसूकच एक वाक्य येत कि काय तमाशा मांडला? आजपण तमाशा बघणं तस चांगल्या गोष्टीच लक्षण समजलं जात नाही. तमाशाला चांगला न म्हणायचं मुख्य कारण त्यात स्रिया नृत्य करतात आणि अश्लील विनोद उद्गारले जातात. नृत्य कलेचं प्रतीक तर अश्लील विनोद हास्यविनोदांचं प्रतीक पण ह्यात जास्तीचा उत्साह ह्या तमाशाला मुख्य हेतूपासून दूर नेताना दिसतो.

तमाशा हि कला मुख्यतः तीन भागात विभागली जाते एक नृत्य दुसरं गीत आणि तिसरं वघ. तमाशा सुरु होताना पहिले देवाची आरती आणि नटरंग पूजन केलं जात. नृत्यात मुख्यतः भारतीय गीतांवर नृत्य केलं जात ज्यात स्त्रीपुरुष दोन्ही नाचतात. गीताचं सुद्धा तसंच ज्यात भारतीय गीत गायक गातात. गवळण, लावणी, भक्तिगीतांचाही ह्यात सहभाग असतो. अधून मधून विनोदाचे चुटके चालू असतात. संगीत कलेचा हा अविष्कार संपल्यानंतर वघ नाट्य सादर केलं जात, ज्यातून एक सामाजिक विषय घेऊन नाट्यातून सामाजिक प्रबोधन केलं जात. तमाशा हा फडात म्हणजेच तंबूत होत असतो. रोषणाई हा तमाशाचा एक मुख्य आकर्षण असत.

तमाशा हि लोककला आहे आणि ती लोकांच्या करमणुकीसाठी जोपासली जाते. एक विशिष्ट वर्ग पिढ्यानपिढ्या हि कला ज़ोपासतो. घरदार सोडून रसिकप्रेक्षकांच्या आनंदासाठी जर हि कला ज़ोपासली जात असेल तर तिला दाद देणंही रसिकप्रेक्षकांचं कर्तव्य बनत..

डॉ. प्रशांत शिरोडे.

सण दिव्याचा..



सण उत्सवांची परंपरा भारतभूमीला पूर्वापार लाभली आहे. इंग्रजी दिनदर्शिकेतील मकर संक्रातीपासून चालू होणारी सणांची श्रुंखला तुळशी विवाहापर्यंत चालते. प्रत्येक सणाचं एक वेगळं असं महत्व आहे. प्रत्येक सण हा एक विशिष्ट पद्धतीने साजरा केला जातो. सणातून भेटणारा आनंद, उत्साह काही निराळाच असतो. सण मुख्यतः एकत्रित येऊन एकमेकांचे सुखदुःख वाटण्यासाठी साजरे केले जातात. काळाच्या ओघात सण साजरा करण्याची पद्धतही बदलत चालली जी सणाच्या मुख्य हेतू पासून दूर जाताना दिसतेय.

सणांचा राजा दिवाळीचा सण. सलग पाच सहा दिवस चालणारा सण. दिवाळीची चाहूल मनाला नेहमीच लागलेली असते. दिव्यांचा सण हा चैतन्य देतो आणि ह्या चैतन्यातूनच वातावरणात उत्साह संचारतो. दिवाळीत मामाच्या गावाला जाण्याची मज्जा असो वा किल्ले बनवण्याचा उत्साह असो सगळं काही निराळच असत. शुभेच्छांपासून ते आशिर्वादापर्यंत सगळं भरभरून असत. वसुबारसपासून सुरु होणारा सण भाऊबीजेपर्यंत चालतो. "दिन दिन दिवाळी गायीम्हशी ओवाळी, गायी कुणाच्या, गायी लक्ष्मणाच्या.." ह्या उत्साही गाण्याने तार काडी फिरवण्याची आणि फटाके फोडण्याची मजा काही वेगळीच असते.

वसुबारस गायीची आणि वासराची पूजा करून त्यांच्यातील ममता आणि उदारता आपल्या अंगी येण्यासाठी साजरा करतो. धनत्रयोदशी धनाच्या पूजेसाठी, धनाच्या उत्कर्षासाठी, धन्वंतरीची कृपादृष्टीसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी. नरकचतुर्दशी म्हणजे अन्यायावर, असत्यावर विजय मिळविण्यासाठी. लक्ष्मीपूजन लक्ष्मीच्या नित्य सहवासासाठी, घराच्या लक्ष्मीच्या सुखासाठी. दीपावली पाडवा घरातील गोडव्यासाठी, थोरामोठ्यांच्या आशीर्वादासाठी. भाऊबीज बहीण भावाच्या नात्याला अतूट ठेवण्यासाठी ..

जगाच्या पाठीवर सण परंपरेत भारताची ओळख दिवाळी ह्या सणाने होते. भारतीय संस्कृती आणि तिच्या परंपरेत सणांचा विशेष वाटा आहे. दिवाळी हा सण सर्व  धर्मियांकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला  जातो. हे सण उत्सव दिमाखाने साजरे होत राहो. चैतन्य, उत्साह आणि आनंद सर्वाना आयुष्यभर लाभो ह्याच दिवाळीच्या शुभेच्छा...

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...