कलाम आणि कलम ...


हिंदुस्थानाच्या वैचारिक इतिहासाचं सुवर्ण पुष्प म्हणजे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम). प्रभू रामचंद्रांच्या सहवासाने पावन झालेल्या रामेश्वरम ह्या भूमीत एका गरीब मुस्लिम घराण्यात जन्माला आलेला अस्सल हिरा. वडील रामेश्वराला आलेला भाविकांना होडीतून धनुष्कोडीला घेऊन जाण्याचा व्यवसाय करत. लहान वयात वडिलांचं मायेचं छत्र हरवल्यामुळे त्यांच्या शिक्षणाच्या इच्छेवर प्रश्नचिन्ह उभं राहील. कलामांनी वर्तमानपत्र विकून आणि छोटीमोठी काम करून आपला शिक्षणाचा प्रवास चालूच ठेवला.

कलामांनी आपल्या अदभूत आणि अद्वितीय विचारांच्या प्रभुत्वावर जगभरात छाप पाडली होती. आज पण पुस्तकात किंवा प्रसारमाध्यमातून कलाम सरांचा विचार दिसला तर तो वाचल्या शिवाय डोळ्यांची नजर पुढे सरकत नाही. विचारांमधली हि सकारात्मक आतुरता खूप कमी विचारवंतांच्या वाटेला येते. अब्दुल कलामांना त्यांच्या वैचारिक प्रभावशैलीमुळे भारत सरकारचा सर्वोत्तम "भारतरत्न" पुरस्काराने गौरविण्यात आलं. पदमभूषण आणि पदमविभूषण सारख्या १३ नावाजलेल्या पुरस्कारांनी देशविदेशात सन्मानित करण्यात आलं. विचारांच्या शृंखलेत कलाम सरानी अग्निपंखसारखी १६ पुस्तके लिहली आणि कलामांवर १२ पुस्तके लिहली गेली. कलाम सर तुमची विचारांची शृंखला म्हणजे वैचारिक राजघटनेची कलमच.

सुरवातीला प्रभू राम आणि मुस्लिम धर्माचा उल्लेख हा मुद्दामूनच केला कारण धर्माच्या परिसीमेपलीकडे जाऊन दुसऱ्या धर्माचा आदर करणार व्यक्तिमत्व. कलाम सर अगदी हिंदू धर्मातले बारकावे सुद्धा समजून घेत असत. राष्ट्रपती भवनात दरवर्षी "इफितियार पार्टीच" आयोजन केलं जात. अब्दुल कलामांनी सचिवांकडून खर्चाची माहिती मागवून त्यातून अनाथाश्रमानं किती मदत होईल ह्याची माहिती मागवली आणि अडीच लाखाच्या खर्चात २८ अनाथाश्रमात मदत केली. त्यांनतर स्वतःचे १ लाख देऊन अशाच पद्धतीने मदत करण्यास सांगितली. हे सहसा एवढ्या मोठ्या प्रमाणात अपेक्षित नसतंच. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी रामेश्वरम मंदिराच्या भिंतीवर अब्दुल कलमांची गौरवशाली मूर्ती बसवण्यात आली. माणसाच्या वागण्यावर त्याचा धर्म ठरतो हे ह्या एका विभूतीच्या कार्यावरून समजत.

कलाम सर तुमचं कार्य आणि कार्यपद्धती अगणित आहे. तुम्ही थोडे दिवस असायला हवं होत तुमच्या स्वप्नातील २०२० मधला हिंदुस्थान पाहण्यासाठी. तुमचा मृत्यू सुद्धा विचारांचं अमृत वाटताना एका व्यासपीठावर झाला. आज तुमची तृतीय पुण्यतिथी. तुम्ही विचारांनी खरंच जिवंत आहात आणि वैचारिक गुरुसुध्दा आहात आणि आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा म्हणजे हा दुर्गशर्करायुक्त योगच म्हणावा लागेल.

डॉ. प्रशांत शिरोडे.

आरक्षण कि संरक्षण ??



दिवसभर मनात चाललेल्या ह्या वैचारिक प्रश्नाने बौद्धिक विचारांची थोडी जास्तच परीक्षा घेतली. विषय तसा आजच्या आंदोलनाचा होता पण ह्या आंदोलनाची दिशा योग्यरितीने पुढे सरकते आहे का? ह्या प्रश्नाला उत्तर देताना विचारांची घालमेळ झाली...

१९०२ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे वशंज छत्रपती शाहू महाराजांनी तत्कालीन सामाजिक विषमतेची दरी कमी करण्यासाठी गोरगरीब आणि दिनदलितांना आरक्षण देऊन एक मोठा सामाजिक बदल घडवून आणला होता. शाहू महाराज म्हणजे दिनदलितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेणारे प्रथम समाज प्रवर्तक. हे परिवर्तन केल्यानंतर सामाजिक विषमतेत काही प्रमाणात बदल जाणवत होता, पण कुठेतरी हि दरी अशीच रहावी हि तत्कालीन इंग्रज राज्यकर्त्यांची भूमिका असल्यामुळे तो प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होताना दिसत नव्हता. काही वर्षानंतर हिंदुस्थान स्वातंत्र्याच्या आनंदात डुबलेला असताना सुरवातीच्या १० वर्षांसाठी काही विशिष्ट जातींकरिता राज्यघटनेत आरक्षण हे संरक्षणाच साधन म्हणून ठेवण्यात आलं. इथपर्यंत सगळं ठीक होत, पण राजकीय इच्छाशक्तीना ह्या दुखत्या नसेवर बोट ठेवून ह्या विषमतेतून राजकीय फायदा करताना हे आरक्षण १०-१० वर्ष पुढे ढकलत त्याच्या मुख्य हेतूपासून दूर घेऊन गेला. परिणामी सामाजिक विषमता कमी होण्याऐवजी ती वाढत गेली. सामाजिक आरक्षणामुळे संरक्षणाच्या पांघरुणाखाली जातीय व्यवस्था झाकली गेली. शाहू महाराजांचा हेतू साध्य झाला असताना ती गोष्ट एक विशिष्ट वर्गाला पूरक ठरून दुसऱ्या वर्गाला वंचित ठेवू लागली आणि त्याचा हळू हळू आवाज निघताना आज उद्रेक पाहायला मिळाला.

सध्य स्थितीत आरक्षण असावं नसावं हे मुळात राजकीय इच्छा शक्तीवर अवलंबून आहे. राजकीय फायद्यासाठी यावरून नेहमीच मतांतर दिसून येत. देशाच्या प्रगतीत आरक्षण कुठं तरी आडवं येत असताना, देशाच्या प्रगतीच संरक्षण मात्र धोक्यात जाताना दिसत आहे. पाश्च्यात देशात असली आरक्षणाची संरक्षण नसल्यामुळे प्रगतीचा विकासरथ हा नेहमीच गुणवतेच्या जोरावर घौडदोड करताना दिसत आहे. आतापर्यंत हिंदुस्थानात ५१% आरक्षण देताना नवीन आरक्षणाची तरतूद करण्यासाठी न्यायालयीन लढा सरकारी पक्षाला द्यावा लागतोय आणि तो कितपत यशस्वी होईल ह्यात संभ्रम तर आहेच. मुख्यतः आरक्षण हे शिक्षण आणि नोकरी ह्या दोन मूलभूत गोष्टीतून पोटाच्या खळगीचं संरक्षण करण्यासाठी लागत आणि हा आटापिटा त्याच गोष्टींसाठी आहे हे स्पष्टपणे दिसून येत. असो एक गोष्ट नक्की आहे कि आरक्षणामुळे सर्वात जास्त फटका खुल्या प्रवर्गाला बसतोय. कदाचित हि वाढणारी खदखद कमी करण्यासाठी, एकतर सर्वाना आरक्षणाचं १००% विभागून संरक्षण द्यावं नाही तर सर्रास गुणवतेच्या आणि आर्थिक निकषांच्या जोरावर आरक्षणाचं संरक्षण द्यावं हीच योग्य भूमिका राहू शकते .

आज हा प्रश्न उपस्थित होतोय तो "जातीय सलोखा" ह्या मूलभूत विचारस्तंभासाठी. आरक्षण हे शस्त्र ह्यासाठीच बनवण्यात आलं होत पण तेच शस्त्र आज माणुसकीच संरक्षण करण्याऐवजी "जातीय तेढ" निर्माण करत आहे. सर्व समाज एक हिंदुस्थानी म्हणून राहण्यासाठी "समान नागरिक कायद्याच्या" नवीन सूर्योदयाकडे हिंदुस्थानाने लवकर जावो हीच सद्धीचा. शेवटी प्रत्येक विश्लेषणाला प्रश्न मात्र एकच "आरक्षण कि संरक्षण?".

(टीप: ह्या लेखातील सर्व विश्लेषण हे माझं वयक्तिक मत आहे ह्यातून कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू मुळीच नाही).

डॉ. प्रशांत शिरोडे.

सोहळा पंढरीचा...


उन्हाळा संपला कि पावसाळ्याची चाहूल लागते. चातक पक्ष्याप्रमाणे शेतकरी राजा पावसाची वाट पाहत असतो. पाऊस पडला कि जमीन तयार करून शेतकरी राजा पेरणी करतो आणि पेरणीनंतर त्याला चाहूल लागते ती पंढरीच्या राजाला भेटायची.. आषाढी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेण्याची.

महाराष्ट्राचं कुलदैवत "विठ्ठलरुक्मिनी" म्हणजेच सर्वांची "माऊली". माऊली म्हणजे आई आणि विठूमाऊली हि ह्या जगाची माऊली आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे माऊलीच्या दर्शनाला दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी पौर्णिमेला पायी वारी करत जाणारी भक्त मंडळी. महाराष्ट्रात नव्हे, हिंदुस्थानात नव्हे तर जगात परमेश्वराच्या दर्शनासाठी एकाचवेळी लाखोच्यां प्रमाणात पायी अनेक अंतर वारी करणारा एकमेव सोहळा म्हणजे "पंढरीची वारी".

संत ज्ञानेश्वरांनी सुरु केलेला हा सोहळा पुढे संत नामदेव, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत जनाबाई, संत तुकाराम महाराज.. अश्या अनेक संतांनी अनुभवला. अनेक संकटांच्या छायेत शिवरायांसारख्या महाविभूतींच्या भक्तीमुळे हा सोहळा आजतागायत भक्तिभावाने पार पडत आहे. सर्व जाती धर्माचे लोक ह्या सोहळ्याचा आनंद लुटतात. टाळमृदूंगाच्या मधुर धुणीत, नाचण्याचा धुंदीत, अभंगांच्या भक्तिसागरात मन भारावून माऊलीच्या दर्शनासाठी आतुरलेले असतात. मायमाऊली आपल्या डोक्यावर तुळसी घेऊन रुक्मिणी दर्शनाला पायी वारी करतात.

हा अदभूत सोहळा एकदा तरी अनुभवणं आणि माऊलीच दर्शन घेणं म्हणजे जीवनाचं सार्थक होणं. वैष्णवांच्या सोहळ्याचं आनंद वर्णन करावं तर म्हणावसं वाटत..
"भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली...
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली...
जरी बाप साऱ्या जगाचा परी तू
आम्हा लेकरांची विठू माऊली..."

आषाढी एकदशीच्या हार्दिक शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

सुवर्ण स्वप्न..



"हिमा दास" काही तरी नवीन नाव वाटलं ना. हो नवीनच आहे. कालपर्यंत प्रसिद्धीमाध्यमांना सुद्धा हे नाव माहित नव्हतं. हिंदुस्थानातील पूर्वेकडील आसाम राज्यातील नागावमधील धिंग ह्या गावातील रोंजीत दास ह्या शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेली विक्रमवीर मुलगी...

लहानपणापासून भाताच्या शेतातल्या चिखलात फुटबॉल खेळणारी मुलगी. फुटबॉल मध्ये तिला देशासाठी खेळायचं स्वप्न होत. खेळाच्या आवडीमुळे जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळताना, ती निपोन दास ह्या प्रशिक्षकाच्या नजरेत पडली. निपोन ह्यांनी हेमाच्या पायाच्या गतीला आतंरराष्ट्रीय स्थरावर नेण्याचा मानस मनाशी धरला आणि त्यासाठी त्यांनी सुरवात केली. तिच्या पुढच्या प्रवासासाठी तिला गुवाहाटीला न्यायचं होत. निपोन यांनी तिच्या वडिलांना विचारणा केल्यावर तिच्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला. निपोन यांनी तिला प्रशिक्षणासाठी गुवाहाटी नेण्यासाठी तिच्या वडिलांना सारखा आग्रह धरला आणि खूप दिवसांनंतर तिच्या पालकांनी तिला पुढील प्रवासासाठी होकार दिला. घरापासून १४० किलोमीटर असलेल्या गुवाहाटीत तिच्या राहण्याची व्यवस्था आणि तिच्या प्रशिक्षणाची जबाबदारी प्रशिक्षकांनी घेतली.

हिमा आपल्या प्रशिक्षकांच्या प्रयत्नांना आणि देशासाठी खेळण्याच्या इच्छेला पूर्णपणे दाद देत होती. एक एक स्पर्धेत भाग घेताना ती कॉमोनवेल्थ पर्यंत पोहचली आणि १८ महिन्यानंतर तिची धडक फिनलँडमध्ये २० वर्षाखालील आय. ए. ए. एफ. आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहचली. दोन दिवसापूर्वी हिमा ह्या स्पर्धेसाठी देशासाठी काहीतरी करून दाखवणाच्या इच्छेने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उतरली. देशाचं नाव उंच करण्यासाठी मैदानात उतरल्यावर ध्येय समोर ठेवून धावताना सुरवातीला रोमानिया आणि अमेरिकेच्या खेळाडूंच्या मागे होती, पण शेवटच्या काही क्षणात तिने प्रयत्ननाची पराकाष्टा करताना अचानक आघाडी घेऊन देशाला ५१.४६ सेकंदाद प्रथम सुवर्णपदक जिंकून विक्रम प्रस्थापित केला. देशाचा झेंडा पाठीवर घेऊन मैदानावर चालताना लहानपणीच देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्थरावर न्यायचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद दिसत होता. पदक ग्रहण समारंभ नंतर राष्ट्रगीतासोबत देशाचा झेंडा फडकताना तिच्या डोळ्यातून आसू येत असताना देशासाठी अभिमानच स्वप्न पूर्ण झाल्याचा भाव दिसत होता. ह्या विक्रमाबरोबर धावण्याचा विक्रमवीर मिल्खासिंग यांचं हे एक स्वप्न हेमानी पूर्ण केलं होत.

स्पर्धा संपल्यानंतर हेमाने तिच्या वडिलांना फोन वरून आपल्या यशाचं कौतुक सांगताना बोलली कि "तुम्ही सगळे झोपलेले असताना (भारतीय वेळेनुसार रात्र) मी देशासाठी सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास घडवला", तेव्हा तिच्या वडिलांनी डोळ्यात अश्रुना वाट करून देत तिला बोलले कि "बाळा तू जेव्हा देशासाठी विक्रम रचत होतीस तेव्हा आम्ही सगळे आणि आपला गाव तुला टीव्हीवर पाहत होतो आणि तुज्या विक्रमाचा आनंद साजरा करत होतो". हे ऐकून हेमा अजून भावुक झाली.

एक शेतकऱ्याच्या मुलीने हलाखीच्या परिस्थितीत देशाचं नाव एका विक्रमावर कोरल हे अभिमानस्पद आहे. हिमा तुज्या देशप्रेमाला आणि जिद्दीला मनापासून सलाम...

डॉ. प्रशांत शिरोडे.

पाऊस ..



छान वाटत ना पाऊस पडला तर... उन्हाळा संपत आला कि पावसाची आस लागते. पहिला पाऊस तर मातीशी नातं जुळवताना अदभूत सुगंध देऊन जातो आणि वातावरण प्रफुल्लीत करून जातो. पाऊस कधी बरसतो तर कधी गरजतो. पाऊस हवाहवासा वाटतो पण तो खूप पडला तर नकोनकोसा वाटतो.

लहानपणीचा पाऊस अगदी निरागस. "येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा" अशी निरागस भावना छोट्या पावसात सुद्धा खूप मोठा आनंद देऊन जाते. पाऊस सुरवातीला निरागस असतो आणि तो बरसला तर रागात असतो. वय वाढत तस पाऊसही बदलतो. तारुण्यात तो प्रेमळ होतो आणि प्रेमळ भवनातून तो बरसत असतो. उतार वयात तो थोडा जास्त बरसतो आणि जुन्या आठवणीत बुडवून जातो.

पाऊस हा कोणालाही आवडतो मग तो कमी प्रमाणात असो वा जास्त प्रमाणात. पाऊस सगळीकडे हवाहवासा वाटतो आणि तो सगळीकडे पडावा हि स्वाभाविक भावना असते पण तसं होतच नाही. शेतकरी राजा जास्त आस लावून बसलेला असतो पण पाऊसही त्याची परीक्षा बघतो. जिथे त्याचा थोडा सहवास हवा असतो तिथे तो भरभरून पडतो. कधी खूप सुख देऊन जातो तर कधी संकटाच गणित मांडून जातो. पाऊस मान्सूनमधला गरजेचा आणि सुखावणारा असतो आणि तोच अवकाळी पडला तर दुखावणारा असतो. पाऊस आनंद आणि संकट दोन्ही गोष्टी देतो.

परिस्थिती तशी सांगून येत नाही पण तिच्यातून कस सावरायचं हे खूप महत्वाचं असत. बरसणारा पाऊस लवकर सावर आणि सावरणारा पाऊस लवकर बरस. तू बरसत असताना कुसुमाग्रजांची कविता नक्कीच आठवते... "ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी"..

जिथे खूप पडतोय तिथं थोडी विश्रांती घे आणि जिथे काहीच पडला नाही तिथली गरज भागव. तू परमेश्वराचा अवतार आहेच तशीच तू तुझी कृपादृष्टी ठेव..

डॉ. प्रशांत शिरोडे.

भय इथलं संपत नाही...



रोज घरातून बाहेर पडल्यावर घरी परत पोहचण्याची शाश्वती राहीली नाही. रोजच्या धकाधकीच्या जीवनात जीव मुठीत घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वसामान्याचा चाललेला आटापिटा आता नवीन काही राहिला नाही. वेळेचं सांगितलं नाही तर बरंच.. माणूस जणू घड्याळ्याच्या काट्याला दोन्ही हाथ पकडून गोलगोल फिरून दिवसाचे २४ तास पूर्ण करतोय कि काय? हाच प्रश्न पडतो... हे सर्व करत असताना भय असत ते रोजच्या जगण्याचं.. भय असत ते पोटाच्या खळगीच .. भय असत ते धावत्या वेळेचं..

मुंबईत आल्यावर सुरवातीला ह्या स्वप्ननगरीच भय वाटत. नवीन आल्यावर जगण्याची वेगळीच बाजू मुंबईत बघायला भेटते. सुरवातीला आल्यावर कामाच्या जागेच्या शोधात असतो आणि योग्य ठिकाणी पोहचू का कुणाला पत्ता विचारल्यावर तो बरोबर सांगेल का? जाताना लोकलने गेलो तर गाडीत चढायला भेटेल का? आणि चढलो तर उतरायला भेटेल का? जरी हे सर्व बरोबर झालं तरी वेळेत पोहचेल का? रस्त्यात कुठं अडकणार तर नाही ना? अश्या खूप प्रश्नाच्या भयात अडकतो आणि जीवनाच्या ऐका टप्याचा प्रवास चालू करतो..

लोकल तशी मुंबईला लागलेलं वरदानच.. पायी चालण्यापासून तर वरती आकाशातील दिसणाऱ्या विमानापर्यंत सगळीच प्रवासाची साधन असणार अदभूत शहर. रोजच लोकलने प्रवास करण म्हणजे अर्धा जीव धोक्यात घातल्यासारखाच समजायचं.. जीवाचं रान करून कामावर पोहचणं म्हणजे कुठल्या अटीतटीच्या स्पर्धेत पदक मिळाल्यासारखाच समजायचं.. पण दाद त्या मुंबईकराला तो ह्या कठीण क्षणांना पण सुखमय बनवतो आणि रोजचा दिवस आनंदाने घालवतो. सकाळी घरून निघताना मनात संध्याकाळी घरी पोहचण्याच असलेलं भय संध्याकाळी घरी पोहचलल्यावर येणाऱ्या रात्रीसाठी विसरून जातो.. मुंबईकरांना संध्याकाळी घरी पोहोचण्याचं भय निर्माण झालाय ते लोकलच्या प्रवासाने, येणाऱ्या लोंढ्यांमुळे, वाढत्या जीवनाच्या वेगाने आणि गुंडगिरीच्या विळख्याने.. मुंबईत लोकलचा प्रवास दिवसेंदिवस कठीण होत चालाय. कितीहि लोकल वाढवल्या तरी त्या गर्दीने ओसांडुनच वाहत आहेत. कितीही पर्याय शोधले तरी लोकल तिच्या क्षमतेपेक्षा जास्तच गर्दीला सामावून वेळेच्या बंधनात आपला प्रवास पूर्ण करत आहे. त्या लोकोपायलट च्या डोक्यावर ह्या गर्दीच वेळेत सुखरूप पोहचवण्याचं भय काही संपतच नाही.. हि गर्दी रोजच येतेय आणि शहराला त्याच्या मुख्य ओळखीपासून दूर नेताना दिसतेय.. रोजची येणारी लोंढे थांबली नाही तर रोजच्या प्रवासातील भय कधी संपणारच नाही. रोज येणारे हे लोंढे ह्या भूमीशी आत्मीयता नसल्यामुळे तिच्याशी जुळवून न घेता तिच्यावर आपली सत्ता प्रस्तावित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि स्थानिकांना ह्या गोष्टीच भय वाढतच आहे..

मुंबईची संस्कृती नवीन रूप धारण करतेय पण तिच्या मूळ संस्कृतीला टिकून राहण्याचं भय वाटतंय. मराठमोळ्या माणसाला जगण्याची रोजची शाश्वती दिवसेंदिवस कमी झाल्यासारखी वाटतेय. मायानगरीला जणू संकटाच वेसण लागलंय आणि तीच भय कुणाला का समजत नाही? संस्कृतीच्या वारसदारांना आणि राजकारण्यांना ह्या मुंबापुरीची भयाची अवस्था का दिसत नाही? परप्रांतातून पोटाच्या खळगी साठी आल्यानं इथल्या स्थानिकांची पोटाची खळगी भरलेलीच वाटते आणि ते भेटेल तिथे आपल अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करता आणि मराठमोळ्या स्थानिकाला त्रासदायक ठरता. हे पोटाच्या खळगीच भय कधी संपेल?... पोटाच्या खळगी साठी भरपूरसा मुंबईकर वडापाव ह्या खाद्यपदार्थावर दिवस काढतो आणि पोटाला तात्पुरता भयमुक्त करतो..

मुंबईकर आणि वेळ जणू एकाच नाण्यांच्या दोन बाजू.. धावणारा मुंबईकर आणि घड्याळाची वेळ जणू वेगाची स्पर्धाच करता पण दोन्हींच्या मनात ह्या स्पर्धेतून हरण्याचं भय मात्र बाळगता.. पण ह्या भयापासून मुंबईकर स्वतःला विसरतो आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो आणि गेलेला दिवसानंतर उद्याच्या भयमुक्त दिवसाची प्रार्थना करतो.. वेळ केव्हा कुणावर कशी चालून येईल हे मुंबईत सांगता येत नाही.. मुंबईकर कधी अतिरेक्यांच्या बॉम्बस्फोटाच्या भयात तर कधी पावसाच्या अतिवृष्टीच्या भयात रोजची वेळ तशी काढून नेतो आणि संकटांच्या ह्या शृंखलेला मागे टाकून आपल्या जिवंत असलेल्या आनंदात नव्या दिवसात पुन्हा नेहमीसारखा तयार राहतो.. पण ह्या अनिश्चित संकटांचा भय मात्र मनात ठेवतो..

दैनंदिन भयाच्या वातावरणात मुंबईवर वाढणारा ताण कमी होवो.. इंग्रजप्रेरित बॉम्बेचं असलेलं भय मराठमोळ्या मुंबईन मुक्त केलं आणि आता बम्बईच्या भयात अडकण्याच संकट डोळ्या समोर दिसू लागलंय... आणि म्हणावं लागतं काहीही झालं तरी भय इथलं संपत नाही...

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...