जाग येऊ दे मायबापा ..


शेतकरी रस्त्यावर स्वतःच्या मागण्यासाठी खूप कमी वेळा उतरतो, कारण त्याला अन्याय सोसायची सवयच झाली आहे. शेतकरी राजा मागील वर्षी संपावर गेला तेव्हाच त्याच्या सहनशीलतेचा अंत झाला होता. पण सरकारने आश्वसनाची यादीच समोर ठेवून बळीराजाला सोयीस्कररीत्या माघार घेण्यास भाग पाडलं होत. आज पुन्हा एकदा १८० किलोमीटर चालून, मुंबईला वातानुकूलित खोलीत बसलेल्या सरकारला दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेचा जाब विचारण्यासाठी शेतकरी राजा विधानभवनाला धडकलाय. अनवाणी पायानं इतकी मोठी पायपीट करून मुंबई गाठताना त्याच्या मनात नक्कीच दोनवेळच्या पोटापाण्याचा, मुलाबाळांच्या शिक्षणाचा आणि मुलीच्या लग्नाचा प्रश्न तर असेलच ना?

काल रात्रीपासून प्रसारमाध्यमात बातमी फिरतेय कि मुंबईतल्या दहावी बारावीच्या विद्यार्थाना परीक्षा स्थळावर पोहचण्यास अडथळा येवू नये म्हणून शेतकरी बांधवानी रात्रीचा विश्रांतीचा मुक्काम न करता, दिवसभराच्या प्रवासानंतर रात्री चालून मुंबई गाठली. स्वतःच्या जीवावर नेहमीच ओढून घेणारा बळीराजा एका रात्रीच चालण्याचं संकट मुंबईकरांच्या मुलांच्या परीक्षेसाठी स्वतःवर घेऊन चालत गेला, म्हणजे त्याच्या समजुदारपणाची पावतीच देऊन गेला. शेतकऱ्याच्या मुलांची पण काळजी घेणार कोणी वाली हवं म्हणून तो दुसऱ्याच्या मुलाला त्रास न होऊ देता स्वतः चालत गेला हे त्याच मोठेपण म्हणणं किंवा दिलदारपणा म्हणल तरी वावगं ठरणार नाही. शेतकऱ्यांच्या मुलांची आपल्याला पण थोडी काळजी वाटायला हवी म्हणून आदोलनाला समर्थन करायला जमत नसेल तर टीका तरी करू नका म्हणजे त्याच मनोबल तरी वाढेल.

सरकारने कर्जमाफी जाहीर करून सहा महिने झाले, अनेक अटीनुसार झालेली कर्जमाफी अजून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचली सुद्द्धा नाही. स्वामिनाथन आयोग फक्त निवडणुकीपुरता समोर आणला जातो आणि नंतर त्यावर भाष्य सुद्धा केले जात नाही. सरकारला विजय माल्या, निरव मोदींसारखे बुडवणारे चालतात पण सामान्य मायबाप शेतकऱ्याचं कर्ज चालत नाही. जगाचा पोशिंदाच उपाशी राहत असण्याइतकी वाईट गोष्ट ह्या भूतलावावर राहूच शकत नाही. शहरात राहून उगाच शेतकऱ्यावर टीका करणार्यानी विचार करा, जर त्याने पिकवल नाही तर तुमचं किती दिवस चालणार? काल मिळणारी कीटकनाशकांची १०० रुपयांची बाटली आता ५०० रुपयाला झाली पण शेतकऱ्याच्या मालाला तेव्हा मिळणारा ५०० रुपये भाव आज पण ५०० च आहे. विचार करा कधी नोकरदाराला आपल्या पगारात वाढ नाही झाली तर कसं वाटत? उद्योगधंदा करणाऱ्याला नफा नाही भेटला तर कसं वाटत? सरकार विचार करत नसेल तर त्याच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्याच मनोबल वाढवण्याचं छोटंसं काम तरी करा.

मागच्या वर्षी आपल्या शेतकरी बापाने आत्महत्या करू नये म्हणून एका मुलीने सरकारला विनंती केली होती कि "आमच्या लग्नापुरता तरी आमचा बाप जिवंत राहू देण्याचं उपकार मायबाप सरकार आमच्यावर करा". मायबाप सरकार तुम्हाला जरी आम्ही निवडून दिलंय तरी आता मायबाप म्हणून संवदेनशील होऊन बळीराजाची आश्वासन न देता प्रत्क्षात मदत करा हीच विनंती. जाग येऊ दे मायबापा. आमचा बाप टिकला तर काळीआई टिकेल आणि काळीआई टिकली तर सामन्याचा पोटाचा प्रश्न सुटेल.

जय हिंद .. जय महाराष्ट्र ..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...