पांडुरंग पांडुरंग..



भूतलावावर मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो सर्वदृष्ट्या संवेदनशील आहे. संवेदना ज्याला जाणता येतात तोच खरा मनुष्य.. भगवान श्रीकृष्णाने "गीता" सांगताना अजुर्नाला मनुष्य जीवनाची संवेदना समजावून सांगितली. गीता म्हणजेच मनुष्य जन्माचा सार. "गीता से क्या नाता है, गीता हमारी माता है" ह्या संदेशाचा प्रसार करून गीतेचा अर्थ प्रात्यक्षिकरित्या समजावून सांगणारे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते "पांडुरंग शास्त्री आठवले" यांचा आज जन्मदिवस. हा दिवस स्वाध्याय परिवाराकडून "मनुष्य गौरव दिवस" म्हणून साजरा केला जातो.

"माणूस अस्वच्छ किंवा रोगी राहू शकतो, माणूस अशिक्षित किंवा गरीब राहू शकतो, पण माणूस अस्पृश्य किंवा अपिवत्र राहू शकत नाही, कारण मानवी शरीर हे परमेश्वराचं मंदिर आहे". मनुष्याप्रती असे संवेदनशील आणि गौरवाचे विचार असणारे पांडुरंग शास्त्री आठवलेंचा जन्मदिवस म्हणजेच "मनुष्य गौरव दिवस". "पांडुरंग शास्त्री वैद्यनाथ आठवले" यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० साली रोहे ह्या कोकणातील गावात झाला. संस्कृत, न्याय, वेदांत, भारतीय साहित्य आणि इंग्रजी साहित्यावर त्यांचा विशेष अभ्यास होता.

मानव शांती, भावकृषी, भक्तीफेरी अश्या नवनवीन संकल्पना देऊन त्यांनी मनुष्यसेवेतून देश सेवा केली. त्यांच्या कार्याची सुरवात त्यांनी स्वतः पायी गावोगाव फिरून केली. लोकांना भावाबहिणी सारखं घडवलं. स्वाध्याय कार्य हे स्वखर्चातून, स्वप्रेरणेतून केलं जात. एक वेगळी शिस्त ह्या कार्यात दिसते. साधारणतः महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात ह्या कार्याचा विशेष प्रभाव आहे. ह्याच कार्याचा प्रसार करण्यासाठी मुंबईतील माधवबाग येथील श्रीमद्भगवद्गीता पाठशाळा आणि ठाणे येथील तत्वज्ञान विद्यापीठाची स्थापना केली.

मनुष्याचं माणूसपण जागृत करण्यासाठी आयुष्यभर कार्य करताना कुठल्याही चर्चेत न राहता आपलं कार्य निस्वार्थपणे पुढे नेताना आपल्या अनुयाना त्याच गोष्टीची शिकवण देणारे परमपूज्य पांडुरंग शास्त्रीना प्रेमाने "दादाजी" म्हणजेच मोठ्या भावाच्या नावाने संबोधलं गेलं. त्यांच्या ह्या कार्याची दखल घेत अनेक जागतिक आणि भारतीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं त्यात रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार आणि पद्मविभूषण सारख्या उल्लेखनीय पुरस्कारांचा सहभाग आहे. मनुष्याचं माणूसपण जपण्यासाठी स्वतःच आयुष्य निस्वार्थपणे घालवणाऱ्या महात्म्याला जन्मदिनी भावपूर्ण श्रद्धांजली..

डॉ. प्रशांत शिरोडे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...