थोडं जगूया..

 


गेल्या काही दिवसात माणूस खूपच बदलला असं  म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही. माणसाच्या जगण्याची परिभाषा थोडी बदलतांना डोळ्यांना दिसत आहे आणि मनाला समजतही आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी त्याची धडपड चालू असतांना त्याला नियतीने अनेक गोष्टींवर विचार करण्यास भाग पाडलं आहे. माणूसपण हरवून बसलेल्या माणसाला माणुसकी टिकवून माणसासाठी धावून जाण्यासाठी सृष्टीच्या निर्मात्याने भाग पाडलं आहे.


माणसाच्या जगण्याची परिभाषा बदलत असतांना रोजच्या जगण्यातून बाहेर पडून माणूसपण निभावणं तितकंच महत्वाचं असतं हे आता समजायला लागलं. रोजची धावपळ तर आहेच आणि ती थांबणारही नाही आणि ती थांबली तर काय होत, हेही ह्या संकटात शिकायला भेटलं. रोज जीवन जगताना कुठेतरी थांबाव हे हि जाणवायला लागलं. थोडं थांबून स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी वेळ देणंही तितकंच महत्वाचं वाटू लागलं. हाताची चुटकी वाजवी तसं आपल्यातलं कोणीतरी सोडून जात आणि मग मनात विचार यायला लागतो आपण खरंच जगतो का? आपलं जीवन एका चुटकीसारखं झालं असतांना आपण माणूस म्हणून जगतो का? सुखदुःखाच्या कसरतींवर आपण स्वतःचा तोल सांभाळत जगतो का? 


भूतलावर आलेल्या संकटातून माणसाची झोप मात्र नक्की उडाली. हेवेदावे, राग, लोभ, द्वेष, मत्सर करत असतांना आपल्यातील माणूस अचानक संकटाच्या लाटेत सापडतो आणि आपल्यातून कायमचा निघून जातो. आपल्यातून माणूस गेल्यावर मग मनात विचार येऊ लागतात आणि स्वतःलाच प्रश्न पडतात आपण नातं जपतो का? माणूस आपल्यात असतांना आपण त्याला किती आनंद दिला? त्याला किती वेळा भेटलो? त्याला किती वेळा आपुलकीने विचारलं? अशा अनेक प्रश्नानंतर उत्तर भेटत "कुठंतरी चुकलं.. आणि हे कसलं जगणं ? आणि हे कसलं माणूसपण?".


आपल्यातील माणूस हरपण्याआधी आपण स्वतःत बदल करूया. कुणाचा राग येत असेल तर त्यावर नियंत्रण मिळवून समोरच्याला काय चुकतंय ते समजून सांगा. धावपळीच्या जीवनात वेळात वेळ काढून आपल्या माणसांची आपुलकीने चौकशी करा. खूप काही करता आलं नाही तर फोन लावा आणि दोन मिनिटं बोलून विचारपूस करून घ्या. छोट्या छोट्या उत्साहात मोठा आनंद मिळविण्यासाठी त्यात पूर्णपणे सहभागी व्हा आणि सहभागी होता येत नसेल तर त्यासाठी शुभेच्छा द्यायला मात्र विसरू नका. पैसा कितीही असला तरी ह्या संकटात तो माणूस वाचवण्यात तितकासा कामी येत नसल्याचं दिसून आलं, म्हणून पैश्यापेक्षा माणसाला महत्व द्या.. दुसर्यांकडून अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे निभवा. आपल्या कुटुंबाची, समाजाची काळजी घ्या.. सरते शेवटी जीवाचा काहीच भरवसा नाही म्हणून थोडं माणूस म्हणून जगून बघू या..


डॉ. प्रशांत शिरोडे.

१३ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...