मराठी शिववीर..



जय देव, जय देव, जय शिवराया,
या या अनन्य शरणा, आर्या ताराया.
त्रस्त आम्ही, दिन आम्ही, शरण तुला आलो,
परवशतेच्या पाशी, मरणोन्मुख झालो,
साधू परित्राणाया, दुष्कृती नाशाया,
भगवन भगवतगीता सार्थ कराया या...

शिवरायांची आरती??? थोडं आश्चर्यच वाटलं ना..? आपण तर देवाचीच आरती म्हणतो! मग शिवरायांची आरती का? आणि कोणी लिहिली? शिवाजी महाराज दैवत होते का? ह्या साहजिकच पडलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर... देशासाठी स्वतःला वाहून देणाऱ्या सावरकरांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य शौर्यातून प्रभावित होऊन, त्यांच्या कार्याप्रती आदरपूर्वक नतमस्तक होऊन लिहलेली हि भावपूर्ण आरती.

स्वातंत्र्यवीर सावरकर एक स्वातंत्र्यसैनिक, कवी, लेखक, राजकारणी, हिंदुसंघटक आणि साहित्यिक.. आणि त्यांच्या ह्या सर्व गोष्टीत आपला विशेष प्रभाव निर्माण करणार अभूतपूर्व व्यक्तिमत्व.

अरे हा मी शिवाजी महाराजांबद्दल लिहीत  असताना मध्येच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल लिहायला लागलो. दोन महान व्यक्तींना व्यक्त करताना माझं मन कसं लिहावं? आणि कुठून सुरवात करू? ह्या सारख्या अनेक प्रश्नाच्या शोधात अडकलंय. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर ह्या भारतभूमीच्या दोन महान पुत्रांना शब्दांच्या पुष्पसुमनांनी गुंफण म्हणजे महान यशोगाथेचा गौरव करणं...

माझ्या मराठी बोलू कौतुके,
परी अमृतातही पैजा जिंके,
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. .

संत ज्ञानेश्वरांच्या मराठी भाषेबद्दल कौतुकाच्या ओळींना खरं ठरवलं शिवाजी महाराजांनी. परकीयांच्या आक्रमणामुळे मराठी भाषेत अनेक उर्दू शब्द वापरण्यात येत असताना मराठी भाषेचं प्रथम शुद्धीकरण करून तिला राजभाषेचा दर्जा दिला. सावरकरांनी महाराजांचा हाच आदर्श समोर ठेवून मधल्या परकीय आक्रमणातून मराठी भाषेला शुद्धीकरण करून मायमराठीचा सन्मान मिळवून दिला. माझ्या मराठी भाषेला जरी राजकीय दृष्टया अभिजात दर्जा मिळत नसेल तरी ह्या दोन माहात्म्यांमुळे ती आजतागायत अभिजातच आहे.

महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेल्या रत्नानंच कौतुक करावं तितकं कमीच. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापून परकीयांची आक्रमण उधळवून लावली. सावरकरांनी अन्यायाला वाचा फोडत पारतंत्र्यातून भारतभूमीला मुक्त करण्यासाठी इंग्रजांची सत्ता हलवून लावली.

शिवाजी महाराज म्हणजे शौर्याचा सूर्य तर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे क्रांतीचे सागर. शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्यसंस्थापक, तर  स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे स्वातंत्र्ययोद्धा. शिवाजी महाराज म्हणजे पराक्रमाची यशोगाथा, तर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ. शिवाजी महाराज म्हणजे दैवत..तर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे दैवताची सावली...

देव, देश आणि धर्मासाठी आपल्या पराक्रमाची परिसीमा पार करणारे शिवाजी महाराज अनेकांना आदर्शस्थानी आहेत आणि त्या आदर्शांना जपणारे सावरकरांसारखे महान व्यक्ती ह्या भूमीत जन्माला आलेत ते ह्या भूमीच भाग्यच म्हणावं लागेल.  सावरकरांनी आयुष्य जगताना शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून भारतभूमीला परकीयांच्या गुलामगिरीतून मूक्त केल. आदर्शांचा महामेरु शिवाजी महाराज आहेत आणी ह्या आदर्शांना प्रत्यक्षांत आत्मसात करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. भारतभुमीला लाभलेली ही शूरवीरांची श्रुंखला नेहमीचं आदर्शस्थानीं राहों हिच मराठी भाषा दिनी शिवचरणी प्रार्थना. मराठी भाषा दिनाच्या मनोभावे
शुभेच्छा...

जय हिंद.. जय महाराष्ट्र..

डॉ. प्रशांत शिरोडे.

दैवत छत्रपती...



महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज कि ... म्हंटल्यावर आपसूकच हृदयातून "जय" मुखात येणार नाही असा एकही व्यक्ती नसेल. १८ पगड जाती आणि १२ बलुतेदार मिळून स्वराज्य प्रत्यक्षात आणणारे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणूनच महाराष्ट्रातील मराठमोळ्या माणसाच्या हृदयस्थ आहेत. मातीसाठी लढणारे शिवराय कधीच जातीसाठी लढले नाही कारण स्वराज्य हे अदभूत सुवर्णस्वप्न त्यांना प्रत्यक्षात उतरवायचं होत.

जगाच्या पाठीवर अनेक सम्राट, राजेमहाराजे झाले आणि त्याची दखल इतिहासानसुध्दा घेतली पण ४०० वर्षानंतर आत्मियतेने आणि सन्मानाने ज्यांना रयतेच प्रेम भेटतय ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज होय. असा कुठलाच माणूस नाही ज्याला शिवरायांच्या विचारांचा आदर नाही. ज्यांनी शिवराय जाणले त्यांनी ते हृदयस्थ केले. महाराज देव नव्हते पण देवापेक्षा कमी नव्हते. महाराजांचा आदर्श ज्यांनी मनाशी ठेवला त्याच्या वाटेत अडथळा येणं अशक्य आहे. आपल्या उच्चशक्तीला बळ देण, आपल्यातील कमकुवत बाजूला बलस्थान करण, आलेल्या संधीच सोन करण आणि आपलं स्वप्न पूर्ण होत नाही तो पर्यंत हार न मानणं हे स्वराज्य घडवणाऱ्या शिवरायांकडून शिकाव. शिवाजी महाराजांच्या कुठल्याही एका विचाराला मनस्वी स्वीकारल तरी यशाची पायरी चढायचं सोपं होईल.

आज शिवरायांची जयंती.. शिवजयंती हा उत्सव आहे ज्याला कुठल्या धर्माचं, कुठल्या जातीचं किंवा कुठल्या प्रांताच अधिकारत्व लाभलेलं नाही. आपल्या स्वराज्याच त्या काळी बघितलेलं स्वप्न आजच्या काळातही त्याच सन्मानानं स्वीकारलं जात, पण दुर्दैव म्हंटल तर त्याला तितक्या आत्मियतने आत्मसात करताना दिसत नाही. शिवजयंती हि विचारांची व्हावी, शिवजयंती हि किल्लेसंवर्धनसाठी व्हावी, शिवजयंती स्वराज्य प्रेरणेसाठी व्हावी, शिवजयंती माणुसकीच्या बंधनासाठी व्हावी, शिवजयंती जगाच्या कल्याणासाठी व्हावी...

"स्पर्श" ह्या आजच्या वर्षांपूर्वी सुरु केलेल्या ब्लॉगच्या शृंखलेची अर्धशतक पूर्ण होताना ५० वा ब्लॉग शिवचरणी अर्पण करून छत्रपती शिवरायांना जन्मदिनी मानाचा मुजरा करतो..

जय शिवराय...

डॉ. प्रशांत शिरोडे.

शहीद...



काल देशभर प्रेमाची लाट असताना भारतभूमीवर प्रेम करणाऱ्या तिच्या लाडक्या पुत्रांवर आतंकवादाने हल्ला केला. जम्मूकाश्मीरमधील पुलवामाच्या अवंतिपुरा येथील सीआरपीफ च्या जवानांवर अमानुष हल्ला झाला आणि ह्या दुष्कृत्यात भारतमातेच्या ४४ पुत्रांना वीरमरण आलं.

स्वातंत्र्यापूर्वी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आता स्वातंत्र्यानंतरही भारतमातेच्या संरक्षणार्थ अनेकांना आहुती द्यावी लागतेय. भारतीय जवान आपल्या डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस शत्रूराष्ट्रांच्या हालचालींवर लक्ष ठेवून पहारा देत असतात. अनेक सरकार आलीत आणि अनेक सरकार गेलीत पण जम्मूकाश्मीर सारख्या संवेदनशील भागात अशांतता शांत होण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. राजकारण तर खूप झालं पण आता कृतीची गरज आहे. अजून किती जवान आपल्या प्राणांची आहुती देणार? अजून किती परिवार रस्त्यावर येणार? अजून किती छोटे तान्हुले आपल्या बापाला मुकणार? अजून किती मायबहिणी विधवा होणार? बस आता हे असह्य होतंय... आता हा प्रश्न निकाली काढावा लागणार..

राजकीय शक्तींनी एकत्र येऊन ह्या गोष्टीची दाहकता समजून घेण्याची नितांत गरज आहे. जवान भारतभूमीच संरक्षण करतात, आपण त्यांच्या संरक्षणाची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. अनेक मान्यवरांनी आपल्या भावना प्रखरतेने व्यक्त केल्या, त्यात "आपण सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून या हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ आहे " ह्या राज ठाकरेंनी व्यक्त केलेल्या भावनेची सरकारने आणि सर्व राजकीय पक्षांनी दखल घेणं तितकंच महत्वाचं आहे.

माझ्या भारतभूमीच्या ह्या वीरपुत्रानंच हे वीरमरण आता वाया जायला नको. माझ्या भारतभूमीच्या जवानांना दीर्घायुष्य लाभो आणि असा आघात पुन्हा कधीही न होवो हि ईश्वरचरणी प्रार्थना. कालच्या हल्यात शाहिद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कृषिकन्या ..




बापाचं काळीज मुलीला समजत हे म्हंटल जात ते काही खोटं नाही. आपला बाप काबाडकष्ट करतो आणि त्या कष्टाला पाहिजेल तसं फळ भेटत नाही, हे नेहमीच झालय हे बघवलं जात नाही. शेतकऱ्याची ५० वर्षांपूर्वी जी स्थिती होती ती आजही तशीच आहे. शेतकऱ्याच्या पोटच्या मुलीला जे कळत ते सत्ताधार्यांना आजपर्यंत का कळलं नाही? का कळूनही त्याला दुर्लक्षित  करण्यात येत? शेतकरी आत्महत्या करतो, शेतकरी आंदोलन करतो, शेतकरी संपावर जातो, पण त्याच्या कुठल्याही मागणीला ठोस पर्याय शोधला का जात नाही?

कृषिकन्या लिहण्याच कारण म्हणजे नगर जिल्ह्यातील पुणतांबा गावातील शुभांगी जाधव, निकिता जाधव आणि पूनम जाधव ह्या शेतकऱ्यांच्या मुलींनी बापाच्या काळजासाठी आणि सरकारने दीड वर्षांपूर्वी शेतकरी संपावर गेलेल्या आंदोलनाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अन्नत्याग केलाय. आज प्रसारमाध्यमात चालू आहे त्यातल्या एका कन्येची तब्येत खूप खालावली आहे, पण तिने दवाखान्यात जाण्यास मनाई केली आहे. इतकं भयानक असतानाही सरकारला अजून जाग येताना दिसत नाही. दुर्दैवच म्हणावं लागेल कि कृषिप्रधान देशात कृषीकन्येला अन्नत्याग करावा लागतोय.

गेल्यावर्षी एका कृषीकन्येने सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना म्हंटल होत "सरकार मायबाप आमचा बाप आमच्या लग्नासाठी तरी जिवंत राहू द्या". लहानपणापासून लेकीच्या लग्नाचं स्वप्न रंगवणाऱ्या शेतकरी बापाला लेकीच्या लग्नासाठी पैसा नसल्यामुळे आत्महत्या करावी लागते हे कृषिप्रधान देशाचं दुर्भाग्य म्हणावं तितकं कमीच. पोटच्या पोरांचं शिक्षण करणं शेतकरी राजाला पैश्यामुळे जमत नाही, पोरांच्या इच्छा, स्वप्न पूर्ण करता येत नाही. सगळं काही जणू जाणूनबुजून शेतकऱ्याच्या उरावर ढकललं जातंय अस समजायला काही हरकत नाही.

जाग येऊ दे मायबाप सरकार, तुमच्या मुली जश्या लाडाकोडात वाढवून त्यांच्या मनातील विश्व दाखवण्याचं स्वप्नं असत तसंच शेतकऱ्याचं  सुद्धा असत. थोडं माणुसकीच्या आरशातून बघा म्हणजे शेतकऱ्यातला माणूस सत्तेपलीकडे तुम्हालाही दिसेल आणि त्या कृषीकन्येची तळमळही कळेल.

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...