मोलकरीण ..


संसारातील थोडी जवळची झालेली व्यक्ती. हातावर पोट असणारी हि व्यक्ती आपला संसार करतांना दुसऱ्याच्याही संसाराला हातभार लावते. स्वतःच्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करते. कुठलीही मनात भीती न ठेवता एका अनोळखी परिवारासाठी काम करणारी व्यक्ती म्हणजे मोलकरीण.

कोरोनाच्या संकटात आपल्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी दुसऱ्याच्या घरी कामाला जाणारी हि माउली आज घरीच आहे. लॉक डाऊन चालू झाल्यानंतर सोसायटीच्या वॉचमनने तिला गेटवरच थांबवलं. झालेल्या कामाचे पैसे घेण्यासाठी ती आली होती. आपल्या कष्टाचा पैसा मिळेल पण पुढे काम असेल नसेल ह्याची चिंता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. तिची ती चिंता हेरली आणि अजून पैसे लागत असतील तर सांगा असं विचारलं. ती गरीब माऊली आपसूकच बोलली "नाही जितकं काम केलं तितकेच द्या". गरीब कष्टाळू माणूस किती संतुष्ट असतो त्याची जाणीव झाली. ती नाही म्हंटल्यावर तिला स्वतःहून बोललो "पुढचे काही दिवस कामावर येता येणार नाही तरी तुम्हाला पैसे लागले तर सांगा". माझे बोल संपत नाही तितक्यात तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसला, जणू तिला पैसेच भेटलेत अशी भावना दिसली.

अगदी आठशे नऊशे रुपयांसाठी स्वतःचा संसार चालवून दुसऱ्याच्या घरी काम करणारी स्त्री म्हणजे रनरागीणीच. लोकांच्या वेळेनुसार आपल्या संसाराची सांगड घालणारी हि माउली आपल्या रोजच्या वेळेचं नियोजन प्रभावीपणे करते. तिच्यातील कामाचं कौशल्य, चिकाटी जणू ती स्वतःच्या घरातच काम करते तसंच असत.

कोरोनाच्या संकटात लॉक डाऊन वाढला आणि तिचंही आर्थिक संकट वाढत गेलं. न राहता ती पैसे घेण्यासाठी सोसाईटीच्या गेटवर आली. हातावरच पापी पोट तिला इथपर्यंत घेऊन आलं होत. तिला एका महिन्यांचे पैसे दिलेत आणि पुन्हा पैसे लागतील तर सांगा असंही सांगितलं. पण पुढच्या महिन्यात ती स्वतःच आली नाही. जणू तिने आहे त्याच पैश्यात उदरनिर्वाह करण्याचं शिकून घेतल्याचं जाणवलं.

आपल्याकडे कामाला येणाऱ्या मोलकरणीचे माणूस म्हणून मोल करा आणि संकटाच्या काळात त्या माऊलीला संसारासाठी मदत करा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

२ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...