जय हो...



प्रिय भारत माता..

आजचा दिवस संपला. भारताच्या इतिहासातील आजचा दिवस हा विशेष होता. तुझ्या स्वातंत्र्याचा आज अमृतमहोत्सवी दिवस होता. तसं तुला आनंद नक्कीच झाला असेल पण तू स्वातंत्र्यासाठी ज्या अनेक यातना भोगल्या त्याची तुला आठवण नक्कीच झाली असेल. कितीही अघात झाले असतील पण प्रत्येक वेळी तुझाच विजय झाल्याचा इतिहास आमची छाती अभिमानाने फुगवतो. इंग्रज तर शेवटचे १५० वर्ष होते पण त्याआधी मुघलांसारख्या अनेक दृष्ट प्रवृत्तीना तुझ्या लेकरांनी नेस्तनाबुत केलं ह्याची आम्हाला जाण आहे.

आजच्या ७५ वर्षांपूर्वी तू हि स्वातंत्र्याची पहाट पहात असतांना तुझी लेकरं स्वातंत्र्य भारतात सुखी समाधानी असल्याचं, प्रगतीच्या शिखरावर पोहचून जागतिक महासत्ता बनण्याचं स्वप्न बघितलं असेल. पण गेल्या ७५ वर्षात रस्ता आणि रोजच्या सुविधा पुरविण्यातही पूर्णत्वास गेलो नसल्याचं सत्य बघून तू नाराज झाली असेल. अलीकडच्या काळात कुठे आरोग्य आणि शिक्षणावर आम्ही बोलायला लागलो. हा सुवर्णकाळ स्वयंभू होण्यासाठी का कमी पडला याच कुतुहूल तुला नक्कीच असेल. प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या तराजूत मोजली जाते आणि तुझ्यासाठीची राष्ट्रभावना कमी पडतांना दिसते, हे मात्र सर्वात मोठं सत्य आहे आणि त्यामुळे तुझं स्वप्न पूर्ण झालं नसेल याची जाणीव तुलाही असेलच. 

भारतमाता.. जगाच्या पाठीवर तू एकमेव अशी भूमी आहेस तुला आईच्या रूपात तूझी लेकरं बघतात. आजही ७५ वर्षानंतर तुझ्या लेकरांना वीरमरण येतांना खूप वेदना होतात. शेजारील दृष्ट प्रवृत्ती आजही तुझी रात्रंदिवस सुरक्षा करत असलेल्या लेकरांच्या जीवाशी खेळतात. स्वतःचा परिवार सोडून तुझ्या प्रेमापोटी हि लेकरं डोळ्यात तेल घालून शत्रूचा सामना करतात. अमृतमहोत्सवी वर्षातही तू ह्या दुःखाच्या छायेतून मुक्त न झाल्याची यातना आमच्याही मनाला सतावते.

७५ वर्षात ज्या कुणाची सर्वात जास्त कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते, ती म्हणजे सीमेवरील सैनिकांची आणि त्यानंतर ह्या स्वतंत्र लढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची .. तुला खूप दुःख होत असेल आणि तू आपसूकच विचार करत असशील खरंच अमृतमहोत्सवाचा आनंद लुटावा का? जीवन मरण कुणालाही चुकत नाही पण स्वतंत्र भूमीत दैव मरण न भेटता तुझ्या संरक्षणासाठी तुझ्या लेकरांना मरण पत्करावं लागत याच दुःख तुझ्या मनाला बोचत असेल.

असो, संकटांशी दोन हात करण्याची तुझी कसब अनेक शतकांपासून इतिहासाने बघितली आहे. तुला अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा देतांना अमृतमहोत्सवाकडून शतकमहोत्सवाकडे जात असतांना शतकमहोत्सवात तुला स्वातंत्र्याचा पूर्ण आनंद मिळो.. तुझ्या संरक्षणासाठी तुझ्या लेकरांचा हकनाक बळी न जावो.. तुझ्या मनातील खरा भारत निर्माण होवो.. तुझ्या राजकारणी लेकरांना सदबुद्धी देवो. आणि तुझं स्वातंत्र्य अबाधित राहो हीच सदीच्छा..आणि हो सर्वात महत्वाचं तुझा जयजयकार नेहमीच आमच्या मुखी राहो..भारत माता कि जय...जय हो..


डॉ.प्रशांत शिरोडे.

१५ टिप्पण्या:

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...