बहादूर पंतप्रधान ...


भारतभूमी स्वातंत्र्याच्या आनंद सागरात डुबलेली असताना, पंतप्रधान नेहरूंच्या १७ वर्षाच्या कार्यकाळानंतर स्वतंत्र भारताला दुसरे आणि कधीही चर्चेत नसलेले जे पंतप्रधान लाभले ते म्हणजे "लाल बहादूर शास्त्री". शास्त्रीजींचा जन्म ०२ ऑक्टोबर १९०४ रोजी झाला. भारताच्या  स्वातंत्र्यानंतर​ मंत्रिमंडळात गृहमंत्री, रेल्वे, वाहतूक व दळणवळण मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारून आपल्या कार्याची छबी उमटवणारे सर्व साधारण व्यक्तिमत्त्व म्हणजेच लालबहादूर शास्त्री.

भारतीय स्वतंत्र लढ्यात विशेष सहभाग असताना कधीही प्रसिद्धीस अग्रक्रम न देणारे स्वातंत्र्यसैनिक. स्वतंत्र पंजाबी सुभा (स्वतंत्र पंजाब राष्ट्र​), द्रविडस्थान (स्वतंत्र दक्षिण राष्ट्र), दक्षिणेतील राज्यातील हिंदीचा विरोध अशा अनेक आंदोलनांना अतिशय योग्य पद्धतीने हाताळणारे नेते म्हणून लालबहादूर शास्त्रीना ओळखलं जात. अतिशय साधी राहणीमान, प्रभावशाली नेतृत्व क्षमता असलेला वेगळा राजकारणी. "जय जवान, जय किसान" हि ऐतिहासिक घोषणा जनमानसात देऊन "मूर्ती लहान पण कीर्ती महान" ह्या संज्ञेला सार्थकी ठरवणारे लालबहादूर शास्त्री.

स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानबरोबरच्या दुसऱ्या युद्धात भारतीय सैन्याची धडक थेट कराची शहरापर्यंत धड्कावून तत्कालीन पाकिस्तानचा सर्वेसर्वा आयुब खानाचं वस्रहरण करणारे पंतप्रधान. देशाची गरिबीची परिस्थिती बघून स्वतः एक वेळेचं जेवण बंद करणारे खरे प्रधान सेवक. कुठल्याही प्रवासात देशहिताच्या निर्णयासाठी वाचन करणारे विचारी व्यक्तिमत्व. रशियातील बहुद्देशीय शांतता करारावर सही केल्यानंतर अवघ्या सात-आठ तासातच अचानक मृत्यूने रशियातच त्यांच्यावर घाव घातला. त्यांच्या ह्या मृत्यूचं कारण अजूनही अनुत्तरीतच आहे.

भारतमातेचा हा बहादूर पुत्र कधीही द्वेषाने लाल न होता शास्त्रशुद्ध पद्धतीने देशहितार्थ निर्णय घेणारा एकमेव द्वितीय नेता होता. महात्मा गांधींच्या जन्मदिनी जन्माला येणाऱ्या खऱ्या महात्म्याला इतिहासाने पाहिजेल तेवढा आदर न केल्याचं दुर्दैवच म्हणावं लागेल. आजच्या स्वयंघोषित प्रधान सेवकाने ह्या खऱ्या प्रधान सेवेकाचं आदर्श घेऊन भारतभूमीची सेवा करण जास्त महत्वाचं ठरेल . देशाने शास्त्रीजींना "भारतरत्न" हा गौरव देऊन ह्या पुरस्काराचं महत्व वाढवलं अस म्हंटल तर वावगं ठरणार नाही. लालबहादूर शास्त्रीजींना जयंती निम्मित भावपूर्ण श्रद्धांजली.

डॉ. प्रशांत शिरोडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...