काळीज बापाचं..



घरात मुलगी जन्माला आली का सगळ्यात जास्त आनंद बापाला होतो आणि तो बाप त्या आनंदात साऱ्या गावाला बर्फी वाटत "लक्ष्मी" जन्माला आल्याचं सांगत फिरतो. जन्माला आल्यापासून तिच्या लग्नापर्यंतच स्वप्न बाप मुलीच्या जन्माच्या दिवसापासून बघतो. मुलीला नेहमीच राजकन्येसारखं ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मुलीवर तसं बापाचं आईपेक्षा थोडं जास्तच प्रेम असत. लहानाचं मोठं केल्यानंतर पोटाचा तुकडा दुसऱ्याच्या स्वाधीन करताना त्याच काळीज तुटू लागत, म्हणून प्रत्येक बापाचा प्रयत्न असतो कि आपली मुलगी चांगल्या वातावरणात, चांगल्या कुटुंबात, चांगल्या मुलासोबत संसारात रमावी.

एकदा एका बस स्थानकावर रात्रीच्या वेळेस एक प्रेमीयुगल चिंतेत बसलेलं होत, त्यांच्या चेहऱ्यावर काळजीच सावट दिसत होत. त्यांच्या शेजारी एक सदपुरुष गावाला जाण्यासाठी शेवटच्या गाडीची वाट पाहत आपल्या विचारात गुंतून बसलेला होता. त्या सद्पुरुषाचं अचानक त्या प्रेमीयुगलांकडे लक्ष जात आणि त्याला न राहता त्यांच्याशी बोलावसं वाटलं. तो आपसूकच त्यांच्याशी संवाद साधायला सुरवात करतो "पोरांनो घरातून निघून आलात का रे? आला असाल तर आईबापाला सांगितलं नसेल ना? अरे माझी पण तुमच्यासारखी एकुलती एक मुलगी होती! माझ्या पोरीचं लग्न करण्यासाठी माझ्याकडे पैसा नव्हता, पण माझ्या लेकराचं चांगलं व्हावं म्हणून नोकरीवाला मुलगा बघितला, नोकरीवाला म्हंटला म्हणजे त्यांच्या अपेक्षा मोठ्या, त्याप्रमाणे त्याने मोठं तोंडही फाडल. सगळं ठीक होत म्हणून मी माझ्याकडच् सगळं गहाण ठेवलं, जीव सुद्धा गहाण ठेवला आणि पोरीचं लग्न ठरवलं. सगळी तयारी झाली, कपडेलत्ते झाले, पाहुणेरावळे आले. उद्या लग्न आणि माझी मुलगी आज घरातून निघून गेली, माझं काळीजच चिरलं गेलं रे बाळांनो.. तिला जायचं होत तर मला सांगितलं असत, मी काहीतरी बघितलं असत रे.. काय चुकलं होत रे माझं..?" आणि तो बाप न राहता ढसाढसा रडू लागला.. ते प्रेमीयुगल विचारात गोंधळून एकमेकांकडे पाहू लागले. तो बाप तसाच रडत रडत आपली गाडी आल्यामुळे तिथून उठून निघून गेला..

आई निर्विवाद सत्य आहे पण बाप तितकाच सत्याचा महामेरू आहे. मुलींनी विचार करावा तितकाच मुलानेही करावा, पण मुलीने थोडा जास्त करावा कारण मुलींसाठी बापानं काळजाचं पाणी थोडं जास्तच केलेलं असत. जन्माला आलेल्या मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं म्हणू तिच्या लहानपणापासून ते लग्नापर्यंत तो आपल्या जीवाचं रान करून मुलीचं स्वप्न पूर्ण करतो. प्रश्न पडतो मग प्रेमाचं काय? प्रेम हा प्रत्येकाचा वैयक्तिक विचारसरणीवर अवलंबून असणारा विषय आहे. पण मुलीने आयुष्याचा मोठा निर्णय घेण्याअगोदर बापाच्या काळजाचा विचार करायला हवा. गोष्ट करायला सोपी असते पण तिचे परिणाम बापालाच माहित असतात. मुलीच्या हातून अस काही घडल्यानंतर सुद्धा त्याची वाचा कुठे न करता उरलेलं आयुष्य त्या गोष्टीभोवती कुडत काढतो तो बापचं असतो.

माझी छकुली नेहमीच राजकन्येसारखी राहो आणि तिला भेटणारा राजकुमार तिला माझ्यापेक्षाही जास्त प्रेम देवो हीच इच्छा बापाच्या मनात असते आणि त्याच काळीज त्यासाठीच तळमळत असत.. शेवटी रक्ताचं नातं आणि मनाने जोडलेलं नातं ह्यात थोडातरी फरक तर असतोच ना! विचार तर व्हायलाच हवा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

पांडुरंग पांडुरंग..



भूतलावावर मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो सर्वदृष्ट्या संवेदनशील आहे. संवेदना ज्याला जाणता येतात तोच खरा मनुष्य.. भगवान श्रीकृष्णाने "गीता" सांगताना अजुर्नाला मनुष्य जीवनाची संवेदना समजावून सांगितली. गीता म्हणजेच मनुष्य जन्माचा सार. "गीता से क्या नाता है, गीता हमारी माता है" ह्या संदेशाचा प्रसार करून गीतेचा अर्थ प्रात्यक्षिकरित्या समजावून सांगणारे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते "पांडुरंग शास्त्री आठवले" यांचा आज जन्मदिवस. हा दिवस स्वाध्याय परिवाराकडून "मनुष्य गौरव दिवस" म्हणून साजरा केला जातो.

"माणूस अस्वच्छ किंवा रोगी राहू शकतो, माणूस अशिक्षित किंवा गरीब राहू शकतो, पण माणूस अस्पृश्य किंवा अपिवत्र राहू शकत नाही, कारण मानवी शरीर हे परमेश्वराचं मंदिर आहे". मनुष्याप्रती असे संवेदनशील आणि गौरवाचे विचार असणारे पांडुरंग शास्त्री आठवलेंचा जन्मदिवस म्हणजेच "मनुष्य गौरव दिवस". "पांडुरंग शास्त्री वैद्यनाथ आठवले" यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० साली रोहे ह्या कोकणातील गावात झाला. संस्कृत, न्याय, वेदांत, भारतीय साहित्य आणि इंग्रजी साहित्यावर त्यांचा विशेष अभ्यास होता.

मानव शांती, भावकृषी, भक्तीफेरी अश्या नवनवीन संकल्पना देऊन त्यांनी मनुष्यसेवेतून देश सेवा केली. त्यांच्या कार्याची सुरवात त्यांनी स्वतः पायी गावोगाव फिरून केली. लोकांना भावाबहिणी सारखं घडवलं. स्वाध्याय कार्य हे स्वखर्चातून, स्वप्रेरणेतून केलं जात. एक वेगळी शिस्त ह्या कार्यात दिसते. साधारणतः महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात ह्या कार्याचा विशेष प्रभाव आहे. ह्याच कार्याचा प्रसार करण्यासाठी मुंबईतील माधवबाग येथील श्रीमद्भगवद्गीता पाठशाळा आणि ठाणे येथील तत्वज्ञान विद्यापीठाची स्थापना केली.

मनुष्याचं माणूसपण जागृत करण्यासाठी आयुष्यभर कार्य करताना कुठल्याही चर्चेत न राहता आपलं कार्य निस्वार्थपणे पुढे नेताना आपल्या अनुयाना त्याच गोष्टीची शिकवण देणारे परमपूज्य पांडुरंग शास्त्रीना प्रेमाने "दादाजी" म्हणजेच मोठ्या भावाच्या नावाने संबोधलं गेलं. त्यांच्या ह्या कार्याची दखल घेत अनेक जागतिक आणि भारतीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं त्यात रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार आणि पद्मविभूषण सारख्या उल्लेखनीय पुरस्कारांचा सहभाग आहे. मनुष्याचं माणूसपण जपण्यासाठी स्वतःच आयुष्य निस्वार्थपणे घालवणाऱ्या महात्म्याला जन्मदिनी भावपूर्ण श्रद्धांजली..

डॉ. प्रशांत शिरोडे..

माझ्या स्वप्नातील भारत..



स्वप्न म्हंटल कि झोपेतून उठल्यावर एक छानस कुठल्यातरी दुनियेची सफर करून आल्यासारखं वाटत ना? कधी परीचा सहवास तर कधी चांदोमामाचा सहवास, कधी राजकन्या तर कधी जलपरी.. स्वप्न बाकी काहीतरी वेगळंच असत. प्रत्यक्षात घडत नसलं तरी ते काही क्षणासाठी खूप आनंद देऊन जात. पण माझं स्वप्न काही वेगळंच आहे. मी ते स्वप्न मनातून बघते आणि त्याची वाट उघड्या डोळ्यांनी बघते.. तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना नक्की कस असेल हे स्वप्न?

माझ्या मनातील स्वप्नाला कसं व्यक्त करू तेच समजत नाही. थोडं मन गोंधळून जात. "भारत माता कि जय" म्हणताना जो आत्मविश्वास भरून येतो ना तो आत्मविश्वास ह्या भारतमातेबद्दल मी बघितलेल्या स्वप्नाबद्दल येतच नाही?  हो, हे भारत भूमीच्या कल्याणासाठी मी बघितलेलं स्वप्न आहे.. भारत एकमेव देश आहे जिथल्या भूमीला माता म्हंटल जात आणि त्याच भूमीत स्त्रीला कुठेतरी कळत नकळत दिली जाणारी दुय्यम वागणूक माझ्या मनाला स्वप्नाच्या दुनियेकडे घेऊन जाते..

स्त्रीसाठी सुरक्षित, सुशीक्षीत भारत पाहण्यासाठी मला स्वप्न बघावं लागत हेच आमचं दुर्दैव. रस्त्यावर चालणाऱ्या आईबहिणीची छेड असो वा त्यांच्यावर सहजपणे होणारे बलात्कार असो.. हे निंदनीय कृत्य संपवण्याच माझं स्वप्न आहे.

आपल्याला आई हवी असते, आपल्याला बहीण हवी असते, आपल्याला बायको हवी असते मग आपल्याला मुलगीच का नको असते? प्रश्न स्वाभाविक आहे. स्त्रीभ्रूण हत्येला पुरुषप्रधान संस्कृती नाही तर अखंड समाजव्यवस्थाच जबाबदार आहे, मग त्यात स्त्री वर्गाचा सुद्धा तितकाच वाटा आहे. माझ्या वंशाचा दिवा हा मुलगी व्हावी हि प्रथम स्त्रियांची इच्छा व्हावी हे माझ्या स्वप्नातील भारताचं बघितलेलं स्वप्न आहे.

आताच झालेल्या दहीहंडीच्या उत्सवाच्या वेळेस एका लोकप्रतिनिधीने मुलीला लग्नासाठी पळवून नेण्याचं धाडसी वक्तव्य केलं. माझा प्रश्न आहे कि पळवून घेऊन जाणाऱ्या मुलीच्या आईवडिलांचा जन्मापासून तर आजपर्यंतच्या स्वप्नाचा विचार बोलण्याआधी केला होता का? अशी बेताल वक्तव्य आणि असह्य चर्चाना विराम माझ्या भारतात लागावा हे माझं स्वप्न आहे.

जिजाऊंचे संस्कार, राणी लक्ष्मीबाईंचे शौर्य आणि सावित्रीबाईंचे शिक्षण समस्त समाज बांधवांच्या मनात रुजाव आणि भारतभूमीसाठी स्त्री पुरुषानं एक दिलान काम करावं हे माझं स्वप्न आहे.

सभोवताली अनेक गोष्टी घडताना परस्रीला आई म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आणि भारत देश कुठे हरवलाय? हे विचार टिकून राहावे आणि स्त्रीचा सन्मान सगळ्या स्थरातून व्हावा हे माझं स्वप्न आहे.

कधी शांततेत विचार करा? नऊ महिने स्वतःच्या पोटात अगदी अलगदपणे आपल्याला वाढवणाऱ्या आईच्या वेदना काय असतील? एका जीवापासून दुसऱ्या जीवाला जन्म देताना तिचा नवा जन्म होतो, ह्या जन्माच्या स्त्री पर्वाचा विचार का होत नाही? लहानाचं मोठं करताना स्वतःची इच्छा बाजूला ठेवून आपल्यासाठी झटणारी मायमाऊली कधी स्वतःच्या इच्छेसाठी जगेल? प्रश्न स्वाभाविक आहेत पण उत्तर पण तितकेच विचारपूर्वक आहेत. हे प्रश्न समजून घेणारा समाज हा माझ्या स्वप्नातील भारत आहे..

चला तर मग स्री शक्तीला बळ देऊन माझ्याच नव्हें तर आपल्या सगळयांच्या स्वप्नातील भारताकडे आतापासूनच वाटचाल करूया आणी भारत मातेला अभिमान वाटेल असा भारत देश घडवूया..

जय हिंद.. जय महाराष्ट्र..

तुमचीच,
एक महाराष्ट्र कन्या..

डॉ. प्रशांत शिरोडे..

बहादूर पंतप्रधान ...


भारतभूमी स्वातंत्र्याच्या आनंद सागरात डुबलेली असताना, पंतप्रधान नेहरूंच्या १७ वर्षाच्या कार्यकाळानंतर स्वतंत्र भारताला दुसरे आणि कधीही चर्चेत नसलेले जे पंतप्रधान लाभले ते म्हणजे "लाल बहादूर शास्त्री". शास्त्रीजींचा जन्म ०२ ऑक्टोबर १९०४ रोजी झाला. भारताच्या  स्वातंत्र्यानंतर​ मंत्रिमंडळात गृहमंत्री, रेल्वे, वाहतूक व दळणवळण मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारून आपल्या कार्याची छबी उमटवणारे सर्व साधारण व्यक्तिमत्त्व म्हणजेच लालबहादूर शास्त्री.

भारतीय स्वतंत्र लढ्यात विशेष सहभाग असताना कधीही प्रसिद्धीस अग्रक्रम न देणारे स्वातंत्र्यसैनिक. स्वतंत्र पंजाबी सुभा (स्वतंत्र पंजाब राष्ट्र​), द्रविडस्थान (स्वतंत्र दक्षिण राष्ट्र), दक्षिणेतील राज्यातील हिंदीचा विरोध अशा अनेक आंदोलनांना अतिशय योग्य पद्धतीने हाताळणारे नेते म्हणून लालबहादूर शास्त्रीना ओळखलं जात. अतिशय साधी राहणीमान, प्रभावशाली नेतृत्व क्षमता असलेला वेगळा राजकारणी. "जय जवान, जय किसान" हि ऐतिहासिक घोषणा जनमानसात देऊन "मूर्ती लहान पण कीर्ती महान" ह्या संज्ञेला सार्थकी ठरवणारे लालबहादूर शास्त्री.

स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानबरोबरच्या दुसऱ्या युद्धात भारतीय सैन्याची धडक थेट कराची शहरापर्यंत धड्कावून तत्कालीन पाकिस्तानचा सर्वेसर्वा आयुब खानाचं वस्रहरण करणारे पंतप्रधान. देशाची गरिबीची परिस्थिती बघून स्वतः एक वेळेचं जेवण बंद करणारे खरे प्रधान सेवक. कुठल्याही प्रवासात देशहिताच्या निर्णयासाठी वाचन करणारे विचारी व्यक्तिमत्व. रशियातील बहुद्देशीय शांतता करारावर सही केल्यानंतर अवघ्या सात-आठ तासातच अचानक मृत्यूने रशियातच त्यांच्यावर घाव घातला. त्यांच्या ह्या मृत्यूचं कारण अजूनही अनुत्तरीतच आहे.

भारतमातेचा हा बहादूर पुत्र कधीही द्वेषाने लाल न होता शास्त्रशुद्ध पद्धतीने देशहितार्थ निर्णय घेणारा एकमेव द्वितीय नेता होता. महात्मा गांधींच्या जन्मदिनी जन्माला येणाऱ्या खऱ्या महात्म्याला इतिहासाने पाहिजेल तेवढा आदर न केल्याचं दुर्दैवच म्हणावं लागेल. आजच्या स्वयंघोषित प्रधान सेवकाने ह्या खऱ्या प्रधान सेवेकाचं आदर्श घेऊन भारतभूमीची सेवा करण जास्त महत्वाचं ठरेल . देशाने शास्त्रीजींना "भारतरत्न" हा गौरव देऊन ह्या पुरस्काराचं महत्व वाढवलं अस म्हंटल तर वावगं ठरणार नाही. लालबहादूर शास्त्रीजींना जयंती निम्मित भावपूर्ण श्रद्धांजली.

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...