गायधनी वाडा ..
अजिंक्य..
ऑस्ट्रेलियात ३२ वर्षानंतर एक अनोख्या विजयाचा जल्लोष भारतीय क्रिकेट संघ आज साऱ्या जगाला साजरा करतांना दिसला. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका जिंकल्यानंतर ज्या व्यक्तीला याच श्रेय मुख्यतः जात तो म्हणजे अजिंक्य रहाणे ..
अतिशय शांत, संयमी स्वभावाचा चाणाक्ष कर्णधार म्हणजे अजिंक्य. पहिल्या कसोटीत विराट कोहलीच्या नेतृत्वात ३६ धावांवर गारद झालेल्या संघाला दुसऱ्या कसोटीत आपल्या कप्तानीत विजय मिळवून देणारा अजिंक्य. ह्या कसोटीत संघ दडपणात असतांना संघाला त्यातून बाहेर काढून संघाला दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून देण्यात अजिंक्यचा कर्णधार म्हणून सिंहाचा वाटा होता. तिसऱ्या कसोटीत शेवटच्या दिवशी उपहारानंतर कसोटीला वेगळ्या निकालावर नेवून क्रिकेट जाणकारांना आणि प्रेक्षकांना अजिंक्यने धक्काच दिला. शेवटच्या कसोटीत आपली बाजू भक्कम असल्याचं जाणून ती जिंकण्याच्या दृष्टीने संघाला पुढे नेणारा कर्णधार अजिंक्य राणे कौतुकाला नक्कीच पात्र ठरला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघ पहिल्या कसोटीनंतर दडपणात असतांना कर्णधार पदाची धुरा अजिंक्यने हातात घेतली. त्यानंतर ह्या दौऱ्यात अनेक मुख्य खेळाडूंना दुखापत झाली तरी नवख्या खेळाडूंना बरोबर घेऊन मोठ्या ताकतीने संघाला अजिंक्यने खेळवल. आपल्या कर्णधार पदातून अनेक सुप्त गुणामधून त्याने ह्या मालिकेत मोठेपणा दाखवला. सामन्यानंतर मैदानातून कर्णधार पहिले बाहेर पडतो, पण संघातील नवख्या खेळाडूने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे हा मान त्याने त्या खेळाडूला दिला. वर्णभेदामुळे खेळाडूंना ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून हिणवलं जात असतांना त्याने कारवाई होईपर्यंत सामना थांबण्याचं धाडस दाखवलं. आपल्या सहकाऱ्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंचांना विनंतीकरून त्या सामन्याचा बॉल त्या खेळाडूस देण्याची अनोखी गोष्ट त्याने केली. आपल्या संघातील खेळाडूंबरोबर ऑस्ट्रेलियाचा एक गोलंदाजांची १०० वा सामना होता म्हणून त्याला बोलवून त्याने त्याला जर्सी आठवण म्हणून भेट दिली. अगदी संघ जिंकल्यावरही त्याने आपल्या हातातील ट्रॉफी संघातील खेळाडूंकडे क्षणात सुपूर्द केली आणि शेवटी बोलतांना ऑस्ट्रेलिया टीमचे तिथल्या प्रेक्षकांचे आभारही मानले.
एका वेगळ्या दिमतीला कर्णधार म्हणून सिद्ध केलेल्या अजिंक्य रहाणेला नेहमीच भारतीय क्रिकेट मध्ये डावललं गेलं. सगळ्या फॉरमॅट मध्ये कुठल्याही स्थानावर खेळण्यासाठी लायक असलेल्या ह्या जिगरबाज खेळाडूला का संघाबाहेर ठेवलं जात हाच अनुत्तोरित प्रश्न कायम आहे. आपल्याला मिळालेल्या संधीच त्याने नेहमी सोनंच केलं त्याचच अजून एक उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका होय.
अजिंक्यची संयमी आणि शांत वर्तणूक सचिन तेंडुलकरची आठवण करून देते. मराठी मनाची हि परंपरेची शृंखला तो मोठ्या दिमाखाने पुढे नेतोय. अजिंक्य आपल्या वर्तनातून पुन्हा पुन्हा भारतीयांची मन जिंकतोय आणि हाच त्याचा मराठी असल्याचा अभिमान मराठी मनाला आहे... भविष्यकाळात त्याला अनेक संधी मिळो ह्याच शुभेच्छा.
डॉ. प्रशांत शिरोडे.
परमेश्वर
'हे परमेश्वरा वाचावं रे ह्या संकटातून', 'हे परमेश्वरा ह्या जगाला ह्या संकटातून मुक्त कर' सर्वांच्या मुखात हि विनवणी सरत्या वर्षात होती. संकटांच्या वर्षात खूप काही झालं, जाणवलं पण सर्वात जास्त जाणवलं ते परमेश्वराचं अस्तित्व. जाणाऱ्या वर्षात हा परमेश्वर वेगळ्या वेगळ्या रूपात दिसला किंवा बघितला आणि माणसाने जगण्याची भाषाच बदलली.
आप्तस्वकीयांचं महत्व, नातेसंबंधांचा ओलावा, मैत्रीचा आधार आणि जगण्याचा अर्थ ह्या दिवसात विशेष करून जाणवला. परिस्थितीने पैश्यांचा आणि माणुसकीचा एकमेकांशी असलेला सलोखा माणसाला शिकवला. जगतांना माणसाने स्वतःला अनेक बंधनांमध्ये अडकवून घेतल्यामुळे स्वतःच जगणं विसरल्याचं या काळात प्रामुख्याने जाणवलं.
ह्या वर्षात आपला श्वास अजूनही सुखरूप चालू आहे यातच सर्वानी परमेश्वराचे धन्यवाद मानले. या वर्षात आपण माणूस आहोत आणि माणसाला परमेश्वराची गरज आहे. ह्या जगात कोणीही व्यस्त नसत, माणसाने स्वतःच वेळापत्रक त्याच्या पद्धतीने व्यस्त करून घेतल्याचं सर्वाना जाणवलं आणि संकट कोणावरही येऊ शकत हे सर्वानी अनुभवलं. कितीही अवघड परिस्थिती ओढवली तरी त्यातून सावरता येत आणि त्या प्रत्येक क्षणात परमेश्वर मार्ग दाखवतो.
नेहमीच प्रत्येक क्षणाला आपण परमेश्वराला आठवत असू पण या वर्षात त्याच्या अस्तित्वामुळे आपण सुखी आहोत ह्याची जाणीव नक्कीच झाली. वर्ष संपताना खूप काही झालं पण आपण जगलो ते परमेश्वराच्या प्रेमामुळे. हे वर्ष जातांना खूप काही शिकवून गेलं आणि माणसाचं आयुष्य बदलवून गेलं.
माणसाने जीवन जगत असताना आपल्या जवळील प्रत्येक माणूस जपावा आणि परमेश्वरावर आपली श्रद्धा निस्वार्थपणे ठेवावी हीच ह्या वर्षाची शिदोरी आयुष्यभरासाठी माणसाला भेटली. जाणाऱ्या वर्षाचे आभार मानत येणाऱ्या वर्षात परमेश्वराची कृपादृष्टी अशीच राहो हीच सदीच्छा..
डॉ. प्रशांत शिरोडे.
सत्ताधीश
"दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.." ह्या गीताच्या ओळींना कायमस्वरूपी सार्थ ठरवणारा महाराष्ट्रातील राजकारणी म्हणजे श्री.
शरद पवार साहेब. दिल्लीत कोणाचीही सत्ता असो शेवटी त्यांना म्हणावं लागत कि "आम्ही पवारसाहेबांचे हात धरून राजकारणात आलो". इतिहासापासून महाराष्ट्राच्या भूमीने दिल्लीच्या सत्तेची लगाम आपल्या हातात ठेवली आणि त्याच ऐतिहासिक वारशाला आजतागायत मोठ्या दिमाखाने पुढे नेणारे पवार साहेब.
वयाची ८० वर्ष पूर्ण करणाऱ्या पवार साहेबांनी आयुष्याची ५० वर्ष महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात यशस्वीरीत्या घालवलीत. वयाच्या ३७ व्या वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या पवार साहेबांनी महाराष्ट्र सारख्या प्रगतिशील राज्याचं चार वेळा मुख्यमंत्री पद सांभाळलं. राजकारणात असतांना ७ वेळा आमदार, ७ वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं. केंद्रात १० वर्ष संरक्षणमंत्री आणि कृषिमंत्री सारख्या महत्वाच्या पदांना सन्मानानं भूषवलं.
राजकारणात असतांना काँग्रेस पक्षातून सुरवात करून पुलोद सारखी आघाडी उभारण्याचा यशस्वी प्रयत्न केला. राजकारणातील काँग्रेस नेतृत्वाला विरोध करून स्वपक्षाची "राष्ट्रवादी काँग्रेस" म्हणून निर्मिती केली.
राजकारणाबरोबर खेळात बिसिसिआय बरोबर आंतरराष्ट्रीय आयसीसीआय ह्या क्रिकेट संघटनेचं यशस्वी नेतृत्व केलं. कुस्ती, कब्बडी सारख्या मातीतल्या खेळांचं नेतृत्व करतांना त्यांना जागतिक स्थरावर नेण्यात महत्वाची भूमिका घेतली. उद्योगक्षेत्र असो वा शेती प्रत्येक क्षेत्रात अभ्यास करून देशाच्या विकासात योगदान दिल.
पवार साहेब कधीच कुणाला समजले नाहीत, कारण पवार साहेब कुठलंही वक्तव्य करतात त्याचा राजकीय पटलावर मोठा परिणाम होतो. राजकारणाचा नवा अध्याय लिहितांना राजकारणातील प्रत्येक शैलीला नवा आकार देत आपलं राजकीय अस्तित्व कायमस्वरूपी अबाधीत ठेवलं. राजकारणात पवार साहेब काय निर्णय घेतील हे स्वतःला राजकारणातले चाणक्य समजणार्यांनाही पवार साहेब कधी समजले नाहीत म्हणून 'महाविकासआघाडी' सारखा नवा प्रयोग करण्यात ते यशस्वी झालेत.
महाराष्ट्राचं मराठी माणूस म्हणून प्रंतप्रधान होण्याचं स्वप्न पवार साहेबांच्या माध्यमातून होण्याची आशा कदाचित पवार साहेबाच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयामुळे अधुरी राहिली. महाराष्ट्र मातीला दिल्लीत आणि जागतिक स्थरावर सन्मानाने नेणाऱ्या श्री. शरद पवार साहेबांचा मराठी माणूस म्हणून नक्कीच अभिमान आहे. महाराष्ट्राचं राजकीय वर्चस्व नेहमी अबाधीत ठेवणाऱ्या सत्ताधीश शरदचंद्र पवार साहेबांना ८० व्या वाढदिवशी अनेक शुभेच्छा..
डॉ. प्रशांत शिरोडे.
थोडं जगूया..
गेल्या काही दिवसात माणूस खूपच बदलला असं म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही. माणसाच्या जगण्याची परिभाषा थोडी बदलतांना डोळ्यांना दिसत आहे आणि मनाला समजतही आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी त्याची धडपड चालू असतांना त्याला नियतीने अनेक गोष्टींवर विचार करण्यास भाग पाडलं आहे. माणूसपण हरवून बसलेल्या माणसाला माणुसकी टिकवून माणसासाठी धावून जाण्यासाठी सृष्टीच्या निर्मात्याने भाग पाडलं आहे.
माणसाच्या जगण्याची परिभाषा बदलत असतांना रोजच्या जगण्यातून बाहेर पडून माणूसपण निभावणं तितकंच महत्वाचं असतं हे आता समजायला लागलं. रोजची धावपळ तर आहेच आणि ती थांबणारही नाही आणि ती थांबली तर काय होत, हेही ह्या संकटात शिकायला भेटलं. रोज जीवन जगताना कुठेतरी थांबाव हे हि जाणवायला लागलं. थोडं थांबून स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी वेळ देणंही तितकंच महत्वाचं वाटू लागलं. हाताची चुटकी वाजवी तसं आपल्यातलं कोणीतरी सोडून जात आणि मग मनात विचार यायला लागतो आपण खरंच जगतो का? आपलं जीवन एका चुटकीसारखं झालं असतांना आपण माणूस म्हणून जगतो का? सुखदुःखाच्या कसरतींवर आपण स्वतःचा तोल सांभाळत जगतो का?
भूतलावर आलेल्या संकटातून माणसाची झोप मात्र नक्की उडाली. हेवेदावे, राग, लोभ, द्वेष, मत्सर करत असतांना आपल्यातील माणूस अचानक संकटाच्या लाटेत सापडतो आणि आपल्यातून कायमचा निघून जातो. आपल्यातून माणूस गेल्यावर मग मनात विचार येऊ लागतात आणि स्वतःलाच प्रश्न पडतात आपण नातं जपतो का? माणूस आपल्यात असतांना आपण त्याला किती आनंद दिला? त्याला किती वेळा भेटलो? त्याला किती वेळा आपुलकीने विचारलं? अशा अनेक प्रश्नानंतर उत्तर भेटत "कुठंतरी चुकलं.. आणि हे कसलं जगणं ? आणि हे कसलं माणूसपण?".
आपल्यातील माणूस हरपण्याआधी आपण स्वतःत बदल करूया. कुणाचा राग येत असेल तर त्यावर नियंत्रण मिळवून समोरच्याला काय चुकतंय ते समजून सांगा. धावपळीच्या जीवनात वेळात वेळ काढून आपल्या माणसांची आपुलकीने चौकशी करा. खूप काही करता आलं नाही तर फोन लावा आणि दोन मिनिटं बोलून विचारपूस करून घ्या. छोट्या छोट्या उत्साहात मोठा आनंद मिळविण्यासाठी त्यात पूर्णपणे सहभागी व्हा आणि सहभागी होता येत नसेल तर त्यासाठी शुभेच्छा द्यायला मात्र विसरू नका. पैसा कितीही असला तरी ह्या संकटात तो माणूस वाचवण्यात तितकासा कामी येत नसल्याचं दिसून आलं, म्हणून पैश्यापेक्षा माणसाला महत्व द्या.. दुसर्यांकडून अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे निभवा. आपल्या कुटुंबाची, समाजाची काळजी घ्या.. सरते शेवटी जीवाचा काहीच भरवसा नाही म्हणून थोडं माणूस म्हणून जगून बघू या..
डॉ. प्रशांत शिरोडे.
राजा माणूस...
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीला पडलेलं अदभूत आणि अविस्मरणीय जिवंत स्वप्न. संपूर्ण भारत वर्षात शिवरायांचा इतिहास शौर्याची, कर्तृत्वाची आणि नेतृत्वाची शौर्यगाथा शिकवून गेला. आजही त्याच इतिहासाच्या सुवर्णपानांना डोळ्याखालून घालतांना अंगावर रोमांच उभा राहतो..
रयतेच्या मनातील स्वराज्याची उभारणी करून रयतेच्या मनात एक वेगळा आत्मविश्वास शिवाजी महाराजांनी निर्माण केला. बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना बरोबर घेऊन रयतेला आपलं आपलंस वाटणार स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज.. महाराज रयतेला अगदी सहजपणे भेटून रयतेच्या मनातील गोष्टींना समजून घेत असत आणि त्यामुळे रयत खुश होत असत. असाच अविस्मरणीय अनुभव खासदार छत्रपती संभाजी महाराजांना भेटून आला.
खासदार छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांच्या घराण्यातील छत्रपती घराण्याला शोभणारा राजा माणूस. एक उत्तम शरीरयष्टी असून चेहऱ्यावर एक वेगळं तेज असणारा शोभिवंत राजा माणूस. सामन्यातील सामान्य माणसाशी अगदी सहजपणे बोलणारा राजा माणूस. छत्रपतींच्या घरात जन्माला येवून छत्रपतींच्या वागणुकीला आत्मसात करून रयत हित जोपासणारा राजा माणूस.
स्वतःला राजा म्हणावं किंवा स्वतःला खासदार म्हणून मानपान द्यावा किंवा छत्रपतींचा वारसदार असल्यानं विशेष वागणूक मिळावी अशा कुठल्याही अपेक्षा न ठेवणारे संभाजी राजे. उच्चविभुषित असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणून येत. त्यांच उत्तम मराठी किंवा इंग्रजी भाषेतील संभाषण मनाला भावून जात. समोरच्याच म्हणणं अगदी शांतपणे ऐकून त्याच्या मनाचं समाधान करण्याचा त्यांचा प्रयत्न काही वेगळाच असतो.
एका ऐतिहासिक पुस्तकाच्या संदर्भात त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांना भेटल्यानंतर छत्रपतींचा वंशज इतका प्रभावी असेल तर छत्रपती शिवाजी महाराज कसे असतील? याचा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. स्वतःला राजा न म्हणून घेता स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि छत्रपती घराण्याचा वारस असल्यामुळे समाजाचं आपण देणं लागतो अशी मनाशी भावना ठेवणाऱ्या छत्रपती वारसदार छत्रपती संभाजी राजांना मानाचा मुजरा..
डॉ. प्रशांत शिरोडे.
रामराज्य..
वारी कोरोनाची...
७०० वर्षांपासून अखंड अशी वारीच्या महासोहळ्याची परंपरा ह्या वर्षी लहानश्या सोहळ्याने होतेय. आषाढी एकादशीची वारी म्हणजे वारकरी पंथाचा एक अभूतपूर्व सोहळा. लाखो वारकरी पांडुरंगाच्या नामस्मरणाने पंढरीकडे पायी जातात आणि परमेश्वराचं रूप आपल्या डोळ्यांनी बघतात. जगाच्या पाठीवर हा एकमेव सोहळा आहे ज्यात एकाच वेळेस लाखो भाविक एका शिस्तीने परमेश्वराच्या भेटीसाठी पायी जातात.
युगे अठावीस विटेवरी उभा असलेला विठुराया आपल्या भक्तांची वाट मोठ्या आतुरतेने बघत असतो. शेतकरी, कष्टकरी पाऊस पडल्यांनंतर पिकाची पेरणी करून पंढरीकडे निघतो. पंढरपुरात पोहोचल्यावर जगाच्या कल्याणासाठीची विनंती करतो आणि जड अंतःकरणाने परमेश्वराचं दर्शन घेऊन परततो. ह्या सोहळ्यात पायी चालत असतांना विठोबा रखुमाईच्या नामस्मरणाने तल्लीन होऊन जाणारा मराठी माणूस वर्षभराच्या जगण्याची ऊर्जा पांडुरंगाकडून घेऊन येतो.
ह्या वर्षी हा वारकरी, शेतकरी, कष्टकरी ह्या सोहळ्यास मुकत असतांना मनोमनी परमेश्वराच्या दर्शनासाठी तळमळतोय. ह्यावर्षी त्या विठ्ठलाला कोरोनापासून मुक्त करण्यासाठी घरातूनच साकडं घालतोय. जगाला ह्या महामारीतून मुक्त करण्यासाठी घरातूनच प्रार्थना करतोय. कोरोनाच्या ह्या काळात परमेश्वराने प्रत्येकाला दर्शन दिल ते डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कामगार आणि शेतकरी राजाच्या रूपात. संकटात जो मदतीला येतो तो देव, आणि ह्याच देवाने वेगवेगळ्या रूपात अनेकांना दर्शन दिल.
अनेक वर्षाच्या ह्या परंपरेत जगातील सर्वात मोठ्या पायी सोहळ्यात माउलींच्या पादुका लाखो वारकऱ्यांच्या सानिध्यात पंढरीकडे जातात. ह्या वर्षी ह्या वारीत फक्त मोजकेच वारकरी आणि माऊलींच्या पादुका लालपरीतून घेऊन जातांना बघून प्रत्येक मराठी माणूस कुठे तरी भावुक झाला. माऊलींच्या पादुका रस्त्यांनी सरकारी बंदोबस्तात लालपरीतून जात असतांना त्यावर भक्त रस्त्यात उभे राहून फुलांचा वर्षाव करत लांबूनच दर्शन घेतांना दिसले. लालपरी हि सामान्यांसाठी सेवा देते आणि देवही आज त्याच्यातून प्रवास करतोय. जणू परमेश्वर सामान्यांसारखाच असल्याचं दाखवून सर्वांची काळजी घेतोय.
पंढरीच्या विठुराया ह्या वारीला तुझ्या दर्शनाला मुकलेल्या वारकर्यांना पुढच्या वर्षी नेहमीसारखं दर्शनाला येऊ दे. जगावरच कोरोनाच संकट टळू दे. नेहमी सर्वांना सांभाळून घेतो तसं ह्या वेळीही सांभाळून घे..
डॉ. प्रशांत शिरोडे.
सुशांत..
आज दुपारनंतर सगळीकडे सुशांत सिंग राजपूत ह्या अभिनेत्याने आत्महत्या केल्याची बातमी आली आणि सगळीकडे एकच हळहळ पसरली. कमी वयात एका विशिष्ट उंचीवर पोहोचलेला अभिनेता. सगळं छान चालू असतांना त्याच अचानक सोडून जाण त्याच्या परिवाराला, त्याच्या चाहत्यांना लागून गेलं.
सुशांत हा मेकॅनिकल इंजीनिअर शिक्षण असलेला, इंजिनिअरिंगच्या AIEEE परीक्षेत देशात सातवा असणारा, फिजिक्स ऑलंम्पियाड मिळवलेला हुशार व्यक्ती. शिक्षणात वेगळी उंची गाठल्यानंतर अभिनयात येण्याची इच्छा असल्यामुळे तो बिहारच्या पटण्याहून मुंबईत पोहोचला. सुरवातीला सहायक डान्सर म्हणून काम केलं. त्यानंतर छोट्या पडद्यावर येत टीव्ही सिरीयल 'पवित्र रिश्ता' मध्ये एक प्रेक्षणीय भूमिका बजावली. त्यानंतर त्याचा मोठ्या पडद्यावरचा प्रवास चालू झाला. त्याला स्वतःला सुद्धा वाटलं नसेल इतका छान त्याचा हा प्रवास चालू झाला होता आणि थोड्या कालावधीत तो यशाच्या शिखरावर येऊन पोहोचला होता. ह्या यशाच्या शिखरावरून तो आज घसरला आणि जगापलीकडच्या खाईत जाऊन विसावला.. कुठलीही अभिनयाची पार्श्वभूमी नसलेल्या माणूस मेहनतीच्या जोरावर इतक्या उंचीवर येतो आणि त्या उंचीवर त्याला कुणाची तरी नजर लागते आणि तो अचानक कायमचा पडद्याआड होतो..
शिक्षण, परिवार, व्यवसाय आणि इतर सर्व क्षेत्रात यशस्वी असलेला अभिनेता. अनेकांची इच्छा असलेल्या अभिनय क्षेत्रात चांगली प्रगती करणारा अभिनेता. माणूस म्हणून अप्रतिम असणारा अभिनेता. सगळं व्यवस्थित असतांना आयुष्यात आत्महत्येचं पाऊल टाकून अनेक प्रश्नांना उपस्थित करून जाण हे मात्र चुकीचं करणारा माणूस.
माणसाच्या आयुष्यात यश असेल पण समाधान नसेल तर त्याला महत्व नाही. पैसा माणसाला संपत्तीने मोठं करतो पण त्याबरोबर मनानेही मोठं होणं महत्वाचं आहे. आयुष्यात मोठं होतांना आपले मित्र बरोबर असणं तितकच महत्वाचं असतं. कोणी समजून घेणार असेल तर त्याच्या जवळ व्यक्त होता येत आणि ती व्यक्ती नेहमी जवळ असायला हवी. हे सगळं असावं म्हणजे आत्महत्येसारखा विचार कुठेतरी थांबू शकतो.
नावात शांत असणारा सुसंस्कृत असणारा सुशांत अचानक शांत झाला. चंदेरी दुनियेत यशाच्या उंचीवर उचललेलं हे टोकाचं पाऊल चुकीचंच आहे. तू ह्यातून बाहेर पडला असता तर तुझ्या छिचोरे सिनेमाचं तुझं वक्तव्य आज आत्महत्या करणाऱ्या अनेकांना रोखू शकलं असतं. पण आता त्यावर तूच शंका उपस्थित करून गेलास. तू चुकलास मित्रा.. तू गेलास पण तुझं छिचोरे सिनेमाच वक्तव्य नेहमीच अबाधित राहो आणि अनेकांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी उपयोगी पडो.. "तुम्हारा रिझल्ट डिसाईड नही करता है की तुम लुजर हो कि नही.. तुम्हारी कोशिश डिसाईड करती है..."
डॉ. प्रशांत शिरोडे.
मी मुंबई...
संकट आणि मी जणू एकमेकांचे मित्रच झाले आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यावर कधी आतंकवाद्यांचं तर कधी बेसुमार गर्दीच तर कधी निसर्गाचं संकट येतंच आहे. कुठलंही संकट असलं तरी मी लगेच सावरते. पण सध्या आलेलं कोरोनाच संकट माझ्याभोवती विळखा घालून बसलय. त्यातून मला नेहमीसारखं लगेच सावरता येत नसताना मला चक्रीवादळाने ग्रासलं. सगळी संकट जणू माझ्यावर डोळा ठेवून आहेत, मग ते दुसऱ्या राज्यातले राजकारणी माझा आर्थिक कणा निकामी करण्यासाठी असो वा निसर्गाचा कोप असो. ह्या सर्व संकटांमध्येही मी माझा स्वाभिमानाचा कणा मात्र ताठ ठेवलाय. तुम्हाला समजलंच असेल मी मुंबई बोलतेय.. तुमची स्वप्नांची नगरी, तुमच्या स्वप्नातील नगरी..
मला आजपर्यंतच्या संकटांच कधीच दुःख झालं नाही इतकं कोरोनाच्या ह्या संकटात झालं. त्याच कारणही तसंच माझी जीवनवाहिनी "मुंबई लोकल" जी थांबली आहे आणि ती कधीच इतक्या काळासाठी थांबली नव्हती. कोरोनाच्या संकटात माझी जीवनवाहिनी थांबली आणि माझा श्वासच गुदमरल्यासारखं होतंय. हि लोकलची गती थांबल्यामुळे माझ्यातील संकटानंतर पुन्हा जोमाने उभं राहण्याची ऊर्जा जणू कमीच झाल्यासारख मला जाणवत. ह्यादरम्यान अजून एका गोष्टीच मला वाईट वाटलं, माझ्या संकटाच्या काळात परप्रांतातून आलेला माणूस मला सोडून गेला. ज्याच्यावर मी माझ्या भूमिपुत्रांसारखं प्रेम केलं होत. माझ्या लेकरांवर, माझ्या मुंबईकरांवर ह्या कोरोनाचे आघात पाहून माझं मन हेलावलं. ह्या संकटाला तोंड देत असतांना कालच्या चक्रीवादळाचा तडाखा बसल्यावर मलाच माझा प्रश्न पडला कि अजून किती संकट अंगावर घ्यावी लागतील?
गेल्या तीन महिन्यापासून माझा मुंबईकर किती शांतपणे घरात बसला. त्याच्यातील घड्याळाच्या काट्यांसारखी धावपळीची चक्रे थाबंलीत. पोटासाठी धावणारा मुंबईकर जीवासाठी घरात थांबला. ह्या संकटात सगळीकडे एकच चर्चा आहे कि मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाला, पण कोणीही त्यामागची कारण समजून घेतली नाही. सर्वात जास्त परदेशातून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या माझ्याच विमानतळावरून होते आणि ह्या परदेशातून आलेल्या लोकांमुळे मी कोरोनाला जास्त प्रमाणात बळी पडले. पुढे दाट वस्तीत राहणाऱ्या मुंबईकरांपर्यंत हे संकट पोहचलं आणि ते वाढतच गेलं. माझी काही लेकर ह्याही स्थितीत आपलं कर्तव्य निभावताना आणि दुसऱ्याची मदत करतांना पाहून माझं मन लगेच भरून येत. मला स्वच्छ ठेवण्यासाठी माझे सफाई कामगार रोजच कामावर येतांना पाहून मला त्यांच्या जीवाची काळजी खूप वाटतेय. माझं आरोग्य ठीक रहावं म्हणून माझ्या मुंबईकरांसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आरोग्यसेवकांचं मला मनापासून कौतुक करावस वाटत.
माझ्यातील सहनशीलता अजूनही जिवंत आहे. मी संकटांशी दोन हात करण्यास नेहमीसारखी सज्ज आहे आणि ह्याही संकटाला मी नक्की हरवणार ह्याचा मला आत्मविश्वास आहे. माझा मुंबईकर सुरक्षित रहावा म्हणून मी त्याच्यासाठी लवकर ह्या संकटातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या गणरायाचा उत्सव मला साजरा करायचा आहे आणि त्यासाठी मला ह्या संकटाला लवकर हरवायचंय. अनेकांचे स्वप्न माझ्याकडून पूर्ण व्हायचे बाकी आहेत त्यासाठी मला माझ्यातली ऊर्जा तेवत ठेवावी लागणार आहे. माझा मुंबईकर स्वतःची काळजी घेईल आणि दुसऱ्याचीही घेईल...आणि तीच माझी काळजी घेतल्यासारखं माझ्यासाठी असेल.
चला तर मग सुरक्षित राहून ह्या संकटातून लवकर मुक्त होऊ.. मी नेहमीसारखी तुमच्यासोबत असेलच..
डॉ. प्रशांत शिरोडे.
मोलकरीण ..
संसारातील थोडी जवळची झालेली व्यक्ती. हातावर पोट असणारी हि व्यक्ती आपला संसार करतांना दुसऱ्याच्याही संसाराला हातभार लावते. स्वतःच्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करते. कुठलीही मनात भीती न ठेवता एका अनोळखी परिवारासाठी काम करणारी व्यक्ती म्हणजे मोलकरीण.
कोरोनाच्या संकटात आपल्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी दुसऱ्याच्या घरी कामाला जाणारी हि माउली आज घरीच आहे. लॉक डाऊन चालू झाल्यानंतर सोसायटीच्या वॉचमनने तिला गेटवरच थांबवलं. झालेल्या कामाचे पैसे घेण्यासाठी ती आली होती. आपल्या कष्टाचा पैसा मिळेल पण पुढे काम असेल नसेल ह्याची चिंता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. तिची ती चिंता हेरली आणि अजून पैसे लागत असतील तर सांगा असं विचारलं. ती गरीब माऊली आपसूकच बोलली "नाही जितकं काम केलं तितकेच द्या". गरीब कष्टाळू माणूस किती संतुष्ट असतो त्याची जाणीव झाली. ती नाही म्हंटल्यावर तिला स्वतःहून बोललो "पुढचे काही दिवस कामावर येता येणार नाही तरी तुम्हाला पैसे लागले तर सांगा". माझे बोल संपत नाही तितक्यात तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसला, जणू तिला पैसेच भेटलेत अशी भावना दिसली.
अगदी आठशे नऊशे रुपयांसाठी स्वतःचा संसार चालवून दुसऱ्याच्या घरी काम करणारी स्त्री म्हणजे रनरागीणीच. लोकांच्या वेळेनुसार आपल्या संसाराची सांगड घालणारी हि माउली आपल्या रोजच्या वेळेचं नियोजन प्रभावीपणे करते. तिच्यातील कामाचं कौशल्य, चिकाटी जणू ती स्वतःच्या घरातच काम करते तसंच असत.
कोरोनाच्या संकटात लॉक डाऊन वाढला आणि तिचंही आर्थिक संकट वाढत गेलं. न राहता ती पैसे घेण्यासाठी सोसाईटीच्या गेटवर आली. हातावरच पापी पोट तिला इथपर्यंत घेऊन आलं होत. तिला एका महिन्यांचे पैसे दिलेत आणि पुन्हा पैसे लागतील तर सांगा असंही सांगितलं. पण पुढच्या महिन्यात ती स्वतःच आली नाही. जणू तिने आहे त्याच पैश्यात उदरनिर्वाह करण्याचं शिकून घेतल्याचं जाणवलं.
आपल्याकडे कामाला येणाऱ्या मोलकरणीचे माणूस म्हणून मोल करा आणि संकटाच्या काळात त्या माऊलीला संसारासाठी मदत करा..
डॉ. प्रशांत शिरोडे.
गर्व से कहो..
प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...
-
माता रामो, मत्पीता रामचंद्र, स्वामी रामो, मत्सखा रामचंद्र… रामरक्षेतील हा श्लोक म्हणजे राम आई, राम बाप, राम स्वामी, राम सखा सुद्धा आहे हेच स...
-
युद्ध चालू असलं कि त्यात प्रत्येक योध्द्याचा सहभाग महत्वाचा असतो. युद्ध पुकारलं तर त्या प्रत्येक योध्द्याला आपलं योगदान हे द्यावचं लागत...







