गर्व से कहो..




प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना.. प्रभू रामाची मंदिरातील पहिली पहाट म्हणजे सन्मानीय बाळासाहेबांचा आजचा वाढदिवस..


बाबरीच अमानुष आक्रमण नेस्तनाबूत करण्यासाठी अनेक शतकांची वाट बघावी लागली.. ह्यात कुठल्याही धर्माचा द्वेष मुळता नव्हता. तत्कालीन हिंदुस्थान भूमीवरील अमानुष अतिक्रमणांनी भारतीय अस्मितांवर आपल वर्चस्व दाखवण्यासाठी जे काही केलं होत, त्याला ते प्रत्युतर होत.


९० च्या दशकात ह्या अत्याचाराला वाचा फुटली आणि प्रभू रामाला जन्मस्थळावरील गुंतागुंत सुटली. बाबरी नेस्तनभूत झाली तेव्हा कोणी जबाबदारी घेत नव्हत तेव्हा जम्मू ते कन्याकुमारीपर्यंत एकच आवाज पुढे आला तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे.. मोठ्या अभिमानाने सिंहगर्जना झाली “बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे.”. गोष्ट जास्त वाढली तेव्हा “गर्व से कहो हम हिंदू है” ही बाळासाहेबांची घोषणा जगभरात प्रचलित झाली..


आज राममंदिर झाल्यावर बाळासाहेबांना स्वतःच्या जन्मदिनापेक्षा जास्त आनंद झाला असेल. जबाबदारीच भान असणारा, इतर धर्माचा द्वेष नकरता स्वधर्माचा अभिमान बाळगणारा आदर्श म्हणजे बाळासाहेब ठाकरे.. सध्य राजकारणाच्या विचारसारनीत हा महामाणूस अधोरेखित तितका झाला नसेल, पण भारतीय मनाला आणि प्रभू श्रीरामाला त्याची जाण आहे.. आज ह्या सुवर्णदिनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना भावपूर्ण श्रधांजली.. 


डॉ. प्रशांत शिरोडे

मर्यादापुरुषोत्तम



माता रामो, मत्पीता रामचंद्र,

स्वामी रामो, मत्सखा रामचंद्र…


रामरक्षेतील हा श्लोक म्हणजे राम आई, राम बाप, राम स्वामी, राम सखा सुद्धा आहे हेच सांगतो.. हे प्रभू रामावरच प्रेम वाल्मिकऋषीनी अनेक शतकाआधी व्यक्त केलं आणि आज राममंदिर पुनरप्रस्थापनेच्या दिवशी भारतभरात ते प्रेम पुन्हा प्रभू रामचंद्रावर होताना दिसतंय.


४९५ वर्षापासून ज्या क्षणाची आतुरता भारतवर्षाला लागली होती ती काही क्षणात पूर्ण होणार ह्या विचाराणी वातावरण प्रफुल्लित झाल आहे. मग तो कुणाचा राजकीय असो वा वयक्तिक फायदा असो त्यात न जाता हिंदुस्थानी मन हा आनंद साजरा करण्यात मग्न आहे.


मर्यादापुरुषोत्तम प्रभू राम अनेक मर्यादांचे आदर्श होते. जन्मस्थानाचा प्रश्न अनेक शतकांपासून नको त्या गोष्टीत अडकला होता त्यातही जणू मर्यादेने रामाची परीक्षा बघितली.. आता प्रभू राम आयुष्यातील दुसरा वनवास पूर्ण करुण मोठया दिमाखात अयोध्या नगरीत परतत आहेत. आज नुसती अयोध्या नगरीच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक भारतीय मन प्रभूश्रीरामचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाल आहे.


हिंदुस्थानातील प्रत्येक मन हा सण साजरा करण्यासाठी उत्सुक आहे. हिंदूधर्मावितीरीक्त इतर धर्मीय समुदाय ह्या क्षणाला दाद देतांना दिसतायेत ती वाखण्याजोगी गोष्ट आहे. अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण एका धुंदीत रमला आहे आणि ती म्हणजे “हर घर मे एकही नाम, एकही नारा गुजेगा…भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा..”


भारतातील प्रत्येक मनाला प्रभू श्रीराम उत्तम आयुष्य देवो आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण करणाऱ्या राजकारणी प्रवृतीला सद्धबुद्धी देवो हीच प्रार्थना.. मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम ४९५ वर्षांनंतर पुन्हा येतांना साडेचार वर्षाचं बाळ रामलल्ला म्हणून विराजमान होतायेत हा क्षण ह्या जन्मी बघायला भेटणं हे अहोभाग्यच.. अयोध्यानगरीला जागतिक स्थरावर आध्यात्मिक नेतृत्व करण्याचं सौभाग्य लाभो हीच ह्या पावनदिनी प्रार्थना…


डॉ. प्रशांत शिरोडे.

शिवरत्न हरपला

 



"महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला, तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे, महाराज जिथे गेलेत तिथे जायची !" बोलता बोलता बाबासाहेब हे बोलले असतील आणि आज कदाचित ते प्रत्यक्षात स्वर्गातल्या स्वराज्यात सामीलही झाले असतील..

महाराष्ट्राचं शिवरत्न आज हरपलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या वारसातील नेहमीच चर्चेत असलेलं नाव. १०० वर्षाच्या आयुष्यातील जवळपास ९० वर्ष छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या अदभूत चैतन्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारा शिवभक्त म्हणजे बाबासाहेब पुरंदरे.. शिवइतिहासावरील अद्वितीय कार्याबद्दल महाराष्ट्ररत्न आणि पद्मविभूषणसारख्या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होत. त्यांच्या ऐतिहासिक कार्याची दखल घेत छत्रपती शिवरायांच्या साताऱ्याच्या सिंहासनान त्यांना "शिवशाहीर" हि पदवी बहाल केली.

शिवरायांचा इतिहास संशोधन करतांना अनेक माहिती नसलेल्या ऐतिहासिक गोष्टी त्यांनी जगासमोर आणल्या. "राजा शिवछत्रपती" सारखी अवर्णनीय कादंबरी लिहून "शिवाजी महाराज" जगाला सांगितले. १३ कादंबरी आणि पुस्तक लिहून मराठी साहित्याची शोभा वाढवली. "जाणता राजा" सारखं महानाट्य प्रत्यक्षात उतरवून जगाच्या पाठीवर महाराजांच्या प्रत्यक्ष इतिहासाची ओळख करून दिली. 

शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना बाबासाहेब बेधुंद होऊन जायचे. सनावळी अगदी तोंडावर असत. त्यांच्या बोलीतून १२००० पेक्षा जास्त व्याख्यान त्यांनी जगभरात दिलीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि ऐतिहासिक गोष्टी सामान्यांना प्रत्यक्षात समजाव्या म्हणून पुण्याजवळ "शिवश्रुष्टी" उभारून एक निश्चय पूर्ण केला.

आयुष्याच्या वाटेवर अनेक यशाच्या कौतूकासह त्यांना आरोपांचाही सामना करावा लागला. प्रत्येक गोष्टीला उत्तर न देता आपलं शिवकार्य चालू ठेवणारा निर्भीड शिवभक्त आज भूतलावावरील स्वराज्य सोडून स्वर्गातील स्वराज्याकडे निघाला. शिवशाहिरांच्या अखेरच्या इच्छेप्रमाणे त्यांना  छत्रपती शिवाजी महाराजांकडे जागा मिळो हीच भावपूर्ण श्रद्धांजली..

डॉ. प्रशांत शिरोडे.

जय हो...



प्रिय भारत माता..

आजचा दिवस संपला. भारताच्या इतिहासातील आजचा दिवस हा विशेष होता. तुझ्या स्वातंत्र्याचा आज अमृतमहोत्सवी दिवस होता. तसं तुला आनंद नक्कीच झाला असेल पण तू स्वातंत्र्यासाठी ज्या अनेक यातना भोगल्या त्याची तुला आठवण नक्कीच झाली असेल. कितीही अघात झाले असतील पण प्रत्येक वेळी तुझाच विजय झाल्याचा इतिहास आमची छाती अभिमानाने फुगवतो. इंग्रज तर शेवटचे १५० वर्ष होते पण त्याआधी मुघलांसारख्या अनेक दृष्ट प्रवृत्तीना तुझ्या लेकरांनी नेस्तनाबुत केलं ह्याची आम्हाला जाण आहे.

आजच्या ७५ वर्षांपूर्वी तू हि स्वातंत्र्याची पहाट पहात असतांना तुझी लेकरं स्वातंत्र्य भारतात सुखी समाधानी असल्याचं, प्रगतीच्या शिखरावर पोहचून जागतिक महासत्ता बनण्याचं स्वप्न बघितलं असेल. पण गेल्या ७५ वर्षात रस्ता आणि रोजच्या सुविधा पुरविण्यातही पूर्णत्वास गेलो नसल्याचं सत्य बघून तू नाराज झाली असेल. अलीकडच्या काळात कुठे आरोग्य आणि शिक्षणावर आम्ही बोलायला लागलो. हा सुवर्णकाळ स्वयंभू होण्यासाठी का कमी पडला याच कुतुहूल तुला नक्कीच असेल. प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या तराजूत मोजली जाते आणि तुझ्यासाठीची राष्ट्रभावना कमी पडतांना दिसते, हे मात्र सर्वात मोठं सत्य आहे आणि त्यामुळे तुझं स्वप्न पूर्ण झालं नसेल याची जाणीव तुलाही असेलच. 

भारतमाता.. जगाच्या पाठीवर तू एकमेव अशी भूमी आहेस तुला आईच्या रूपात तूझी लेकरं बघतात. आजही ७५ वर्षानंतर तुझ्या लेकरांना वीरमरण येतांना खूप वेदना होतात. शेजारील दृष्ट प्रवृत्ती आजही तुझी रात्रंदिवस सुरक्षा करत असलेल्या लेकरांच्या जीवाशी खेळतात. स्वतःचा परिवार सोडून तुझ्या प्रेमापोटी हि लेकरं डोळ्यात तेल घालून शत्रूचा सामना करतात. अमृतमहोत्सवी वर्षातही तू ह्या दुःखाच्या छायेतून मुक्त न झाल्याची यातना आमच्याही मनाला सतावते.

७५ वर्षात ज्या कुणाची सर्वात जास्त कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते, ती म्हणजे सीमेवरील सैनिकांची आणि त्यानंतर ह्या स्वतंत्र लढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची .. तुला खूप दुःख होत असेल आणि तू आपसूकच विचार करत असशील खरंच अमृतमहोत्सवाचा आनंद लुटावा का? जीवन मरण कुणालाही चुकत नाही पण स्वतंत्र भूमीत दैव मरण न भेटता तुझ्या संरक्षणासाठी तुझ्या लेकरांना मरण पत्करावं लागत याच दुःख तुझ्या मनाला बोचत असेल.

असो, संकटांशी दोन हात करण्याची तुझी कसब अनेक शतकांपासून इतिहासाने बघितली आहे. तुला अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा देतांना अमृतमहोत्सवाकडून शतकमहोत्सवाकडे जात असतांना शतकमहोत्सवात तुला स्वातंत्र्याचा पूर्ण आनंद मिळो.. तुझ्या संरक्षणासाठी तुझ्या लेकरांचा हकनाक बळी न जावो.. तुझ्या मनातील खरा भारत निर्माण होवो.. तुझ्या राजकारणी लेकरांना सदबुद्धी देवो. आणि तुझं स्वातंत्र्य अबाधित राहो हीच सदीच्छा..आणि हो सर्वात महत्वाचं तुझा जयजयकार नेहमीच आमच्या मुखी राहो..भारत माता कि जय...जय हो..


डॉ.प्रशांत शिरोडे.

परिचारिका..




"मावशी कशा आहात, काही घाबरायचं नाही हा कोरोना म्हणजे मलेरिया, टायफॉईड सारखा आजार आहे. आई तुम्ही लवकर बरे व्हाल. आजी जेवलीस का?" अशी प्रेमाची शब्दरूपी औषध देणारी व्यक्ती म्हणजे "परिचारिका" म्हणजेच "नर्स". काही दिवसापूर्वी या संकटातून जातांना ह्या प्रेमळ व्यक्तींकडून ऐकलेली हि छोटी उत्साह देणारी वाक्य. वाक्य छोटी होती पण ती बोलल्यानांतर अनेक मोठ्या औषंधाचं काम करत होती.

नर्स म्हणजे आपल्यासारखीच साधारण व्यक्ती. या  संकटाच्या काळात सर्व वातावरण भयावय असताना स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या परिवाराची, स्वतःच्या स्वप्नांची पर्वा न करता रुग्णांच्या सेवेत मग्न असणारी खरी योद्धा  म्हणजे परिचारिका. जीव मुठीत असताना आपलं कर्म प्रामाणिकपणे करून खरी सेवा करणाऱ्या ह्या माय माऊली. 

सध्याची परिस्थिती बघता हॉस्पिटलमध्ये नर्सची खूप गरज भासतेय. हीच गरज पूर्ण करण्यासाठी अगदी २४ तास आपली सेवा देतांना सैनिकांपेक्षा कमी काम करतांना दिसत नाही. सैनिक सीमेवर रात्रंदिवस उभं राहून देशाची सुरक्षा करतात, अगदी तसंच या संकटात कोरोना आणि मनुष्यातील सीमेवर नर्स देशाची सुरक्षा करत  आहेत. हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर आपला पोषाक परिधान करून आधीच्या सहयोगीकडून सर्व माहिती घेऊन लगेच कामाला लागतात. सर्वात आधी रुग्णांना भेटतात आणि अगदी हसतमुख तब्येतीची विचारपूस करतात. त्यांच्या बोलण्यातूनच रुग्ण अर्धा बरा होत असतो. हि ईश्वराची त्यांना दिलेली देणच असावी.

आपलं कार्य बजावत असताना रुग्णाच्या जवळ जावून रुग्णाला औषध, पाणी अगदी सहजपणे देतात. अधूनमधून रुग्णाजवळ जावून त्यांना मायेचा हात फिरवून जगण्याची आशा देतात. या संकटात अगदी डॉक्टरसुद्धा रुग्णांना लांबूनच विचारपूस करतात पण नर्स रुग्णांची जवळून काळजी घेतात. डॉक्टर नक्कीच योद्धे आहेत पण या युद्धात डॉक्टरांपेक्षा एक पाऊल पुढे परिचारिकांचा सहभाग आहे..

संकटाच्या काळात देशसेवा, रुग्णसेवा करणाऱ्या "परिचारिका" या असामान्य योध्याला उदंड आयुष्य भेटो ह्याच जागतिक परिचारिका दिनाच्या शुभे्च्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.


गायधनी वाडा ..




आपल्या शिक्षणादरम्यान आपण कुठेतरी होस्टेल किंवा भाड्याच्या खोलीत राहतो आणि त्या महत्वपूर्ण टप्यातली ती वास्तू नेहमीच लक्षात राहते, अशीच एक वास्तू म्हणजे "८९८, गायधनी वाडा , रविवार कारंजा, नाशिक" ... हा पत्ता नव्हे तर नाशिकच्या मध्यवर्ती भागात असललेली आयुष्याच्या रस्त्यावरची संस्कारांची एक पायवाट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातून अनेक विद्यार्थी नाशिकला असतांना शिक्षणासाठी या पवित्र वास्तूत वास्तव्यास राहिले आहेत. या वास्तूने अनेक डॉक्टर, सि.ए., इंजिनिअर, शिक्षक, फार्मासिस्ट, लेखक आणि कवी घडवलेत. अनेकांना शिक्षण घेत असतांना आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाण या वाड्यात आवर्जून व्हायची. 

गायधनी वाडा हा सुमारे २०० वर्षांपूर्वी नाशिकच्या पवित्र भूमीत उभा राहिला. या वाड्याने भारतभूमीचा स्वतंत्र लढा, आणीबाणीचा काळ, राजकारणाच्या घडामोडी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्वपूर्ण टप्पे आणि सिनेसृष्टीला अगदी जवळून बघितलं आहे. इतक्या सर्व गोष्टींचा साक्षीदार असलेल्या वाड्याने अनेक विद्यार्थी त्याच दिमतीने घडवलेत. या वास्तूने जगतांना शिस्तीचं महत्व किती असत ते प्रत्येक टप्यावर शिकवलं आणि त्याच शिस्तीने अनेकांचं आयुष्य घडलं.

शिस्त शब्द आला तरी या वास्तूला जोपासणारा आणि विद्यार्थ्यांना शिस्त लावणाऱ्या अवलियाची म्हणजे राजाभाऊ गायधणींची म्हणजेच भाऊंची आठवण येते. भाऊंच्या शिस्तीमुळे अनेक पालकांची आपल्या पाल्याविषयी चिंता मिटायची. वाड्याचे काही खास नियम होते त्यात रात्री १० नंतर प्रवेश बंद, बाहेरील मुलांना प्रवेश बंद, शिक्षणासाठी खोली फक्त, रेडिओ मोबाइलला परवानगी नाही, आडाच्या थंड पाण्याने आंघोळ, गडबड गोंधळ नको आणि या सर्वात महत्वाचं म्हणजे शिस्त मोडणाऱ्या विद्यार्थ्याला "शक्य तितक्या लवकर येऊन भेटणे" अशी भाऊंची चिट्टी मिळायची. या वितिरिक्त भाऊंचं मार्गदर्शन लाभायचं ज्यातून आयुष्याच्या पैलूंचा उलगडा 
व्हायचा.

वाड्यात असतांना १२० रुपये महिन्याचं खोली भाडं आणि १० रुपये वीजबिल अशी भाडे आकारणी असायची. पैसे कमाविण्यापेक्षा विद्यार्थी घडवणं हा त्यामागचा उद्देश होता. रात्री दहा नंतर कधीतरी गुपचूप बाहेर जाण, आडाच्या थंडगार पाण्याने वरती मोकळ्या जागेत अंघोळ करणं, करमत नसतांना मेनरोडवरील गॅलरीत जाऊन उभं राहणं, रात्र रात्र गप्पा आणि मजामस्ती करणं, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं आणि चांगले मित्र भेटणं.. हे सर्व सुवर्णक्षण गायधनी वाड्याच्या आठवणींना नेहमीच उजाळा देतात आणि भविष्यातही देत राहतील..

स्वातंत्र्याच्या सूर्योदयापासून तर यशस्वी विद्यार्थी घडविण्यापर्यंतच्या अनेक क्षणांचा साक्षीदार ठरलेल्या वास्तूचा नाशिकच्या ऐतिहासिक वारशात मोलाचा वाटा होता. आज दोनशे वर्षानंतर हि वास्तू काही कारणांमुळे जमीनदोस्त करण्यात आली. गायधनी वाडा, ८९८, चांदीच्या गणपतीच्या मागे, रविवार कारंजा, नाशिक ह्या कायमस्वरूपी स्मरणात राहणाऱ्या संस्कारी वास्तूला तिच्या लेकरांचा मनापासून दंडवत..

डॉ. प्रशांत शिरोडे.

अजिंक्य..

 



ऑस्ट्रेलियात ३२ वर्षानंतर एक अनोख्या विजयाचा जल्लोष भारतीय क्रिकेट संघ आज साऱ्या जगाला साजरा करतांना दिसला. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका जिंकल्यानंतर ज्या व्यक्तीला याच श्रेय मुख्यतः जात तो म्हणजे अजिंक्य रहाणे ..

अतिशय शांत, संयमी स्वभावाचा चाणाक्ष कर्णधार म्हणजे अजिंक्य. पहिल्या कसोटीत विराट कोहलीच्या नेतृत्वात ३६ धावांवर गारद झालेल्या संघाला दुसऱ्या कसोटीत आपल्या कप्तानीत विजय मिळवून देणारा अजिंक्य. ह्या कसोटीत संघ दडपणात असतांना संघाला त्यातून बाहेर काढून संघाला दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून देण्यात अजिंक्यचा कर्णधार म्हणून सिंहाचा वाटा होता. तिसऱ्या कसोटीत शेवटच्या दिवशी उपहारानंतर कसोटीला वेगळ्या निकालावर नेवून क्रिकेट जाणकारांना आणि प्रेक्षकांना अजिंक्यने धक्काच दिला. शेवटच्या कसोटीत आपली बाजू भक्कम असल्याचं जाणून ती जिंकण्याच्या दृष्टीने संघाला पुढे नेणारा कर्णधार अजिंक्य राणे कौतुकाला नक्कीच पात्र ठरला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघ पहिल्या कसोटीनंतर दडपणात असतांना कर्णधार पदाची धुरा अजिंक्यने हातात घेतली. त्यानंतर ह्या दौऱ्यात अनेक मुख्य खेळाडूंना दुखापत झाली तरी नवख्या खेळाडूंना बरोबर घेऊन मोठ्या ताकतीने संघाला अजिंक्यने खेळवल. आपल्या कर्णधार पदातून अनेक सुप्त गुणामधून त्याने ह्या मालिकेत मोठेपणा दाखवला. सामन्यानंतर मैदानातून कर्णधार पहिले बाहेर पडतो, पण संघातील नवख्या खेळाडूने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे हा मान त्याने त्या खेळाडूला दिला. वर्णभेदामुळे खेळाडूंना ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून हिणवलं जात असतांना त्याने कारवाई होईपर्यंत सामना थांबण्याचं धाडस दाखवलं. आपल्या सहकाऱ्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंचांना विनंतीकरून त्या सामन्याचा बॉल त्या खेळाडूस देण्याची अनोखी गोष्ट त्याने केली. आपल्या संघातील खेळाडूंबरोबर ऑस्ट्रेलियाचा एक गोलंदाजांची १०० वा सामना होता म्हणून त्याला बोलवून त्याने त्याला जर्सी आठवण म्हणून भेट दिली. अगदी संघ जिंकल्यावरही त्याने आपल्या हातातील ट्रॉफी संघातील खेळाडूंकडे क्षणात सुपूर्द केली आणि शेवटी बोलतांना ऑस्ट्रेलिया टीमचे तिथल्या प्रेक्षकांचे आभारही मानले.

एका वेगळ्या दिमतीला कर्णधार म्हणून सिद्ध केलेल्या अजिंक्य रहाणेला नेहमीच भारतीय क्रिकेट मध्ये डावललं गेलं. सगळ्या फॉरमॅट मध्ये कुठल्याही स्थानावर खेळण्यासाठी लायक असलेल्या ह्या जिगरबाज खेळाडूला का संघाबाहेर  ठेवलं जात हाच अनुत्तोरित प्रश्न कायम आहे. आपल्याला मिळालेल्या संधीच त्याने नेहमी सोनंच केलं त्याचच अजून एक उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका होय.

अजिंक्यची संयमी आणि शांत वर्तणूक सचिन तेंडुलकरची आठवण करून देते. मराठी मनाची हि परंपरेची शृंखला तो मोठ्या दिमाखाने पुढे नेतोय. अजिंक्य आपल्या वर्तनातून पुन्हा पुन्हा भारतीयांची मन जिंकतोय आणि हाच त्याचा मराठी असल्याचा अभिमान मराठी मनाला आहे... भविष्यकाळात त्याला अनेक संधी मिळो ह्याच शुभेच्छा.

डॉ. प्रशांत शिरोडे.

परमेश्वर

  



'हे परमेश्वरा वाचावं रे ह्या संकटातून', 'हे परमेश्वरा ह्या जगाला ह्या संकटातून मुक्त कर' सर्वांच्या मुखात हि विनवणी सरत्या वर्षात होती. संकटांच्या वर्षात खूप काही झालं, जाणवलं पण सर्वात जास्त जाणवलं ते परमेश्वराचं अस्तित्व.  जाणाऱ्या वर्षात हा परमेश्वर वेगळ्या वेगळ्या रूपात दिसला किंवा बघितला आणि माणसाने जगण्याची भाषाच बदलली.

आप्तस्वकीयांचं महत्व, नातेसंबंधांचा ओलावा, मैत्रीचा आधार आणि जगण्याचा अर्थ ह्या दिवसात विशेष करून जाणवला. परिस्थितीने पैश्यांचा आणि माणुसकीचा एकमेकांशी असलेला सलोखा माणसाला शिकवला. जगतांना माणसाने स्वतःला अनेक बंधनांमध्ये अडकवून घेतल्यामुळे स्वतःच जगणं विसरल्याचं या काळात प्रामुख्याने जाणवलं.

ह्या वर्षात आपला श्वास अजूनही सुखरूप चालू आहे यातच सर्वानी परमेश्वराचे धन्यवाद मानले. या वर्षात आपण माणूस आहोत आणि माणसाला परमेश्वराची गरज आहे. ह्या जगात कोणीही व्यस्त नसत, माणसाने स्वतःच वेळापत्रक त्याच्या पद्धतीने व्यस्त करून घेतल्याचं सर्वाना जाणवलं आणि संकट कोणावरही येऊ शकत हे सर्वानी अनुभवलं. कितीही अवघड परिस्थिती ओढवली तरी त्यातून सावरता येत आणि त्या प्रत्येक क्षणात परमेश्वर मार्ग दाखवतो. 

नेहमीच प्रत्येक क्षणाला आपण परमेश्वराला आठवत असू पण या वर्षात त्याच्या अस्तित्वामुळे आपण सुखी आहोत ह्याची जाणीव नक्कीच झाली. वर्ष संपताना खूप काही झालं पण आपण जगलो ते परमेश्वराच्या प्रेमामुळे. हे वर्ष जातांना खूप काही शिकवून गेलं आणि माणसाचं आयुष्य बदलवून गेलं. 

माणसाने जीवन जगत असताना आपल्या जवळील प्रत्येक माणूस जपावा आणि परमेश्वरावर आपली श्रद्धा निस्वार्थपणे ठेवावी  हीच ह्या वर्षाची शिदोरी आयुष्यभरासाठी माणसाला भेटली. जाणाऱ्या वर्षाचे आभार मानत येणाऱ्या वर्षात परमेश्वराची कृपादृष्टी अशीच राहो हीच सदीच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

सत्ताधीश

 


"दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.." ह्या गीताच्या ओळींना कायमस्वरूपी सार्थ ठरवणारा महाराष्ट्रातील राजकारणी म्हणजे श्री.

शरद पवार साहेब. दिल्लीत कोणाचीही सत्ता असो शेवटी त्यांना म्हणावं लागत कि "आम्ही पवारसाहेबांचे हात धरून राजकारणात आलो". इतिहासापासून महाराष्ट्राच्या भूमीने दिल्लीच्या सत्तेची लगाम आपल्या हातात ठेवली आणि त्याच ऐतिहासिक वारशाला आजतागायत मोठ्या दिमाखाने पुढे नेणारे पवार साहेब. 

वयाची ८० वर्ष पूर्ण करणाऱ्या पवार साहेबांनी आयुष्याची ५० वर्ष महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात यशस्वीरीत्या घालवलीत. वयाच्या ३७ व्या वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या पवार साहेबांनी महाराष्ट्र सारख्या प्रगतिशील राज्याचं चार वेळा मुख्यमंत्री पद सांभाळलं. राजकारणात असतांना ७ वेळा आमदार, ७ वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व  केलं. केंद्रात १० वर्ष संरक्षणमंत्री आणि कृषिमंत्री सारख्या महत्वाच्या पदांना सन्मानानं भूषवलं.

राजकारणात असतांना काँग्रेस पक्षातून सुरवात करून पुलोद सारखी आघाडी उभारण्याचा यशस्वी प्रयत्न केला. राजकारणातील काँग्रेस नेतृत्वाला विरोध करून स्वपक्षाची "राष्ट्रवादी काँग्रेस" म्हणून निर्मिती केली.

राजकारणाबरोबर खेळात बिसिसिआय बरोबर आंतरराष्ट्रीय आयसीसीआय ह्या क्रिकेट संघटनेचं यशस्वी नेतृत्व केलं. कुस्ती, कब्बडी सारख्या मातीतल्या खेळांचं नेतृत्व करतांना त्यांना जागतिक स्थरावर नेण्यात महत्वाची भूमिका घेतली. उद्योगक्षेत्र असो वा शेती प्रत्येक क्षेत्रात अभ्यास करून देशाच्या विकासात योगदान दिल.


पवार साहेब कधीच कुणाला समजले नाहीत, कारण पवार साहेब कुठलंही वक्तव्य करतात त्याचा राजकीय पटलावर मोठा परिणाम होतो. राजकारणाचा नवा अध्याय लिहितांना राजकारणातील प्रत्येक शैलीला नवा आकार देत आपलं राजकीय अस्तित्व कायमस्वरूपी अबाधीत ठेवलं. राजकारणात पवार साहेब काय निर्णय घेतील हे स्वतःला राजकारणातले चाणक्य समजणार्यांनाही पवार साहेब कधी समजले नाहीत म्हणून 'महाविकासआघाडी' सारखा नवा प्रयोग करण्यात ते यशस्वी झालेत. 

महाराष्ट्राचं मराठी माणूस म्हणून प्रंतप्रधान होण्याचं स्वप्न पवार साहेबांच्या माध्यमातून होण्याची आशा कदाचित पवार साहेबाच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयामुळे अधुरी राहिली. महाराष्ट्र मातीला दिल्लीत आणि जागतिक स्थरावर सन्मानाने नेणाऱ्या श्री. शरद पवार साहेबांचा मराठी माणूस म्हणून नक्कीच अभिमान आहे. महाराष्ट्राचं राजकीय वर्चस्व नेहमी अबाधीत ठेवणाऱ्या सत्ताधीश शरदचंद्र पवार साहेबांना ८० व्या वाढदिवशी अनेक शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

थोडं जगूया..

 


गेल्या काही दिवसात माणूस खूपच बदलला असं  म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही. माणसाच्या जगण्याची परिभाषा थोडी बदलतांना डोळ्यांना दिसत आहे आणि मनाला समजतही आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी त्याची धडपड चालू असतांना त्याला नियतीने अनेक गोष्टींवर विचार करण्यास भाग पाडलं आहे. माणूसपण हरवून बसलेल्या माणसाला माणुसकी टिकवून माणसासाठी धावून जाण्यासाठी सृष्टीच्या निर्मात्याने भाग पाडलं आहे.


माणसाच्या जगण्याची परिभाषा बदलत असतांना रोजच्या जगण्यातून बाहेर पडून माणूसपण निभावणं तितकंच महत्वाचं असतं हे आता समजायला लागलं. रोजची धावपळ तर आहेच आणि ती थांबणारही नाही आणि ती थांबली तर काय होत, हेही ह्या संकटात शिकायला भेटलं. रोज जीवन जगताना कुठेतरी थांबाव हे हि जाणवायला लागलं. थोडं थांबून स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी वेळ देणंही तितकंच महत्वाचं वाटू लागलं. हाताची चुटकी वाजवी तसं आपल्यातलं कोणीतरी सोडून जात आणि मग मनात विचार यायला लागतो आपण खरंच जगतो का? आपलं जीवन एका चुटकीसारखं झालं असतांना आपण माणूस म्हणून जगतो का? सुखदुःखाच्या कसरतींवर आपण स्वतःचा तोल सांभाळत जगतो का? 


भूतलावर आलेल्या संकटातून माणसाची झोप मात्र नक्की उडाली. हेवेदावे, राग, लोभ, द्वेष, मत्सर करत असतांना आपल्यातील माणूस अचानक संकटाच्या लाटेत सापडतो आणि आपल्यातून कायमचा निघून जातो. आपल्यातून माणूस गेल्यावर मग मनात विचार येऊ लागतात आणि स्वतःलाच प्रश्न पडतात आपण नातं जपतो का? माणूस आपल्यात असतांना आपण त्याला किती आनंद दिला? त्याला किती वेळा भेटलो? त्याला किती वेळा आपुलकीने विचारलं? अशा अनेक प्रश्नानंतर उत्तर भेटत "कुठंतरी चुकलं.. आणि हे कसलं जगणं ? आणि हे कसलं माणूसपण?".


आपल्यातील माणूस हरपण्याआधी आपण स्वतःत बदल करूया. कुणाचा राग येत असेल तर त्यावर नियंत्रण मिळवून समोरच्याला काय चुकतंय ते समजून सांगा. धावपळीच्या जीवनात वेळात वेळ काढून आपल्या माणसांची आपुलकीने चौकशी करा. खूप काही करता आलं नाही तर फोन लावा आणि दोन मिनिटं बोलून विचारपूस करून घ्या. छोट्या छोट्या उत्साहात मोठा आनंद मिळविण्यासाठी त्यात पूर्णपणे सहभागी व्हा आणि सहभागी होता येत नसेल तर त्यासाठी शुभेच्छा द्यायला मात्र विसरू नका. पैसा कितीही असला तरी ह्या संकटात तो माणूस वाचवण्यात तितकासा कामी येत नसल्याचं दिसून आलं, म्हणून पैश्यापेक्षा माणसाला महत्व द्या.. दुसर्यांकडून अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे निभवा. आपल्या कुटुंबाची, समाजाची काळजी घ्या.. सरते शेवटी जीवाचा काहीच भरवसा नाही म्हणून थोडं माणूस म्हणून जगून बघू या..


डॉ. प्रशांत शिरोडे.

राजा माणूस...



छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीला पडलेलं अदभूत आणि अविस्मरणीय जिवंत स्वप्न. संपूर्ण भारत वर्षात शिवरायांचा इतिहास शौर्याची, कर्तृत्वाची आणि नेतृत्वाची शौर्यगाथा शिकवून गेला. आजही त्याच इतिहासाच्या सुवर्णपानांना डोळ्याखालून घालतांना अंगावर रोमांच उभा राहतो..

रयतेच्या मनातील स्वराज्याची उभारणी करून रयतेच्या मनात एक वेगळा आत्मविश्वास शिवाजी महाराजांनी निर्माण केला. बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना बरोबर घेऊन रयतेला आपलं आपलंस वाटणार स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज.. महाराज रयतेला अगदी सहजपणे भेटून रयतेच्या मनातील गोष्टींना समजून घेत असत आणि त्यामुळे रयत खुश होत असत. असाच अविस्मरणीय अनुभव खासदार छत्रपती संभाजी महाराजांना भेटून आला.

खासदार छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांच्या घराण्यातील छत्रपती घराण्याला शोभणारा राजा माणूस. एक उत्तम शरीरयष्टी असून चेहऱ्यावर एक वेगळं तेज असणारा शोभिवंत राजा माणूस. सामन्यातील सामान्य माणसाशी अगदी सहजपणे बोलणारा राजा माणूस. छत्रपतींच्या घरात जन्माला येवून छत्रपतींच्या वागणुकीला आत्मसात करून रयत हित जोपासणारा राजा माणूस.

स्वतःला राजा म्हणावं किंवा स्वतःला खासदार म्हणून मानपान द्यावा किंवा छत्रपतींचा वारसदार असल्यानं विशेष वागणूक मिळावी अशा  कुठल्याही अपेक्षा न ठेवणारे संभाजी राजे. उच्चविभुषित असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणून येत. त्यांच उत्तम मराठी किंवा इंग्रजी भाषेतील संभाषण मनाला भावून जात. समोरच्याच म्हणणं अगदी शांतपणे ऐकून त्याच्या मनाचं समाधान करण्याचा त्यांचा प्रयत्न काही वेगळाच असतो.

एका ऐतिहासिक पुस्तकाच्या संदर्भात त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांना भेटल्यानंतर छत्रपतींचा वंशज इतका प्रभावी असेल तर छत्रपती शिवाजी महाराज कसे असतील? याचा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. स्वतःला राजा न म्हणून घेता स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि छत्रपती घराण्याचा वारस असल्यामुळे समाजाचं आपण देणं लागतो अशी मनाशी भावना ठेवणाऱ्या छत्रपती वारसदार छत्रपती संभाजी राजांना मानाचा मुजरा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...