गायधनी वाडा ..




आपल्या शिक्षणादरम्यान आपण कुठेतरी होस्टेल किंवा भाड्याच्या खोलीत राहतो आणि त्या महत्वपूर्ण टप्यातली ती वास्तू नेहमीच लक्षात राहते, अशीच एक वास्तू म्हणजे "८९८, गायधनी वाडा , रविवार कारंजा, नाशिक" ... हा पत्ता नव्हे तर नाशिकच्या मध्यवर्ती भागात असललेली आयुष्याच्या रस्त्यावरची संस्कारांची एक पायवाट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातून अनेक विद्यार्थी नाशिकला असतांना शिक्षणासाठी या पवित्र वास्तूत वास्तव्यास राहिले आहेत. या वास्तूने अनेक डॉक्टर, सि.ए., इंजिनिअर, शिक्षक, फार्मासिस्ट, लेखक आणि कवी घडवलेत. अनेकांना शिक्षण घेत असतांना आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाण या वाड्यात आवर्जून व्हायची. 

गायधनी वाडा हा सुमारे २०० वर्षांपूर्वी नाशिकच्या पवित्र भूमीत उभा राहिला. या वाड्याने भारतभूमीचा स्वतंत्र लढा, आणीबाणीचा काळ, राजकारणाच्या घडामोडी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्वपूर्ण टप्पे आणि सिनेसृष्टीला अगदी जवळून बघितलं आहे. इतक्या सर्व गोष्टींचा साक्षीदार असलेल्या वाड्याने अनेक विद्यार्थी त्याच दिमतीने घडवलेत. या वास्तूने जगतांना शिस्तीचं महत्व किती असत ते प्रत्येक टप्यावर शिकवलं आणि त्याच शिस्तीने अनेकांचं आयुष्य घडलं.

शिस्त शब्द आला तरी या वास्तूला जोपासणारा आणि विद्यार्थ्यांना शिस्त लावणाऱ्या अवलियाची म्हणजे राजाभाऊ गायधणींची म्हणजेच भाऊंची आठवण येते. भाऊंच्या शिस्तीमुळे अनेक पालकांची आपल्या पाल्याविषयी चिंता मिटायची. वाड्याचे काही खास नियम होते त्यात रात्री १० नंतर प्रवेश बंद, बाहेरील मुलांना प्रवेश बंद, शिक्षणासाठी खोली फक्त, रेडिओ मोबाइलला परवानगी नाही, आडाच्या थंड पाण्याने आंघोळ, गडबड गोंधळ नको आणि या सर्वात महत्वाचं म्हणजे शिस्त मोडणाऱ्या विद्यार्थ्याला "शक्य तितक्या लवकर येऊन भेटणे" अशी भाऊंची चिट्टी मिळायची. या वितिरिक्त भाऊंचं मार्गदर्शन लाभायचं ज्यातून आयुष्याच्या पैलूंचा उलगडा 
व्हायचा.

वाड्यात असतांना १२० रुपये महिन्याचं खोली भाडं आणि १० रुपये वीजबिल अशी भाडे आकारणी असायची. पैसे कमाविण्यापेक्षा विद्यार्थी घडवणं हा त्यामागचा उद्देश होता. रात्री दहा नंतर कधीतरी गुपचूप बाहेर जाण, आडाच्या थंडगार पाण्याने वरती मोकळ्या जागेत अंघोळ करणं, करमत नसतांना मेनरोडवरील गॅलरीत जाऊन उभं राहणं, रात्र रात्र गप्पा आणि मजामस्ती करणं, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं आणि चांगले मित्र भेटणं.. हे सर्व सुवर्णक्षण गायधनी वाड्याच्या आठवणींना नेहमीच उजाळा देतात आणि भविष्यातही देत राहतील..

स्वातंत्र्याच्या सूर्योदयापासून तर यशस्वी विद्यार्थी घडविण्यापर्यंतच्या अनेक क्षणांचा साक्षीदार ठरलेल्या वास्तूचा नाशिकच्या ऐतिहासिक वारशात मोलाचा वाटा होता. आज दोनशे वर्षानंतर हि वास्तू काही कारणांमुळे जमीनदोस्त करण्यात आली. गायधनी वाडा, ८९८, चांदीच्या गणपतीच्या मागे, रविवार कारंजा, नाशिक ह्या कायमस्वरूपी स्मरणात राहणाऱ्या संस्कारी वास्तूला तिच्या लेकरांचा मनापासून दंडवत..

डॉ. प्रशांत शिरोडे.

११ टिप्पण्या:

  1. अप्रतिम लेखन सर्व आठवणी ताज्या झाल्या!👍👌

    उत्तर द्याहटवा
  2. प्रशांत डोळे भरुन आले मित्रा तुझी लेखनी खूप छान आहे लिहीत राहा

    उत्तर द्याहटवा
  3. Memorable days....i was there for almost 6 years ��

    उत्तर द्याहटवा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...