थोडं जगूया..

 


गेल्या काही दिवसात माणूस खूपच बदलला असं  म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही. माणसाच्या जगण्याची परिभाषा थोडी बदलतांना डोळ्यांना दिसत आहे आणि मनाला समजतही आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी त्याची धडपड चालू असतांना त्याला नियतीने अनेक गोष्टींवर विचार करण्यास भाग पाडलं आहे. माणूसपण हरवून बसलेल्या माणसाला माणुसकी टिकवून माणसासाठी धावून जाण्यासाठी सृष्टीच्या निर्मात्याने भाग पाडलं आहे.


माणसाच्या जगण्याची परिभाषा बदलत असतांना रोजच्या जगण्यातून बाहेर पडून माणूसपण निभावणं तितकंच महत्वाचं असतं हे आता समजायला लागलं. रोजची धावपळ तर आहेच आणि ती थांबणारही नाही आणि ती थांबली तर काय होत, हेही ह्या संकटात शिकायला भेटलं. रोज जीवन जगताना कुठेतरी थांबाव हे हि जाणवायला लागलं. थोडं थांबून स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी वेळ देणंही तितकंच महत्वाचं वाटू लागलं. हाताची चुटकी वाजवी तसं आपल्यातलं कोणीतरी सोडून जात आणि मग मनात विचार यायला लागतो आपण खरंच जगतो का? आपलं जीवन एका चुटकीसारखं झालं असतांना आपण माणूस म्हणून जगतो का? सुखदुःखाच्या कसरतींवर आपण स्वतःचा तोल सांभाळत जगतो का? 


भूतलावर आलेल्या संकटातून माणसाची झोप मात्र नक्की उडाली. हेवेदावे, राग, लोभ, द्वेष, मत्सर करत असतांना आपल्यातील माणूस अचानक संकटाच्या लाटेत सापडतो आणि आपल्यातून कायमचा निघून जातो. आपल्यातून माणूस गेल्यावर मग मनात विचार येऊ लागतात आणि स्वतःलाच प्रश्न पडतात आपण नातं जपतो का? माणूस आपल्यात असतांना आपण त्याला किती आनंद दिला? त्याला किती वेळा भेटलो? त्याला किती वेळा आपुलकीने विचारलं? अशा अनेक प्रश्नानंतर उत्तर भेटत "कुठंतरी चुकलं.. आणि हे कसलं जगणं ? आणि हे कसलं माणूसपण?".


आपल्यातील माणूस हरपण्याआधी आपण स्वतःत बदल करूया. कुणाचा राग येत असेल तर त्यावर नियंत्रण मिळवून समोरच्याला काय चुकतंय ते समजून सांगा. धावपळीच्या जीवनात वेळात वेळ काढून आपल्या माणसांची आपुलकीने चौकशी करा. खूप काही करता आलं नाही तर फोन लावा आणि दोन मिनिटं बोलून विचारपूस करून घ्या. छोट्या छोट्या उत्साहात मोठा आनंद मिळविण्यासाठी त्यात पूर्णपणे सहभागी व्हा आणि सहभागी होता येत नसेल तर त्यासाठी शुभेच्छा द्यायला मात्र विसरू नका. पैसा कितीही असला तरी ह्या संकटात तो माणूस वाचवण्यात तितकासा कामी येत नसल्याचं दिसून आलं, म्हणून पैश्यापेक्षा माणसाला महत्व द्या.. दुसर्यांकडून अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे निभवा. आपल्या कुटुंबाची, समाजाची काळजी घ्या.. सरते शेवटी जीवाचा काहीच भरवसा नाही म्हणून थोडं माणूस म्हणून जगून बघू या..


डॉ. प्रशांत शिरोडे.

राजा माणूस...



छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीला पडलेलं अदभूत आणि अविस्मरणीय जिवंत स्वप्न. संपूर्ण भारत वर्षात शिवरायांचा इतिहास शौर्याची, कर्तृत्वाची आणि नेतृत्वाची शौर्यगाथा शिकवून गेला. आजही त्याच इतिहासाच्या सुवर्णपानांना डोळ्याखालून घालतांना अंगावर रोमांच उभा राहतो..

रयतेच्या मनातील स्वराज्याची उभारणी करून रयतेच्या मनात एक वेगळा आत्मविश्वास शिवाजी महाराजांनी निर्माण केला. बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना बरोबर घेऊन रयतेला आपलं आपलंस वाटणार स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज.. महाराज रयतेला अगदी सहजपणे भेटून रयतेच्या मनातील गोष्टींना समजून घेत असत आणि त्यामुळे रयत खुश होत असत. असाच अविस्मरणीय अनुभव खासदार छत्रपती संभाजी महाराजांना भेटून आला.

खासदार छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांच्या घराण्यातील छत्रपती घराण्याला शोभणारा राजा माणूस. एक उत्तम शरीरयष्टी असून चेहऱ्यावर एक वेगळं तेज असणारा शोभिवंत राजा माणूस. सामन्यातील सामान्य माणसाशी अगदी सहजपणे बोलणारा राजा माणूस. छत्रपतींच्या घरात जन्माला येवून छत्रपतींच्या वागणुकीला आत्मसात करून रयत हित जोपासणारा राजा माणूस.

स्वतःला राजा म्हणावं किंवा स्वतःला खासदार म्हणून मानपान द्यावा किंवा छत्रपतींचा वारसदार असल्यानं विशेष वागणूक मिळावी अशा  कुठल्याही अपेक्षा न ठेवणारे संभाजी राजे. उच्चविभुषित असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणून येत. त्यांच उत्तम मराठी किंवा इंग्रजी भाषेतील संभाषण मनाला भावून जात. समोरच्याच म्हणणं अगदी शांतपणे ऐकून त्याच्या मनाचं समाधान करण्याचा त्यांचा प्रयत्न काही वेगळाच असतो.

एका ऐतिहासिक पुस्तकाच्या संदर्भात त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांना भेटल्यानंतर छत्रपतींचा वंशज इतका प्रभावी असेल तर छत्रपती शिवाजी महाराज कसे असतील? याचा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. स्वतःला राजा न म्हणून घेता स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि छत्रपती घराण्याचा वारस असल्यामुळे समाजाचं आपण देणं लागतो अशी मनाशी भावना ठेवणाऱ्या छत्रपती वारसदार छत्रपती संभाजी राजांना मानाचा मुजरा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

रामराज्य..




संपूर्ण भारत वर्षांत एक चैतन्याच वातावरण दिसून आलं. गेल्या पाच शतकांपासून ज्या गोष्टीची आस साऱ्या जगाला लागली होती ती गोष्ट प्रत्यक्षात घडली. राममंदिराच्या भूमिपूजनाचा अदभूत क्षण सर्वानी अनुभवला. अखंड हिंदुस्थानाच श्रद्धास्थान प्रभू श्रीरामांच्या जन्मांस्थानावरच काही अपप्रवृतींनी विघातक कृत्य करत हिंदुस्थानच्या इतिहासाला काळा डाग लावला होता. स्वतःच्या जन्मठीकाणासाठीच प्रभू रामाला ५०० वर्षाचा वनवास भोगावा लागला.

असो रामराज्य म्हणजे ज्या राज्यात सगळीकडे आनंदाच, चैतन्याच, मांगल्याचं वातावरण होत. प्रभू श्रीरामाच्या सानिध्यात सारा भारतवर्ष रामायणाचे पाठ रचत होता आणि एक भारतीय जीवनपद्धती घडवत होता. ह्या सर्व इतिहासाची सुरवात जिथून झाली ती म्हणजे शरयू तीरावरील अयोध्या नगरी. प्रभू श्रीराम त्याच नगरीत जन्माला आले. त्यांच्या आठवणीत त्यांच्या जन्मस्थळी मंदिर उभारण्यात आलं पण १५ व्या शतकात बाबरची काळी नजर त्यावर पडली आणि त्याने इतिहासाला तडा पोहोचवला. सुखासमाधानाने राहणाऱ्या भारतवासीयांमध्ये धर्माची तेढ त्यातून निर्माण करण्यात आली आणि ती आजतागायत चालत आली. 

स्वातंत्र्यानंतरच्या काळात ह्या भावनिक श्रद्धेकडे विशेष लक्ष दिलं गेलं. पुरातत्व खात्याने के. के. मोहम्मद यांच्या देखरेखीखाली उत्खनन करून तिथे मंदिर असल्याचं स्पष्ट केलं. ह्या सर्व गोष्टींना वि. पराशरण ह्या वकिलाने न्यायदेवतेसमोर पटवून देण्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य खर्च केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, शिवसेना आणि भाजप सारख्या अनेक धार्मिक आणि राजकीय गटांनी त्याच समर्थन केलं. लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयींसारख्या विभूतींनी ह्यात विशेष लक्ष दिल. 

अनेक भारतीयांनी संयम दाखवत ह्या मंदिर निर्माणाला पाठबळ दिल. खासकरून मुस्लिम बांधवानी ह्यात विशेष सहयोग दिला. अनेक दशकापासून हिंदुस्थानच्या प्रगतीसाठी काही गोष्टी अडसर ठरत होत्या त्यातील एक मोठी गोष्ट आज मार्गी लागली. देशात सलोखा राहिला तर देश प्रगतीपथाकडे नक्कीच जाईल. वर्षोनुवर्षे चालेल्या अश्या अनेक मुद्द्यांवर लवकरात लवकर तोडगा निघो आणि हिंदुस्थानच्या भूमीला सलोख्याचे एकतेचे सोनेरी दिवस येवो हि प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना.

रामाच्या जन्मस्थानाचा वनवास संपवून रामलल्ला पुन्हा दिमाखात विराजमान होतील. ह्या प्रवासात  सरकार म्हणून विशेष लक्ष देत प्रंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्या मंदिर निर्माणाला मार्गस्थ लावून एक नवीन आदर्श निर्माण केला. आता लवकरात लवकर राममंदिर प्रत्यक्षात साकार होवो आणि रामराज्याचे दिवस पुन्हा येवो ह्याच सदीच्छा...

डॉ. प्रशांत शिरोडे.

वारी कोरोनाची...


७०० वर्षांपासून अखंड अशी वारीच्या महासोहळ्याची परंपरा ह्या वर्षी लहानश्या सोहळ्याने होतेय. आषाढी एकादशीची वारी म्हणजे वारकरी पंथाचा एक अभूतपूर्व सोहळा. लाखो वारकरी पांडुरंगाच्या नामस्मरणाने पंढरीकडे पायी जातात आणि परमेश्वराचं रूप आपल्या डोळ्यांनी बघतात. जगाच्या पाठीवर हा एकमेव सोहळा आहे ज्यात एकाच वेळेस लाखो भाविक एका शिस्तीने परमेश्वराच्या भेटीसाठी पायी जातात.

युगे अठावीस विटेवरी उभा असलेला विठुराया आपल्या भक्तांची वाट मोठ्या आतुरतेने बघत असतो. शेतकरी, कष्टकरी पाऊस पडल्यांनंतर पिकाची पेरणी करून पंढरीकडे निघतो. पंढरपुरात पोहोचल्यावर जगाच्या कल्याणासाठीची विनंती करतो आणि जड अंतःकरणाने परमेश्वराचं दर्शन घेऊन परततो. ह्या सोहळ्यात पायी चालत असतांना विठोबा रखुमाईच्या नामस्मरणाने तल्लीन होऊन जाणारा मराठी माणूस वर्षभराच्या जगण्याची ऊर्जा पांडुरंगाकडून घेऊन येतो.

ह्या वर्षी हा वारकरी, शेतकरी, कष्टकरी ह्या सोहळ्यास मुकत असतांना मनोमनी परमेश्वराच्या दर्शनासाठी तळमळतोय. ह्यावर्षी त्या विठ्ठलाला कोरोनापासून मुक्त करण्यासाठी घरातूनच साकडं घालतोय. जगाला ह्या महामारीतून मुक्त करण्यासाठी घरातूनच प्रार्थना करतोय. कोरोनाच्या ह्या काळात परमेश्वराने प्रत्येकाला दर्शन दिल ते डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कामगार आणि शेतकरी राजाच्या रूपात. संकटात जो मदतीला येतो तो देव, आणि ह्याच देवाने वेगवेगळ्या रूपात अनेकांना दर्शन दिल.

अनेक वर्षाच्या ह्या परंपरेत जगातील सर्वात मोठ्या पायी सोहळ्यात माउलींच्या पादुका लाखो वारकऱ्यांच्या सानिध्यात पंढरीकडे जातात. ह्या वर्षी ह्या वारीत फक्त मोजकेच वारकरी आणि माऊलींच्या पादुका लालपरीतून घेऊन जातांना बघून प्रत्येक मराठी माणूस कुठे तरी भावुक झाला. माऊलींच्या पादुका रस्त्यांनी सरकारी बंदोबस्तात लालपरीतून जात असतांना त्यावर भक्त रस्त्यात उभे राहून फुलांचा वर्षाव करत लांबूनच दर्शन घेतांना दिसले. लालपरी हि सामान्यांसाठी सेवा देते आणि देवही आज त्याच्यातून प्रवास करतोय. जणू परमेश्वर सामान्यांसारखाच असल्याचं दाखवून सर्वांची काळजी घेतोय.

पंढरीच्या विठुराया ह्या वारीला तुझ्या दर्शनाला मुकलेल्या वारकर्यांना पुढच्या वर्षी नेहमीसारखं दर्शनाला येऊ दे. जगावरच कोरोनाच संकट टळू दे. नेहमी सर्वांना सांभाळून घेतो तसं ह्या वेळीही सांभाळून घे..

डॉ. प्रशांत शिरोडे.

सुशांत..


आज दुपारनंतर सगळीकडे सुशांत सिंग राजपूत ह्या अभिनेत्याने आत्महत्या केल्याची बातमी आली आणि सगळीकडे एकच हळहळ पसरली. कमी वयात एका विशिष्ट उंचीवर पोहोचलेला अभिनेता. सगळं छान चालू असतांना त्याच अचानक सोडून जाण त्याच्या परिवाराला, त्याच्या चाहत्यांना लागून गेलं.

सुशांत हा मेकॅनिकल इंजीनिअर शिक्षण असलेला, इंजिनिअरिंगच्या AIEEE परीक्षेत देशात सातवा असणारा, फिजिक्स ऑलंम्पियाड मिळवलेला हुशार व्यक्ती. शिक्षणात वेगळी उंची गाठल्यानंतर अभिनयात येण्याची इच्छा असल्यामुळे तो बिहारच्या पटण्याहून मुंबईत पोहोचला. सुरवातीला सहायक डान्सर म्हणून काम केलं. त्यानंतर छोट्या पडद्यावर येत टीव्ही सिरीयल 'पवित्र रिश्ता' मध्ये एक प्रेक्षणीय भूमिका बजावली. त्यानंतर त्याचा मोठ्या पडद्यावरचा प्रवास चालू झाला. त्याला स्वतःला सुद्धा वाटलं नसेल इतका छान त्याचा हा प्रवास चालू झाला होता आणि थोड्या कालावधीत तो यशाच्या शिखरावर येऊन पोहोचला होता. ह्या यशाच्या शिखरावरून तो आज घसरला आणि जगापलीकडच्या खाईत जाऊन विसावला.. कुठलीही अभिनयाची पार्श्वभूमी नसलेल्या माणूस मेहनतीच्या जोरावर इतक्या उंचीवर येतो आणि त्या उंचीवर त्याला कुणाची तरी नजर लागते आणि तो अचानक कायमचा पडद्याआड होतो..

शिक्षण, परिवार, व्यवसाय आणि इतर सर्व क्षेत्रात यशस्वी असलेला अभिनेता. अनेकांची इच्छा असलेल्या अभिनय क्षेत्रात चांगली प्रगती करणारा अभिनेता. माणूस म्हणून अप्रतिम असणारा अभिनेता. सगळं व्यवस्थित असतांना आयुष्यात आत्महत्येचं पाऊल टाकून अनेक प्रश्नांना उपस्थित करून जाण हे मात्र चुकीचं करणारा माणूस.

माणसाच्या आयुष्यात यश असेल पण समाधान नसेल तर त्याला महत्व नाही. पैसा माणसाला संपत्तीने मोठं करतो पण त्याबरोबर मनानेही मोठं होणं महत्वाचं आहे. आयुष्यात मोठं होतांना आपले मित्र बरोबर असणं तितकच महत्वाचं असतं. कोणी समजून घेणार असेल तर त्याच्या जवळ व्यक्त होता येत आणि ती व्यक्ती नेहमी जवळ असायला हवी. हे सगळं असावं म्हणजे आत्महत्येसारखा विचार कुठेतरी थांबू शकतो.

नावात शांत असणारा सुसंस्कृत असणारा सुशांत अचानक शांत झाला. चंदेरी दुनियेत यशाच्या उंचीवर उचललेलं हे टोकाचं पाऊल चुकीचंच आहे. तू ह्यातून बाहेर पडला असता तर तुझ्या छिचोरे सिनेमाचं तुझं वक्तव्य आज आत्महत्या करणाऱ्या अनेकांना रोखू शकलं असतं. पण आता त्यावर तूच शंका उपस्थित करून गेलास. तू चुकलास मित्रा.. तू गेलास पण तुझं छिचोरे सिनेमाच वक्तव्य नेहमीच अबाधित राहो आणि अनेकांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी उपयोगी पडो.. "तुम्हारा रिझल्ट डिसाईड नही करता है की तुम लुजर हो कि नही.. तुम्हारी कोशिश डिसाईड करती है..."

डॉ. प्रशांत शिरोडे.

मी मुंबई...


संकट आणि मी जणू एकमेकांचे मित्रच झाले आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यावर कधी आतंकवाद्यांचं तर कधी बेसुमार गर्दीच तर कधी निसर्गाचं संकट येतंच आहे. कुठलंही संकट असलं तरी मी लगेच सावरते. पण सध्या आलेलं कोरोनाच संकट माझ्याभोवती विळखा घालून बसलय. त्यातून मला नेहमीसारखं लगेच सावरता येत नसताना मला चक्रीवादळाने ग्रासलं. सगळी संकट जणू माझ्यावर डोळा ठेवून आहेत, मग ते दुसऱ्या राज्यातले राजकारणी माझा आर्थिक कणा निकामी करण्यासाठी असो वा निसर्गाचा कोप असो. ह्या सर्व संकटांमध्येही मी माझा स्वाभिमानाचा कणा मात्र ताठ ठेवलाय. तुम्हाला समजलंच असेल मी मुंबई बोलतेय.. तुमची स्वप्नांची नगरी, तुमच्या स्वप्नातील नगरी..

मला आजपर्यंतच्या संकटांच कधीच दुःख झालं नाही इतकं कोरोनाच्या ह्या संकटात झालं. त्याच कारणही तसंच माझी जीवनवाहिनी "मुंबई लोकल" जी थांबली आहे आणि ती कधीच इतक्या काळासाठी थांबली नव्हती. कोरोनाच्या संकटात माझी जीवनवाहिनी थांबली आणि माझा श्वासच गुदमरल्यासारखं होतंय. हि लोकलची गती थांबल्यामुळे माझ्यातील संकटानंतर पुन्हा जोमाने उभं राहण्याची ऊर्जा जणू कमीच झाल्यासारख मला जाणवत. ह्यादरम्यान अजून एका गोष्टीच मला वाईट वाटलं, माझ्या संकटाच्या काळात परप्रांतातून आलेला माणूस मला सोडून गेला. ज्याच्यावर मी माझ्या भूमिपुत्रांसारखं प्रेम केलं होत. माझ्या लेकरांवर, माझ्या मुंबईकरांवर ह्या कोरोनाचे आघात पाहून माझं मन हेलावलं. ह्या संकटाला तोंड देत असतांना कालच्या चक्रीवादळाचा तडाखा बसल्यावर मलाच माझा प्रश्न पडला कि अजून किती संकट अंगावर घ्यावी लागतील?

गेल्या तीन महिन्यापासून माझा मुंबईकर किती शांतपणे घरात बसला. त्याच्यातील घड्याळाच्या काट्यांसारखी धावपळीची चक्रे थाबंलीत. पोटासाठी धावणारा मुंबईकर जीवासाठी घरात थांबला. ह्या संकटात सगळीकडे एकच चर्चा आहे कि मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाला, पण कोणीही त्यामागची कारण समजून घेतली नाही. सर्वात जास्त परदेशातून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या माझ्याच विमानतळावरून होते आणि ह्या परदेशातून आलेल्या लोकांमुळे मी कोरोनाला जास्त प्रमाणात बळी पडले. पुढे दाट वस्तीत राहणाऱ्या मुंबईकरांपर्यंत हे संकट पोहचलं आणि ते वाढतच गेलं. माझी काही लेकर ह्याही स्थितीत आपलं कर्तव्य निभावताना आणि दुसऱ्याची मदत करतांना पाहून माझं मन लगेच भरून येत. मला स्वच्छ ठेवण्यासाठी माझे सफाई कामगार रोजच कामावर येतांना पाहून मला त्यांच्या जीवाची काळजी खूप वाटतेय. माझं आरोग्य ठीक रहावं म्हणून माझ्या मुंबईकरांसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आरोग्यसेवकांचं मला मनापासून कौतुक करावस वाटत.

माझ्यातील सहनशीलता अजूनही जिवंत आहे. मी संकटांशी दोन हात करण्यास नेहमीसारखी सज्ज आहे आणि ह्याही संकटाला मी नक्की हरवणार ह्याचा मला आत्मविश्वास आहे. माझा मुंबईकर सुरक्षित रहावा म्हणून मी त्याच्यासाठी लवकर ह्या संकटातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या गणरायाचा उत्सव मला साजरा करायचा आहे आणि त्यासाठी मला ह्या संकटाला लवकर हरवायचंय. अनेकांचे स्वप्न माझ्याकडून पूर्ण व्हायचे बाकी आहेत त्यासाठी मला माझ्यातली ऊर्जा तेवत ठेवावी लागणार आहे. माझा मुंबईकर स्वतःची काळजी घेईल आणि दुसऱ्याचीही घेईल...आणि तीच माझी काळजी घेतल्यासारखं माझ्यासाठी असेल.

चला तर मग सुरक्षित राहून ह्या संकटातून लवकर मुक्त होऊ.. मी नेहमीसारखी तुमच्यासोबत असेलच..

डॉ. प्रशांत शिरोडे.

मोलकरीण ..


संसारातील थोडी जवळची झालेली व्यक्ती. हातावर पोट असणारी हि व्यक्ती आपला संसार करतांना दुसऱ्याच्याही संसाराला हातभार लावते. स्वतःच्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करते. कुठलीही मनात भीती न ठेवता एका अनोळखी परिवारासाठी काम करणारी व्यक्ती म्हणजे मोलकरीण.

कोरोनाच्या संकटात आपल्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी दुसऱ्याच्या घरी कामाला जाणारी हि माउली आज घरीच आहे. लॉक डाऊन चालू झाल्यानंतर सोसायटीच्या वॉचमनने तिला गेटवरच थांबवलं. झालेल्या कामाचे पैसे घेण्यासाठी ती आली होती. आपल्या कष्टाचा पैसा मिळेल पण पुढे काम असेल नसेल ह्याची चिंता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. तिची ती चिंता हेरली आणि अजून पैसे लागत असतील तर सांगा असं विचारलं. ती गरीब माऊली आपसूकच बोलली "नाही जितकं काम केलं तितकेच द्या". गरीब कष्टाळू माणूस किती संतुष्ट असतो त्याची जाणीव झाली. ती नाही म्हंटल्यावर तिला स्वतःहून बोललो "पुढचे काही दिवस कामावर येता येणार नाही तरी तुम्हाला पैसे लागले तर सांगा". माझे बोल संपत नाही तितक्यात तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसला, जणू तिला पैसेच भेटलेत अशी भावना दिसली.

अगदी आठशे नऊशे रुपयांसाठी स्वतःचा संसार चालवून दुसऱ्याच्या घरी काम करणारी स्त्री म्हणजे रनरागीणीच. लोकांच्या वेळेनुसार आपल्या संसाराची सांगड घालणारी हि माउली आपल्या रोजच्या वेळेचं नियोजन प्रभावीपणे करते. तिच्यातील कामाचं कौशल्य, चिकाटी जणू ती स्वतःच्या घरातच काम करते तसंच असत.

कोरोनाच्या संकटात लॉक डाऊन वाढला आणि तिचंही आर्थिक संकट वाढत गेलं. न राहता ती पैसे घेण्यासाठी सोसाईटीच्या गेटवर आली. हातावरच पापी पोट तिला इथपर्यंत घेऊन आलं होत. तिला एका महिन्यांचे पैसे दिलेत आणि पुन्हा पैसे लागतील तर सांगा असंही सांगितलं. पण पुढच्या महिन्यात ती स्वतःच आली नाही. जणू तिने आहे त्याच पैश्यात उदरनिर्वाह करण्याचं शिकून घेतल्याचं जाणवलं.

आपल्याकडे कामाला येणाऱ्या मोलकरणीचे माणूस म्हणून मोल करा आणि संकटाच्या काळात त्या माऊलीला संसारासाठी मदत करा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

पक्षनेता विरोधातला...



कोरोनाच्या संकटात अनेक गोष्टी सर्वांना बघायला भेटल्या. महाराष्ट्राच्या राजकारणाने पण खूप काही घडामोडी बघितल्या. सत्तेत नसणारे काही पक्ष सत्ताधारी सरकारला राजकारण बाजूला सारून मदत करतांना दिसले. कुठे लोकांची मदत तर कुठे प्रशासनाची मदत सगळं काही वेगळं दिसतांना विरोधी पक्षनेता मात्र राजकारणात गुंतल्याच वेळोवेळी दिसून आलं.

आज विरोधी पक्षनेत्यांची सोसिअल मीडियावर पोस्ट बघितली. मुंबईतील सायन येथील रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृतदेह दुसऱ्या रुग्णाच्या बाजूला असल्याचा विडिओ सगळीकड़े प्रसारित झाला. ह्याबद्दल सरकारला सूचना करण्याची हि पोस्ट होती. आज दिवसभराचा कार्यकाळ बघितला तर सर्व राजकीय पक्षातील नेत्यांची कोरोनाच्या संकटासंदर्भात बैठक झाली आणि त्यात ह्या विषयावर संक्षिप्त चर्चाही झाली. आरोग्यमंत्र्यांनी त्यावर सत्यताही माध्यमांसमोर सांगितली. एका परिपक्व नेत्यांनी हा सगळा घटनाक्रम बघता किंवा परिस्थितीच गांभीर्य बघता अशी पोस्ट करणं शोभनीय नव्हतं. कदाचित त्यांच सोसिअल माध्यमांवर ट्रोलिंग होण्याचं हेच कारण असू शकत.

कोरोनाच्या संकटात विरोधी पक्षाची भूमिका हि विरोधाची न ठेवता प्रतिमुख्यमंत्री म्हणून असणं सामान्य जनतेच्या हिताचं होत. अगदी छोटयाछोट्या गोष्टींसाठी राज्यपालांना ह्या संकटाच्या काळात अनेक वेळा भेटणं हे तितकस योग्य नव्हतं. ह्या घडामोडीत राज्यपाल हे पद निपक्षीय असत, ह्याच संविधानिक तत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतांना दिसलं. जेव्हा जनतेवर संकट येत तेव्हा पक्षीय भेद नसावा हि माफक अपेक्षा कोणाचीही असते. शेवटी ह्यात राजकारण हे श्रेयाच गणित असत, असं म्हंटल तर वावग ठरणार नाही.

कोरोनाच्या संकटात राज्याला पैश्यांची गरज असतांना अनेक लोकांनी मुख्यमंत्री निधीत पैसे जमा केलेत. पण राजकीय बुद्धिमत्तेमुळे विरोधी पक्षाने आपले पैसे पंतप्रधान निधीत देऊन आपण ह्या संकटात राज्याचा विचार कितपत करतोय हे दाखवून दिल. ह्या राजकारणाला सोसिअल मीडियावर खोचकपणे संबोधण्यात आलं "पैसे दिल्लीला आणि सल्ला राज्याला". कदाचित सद्यपरिस्थिती हेच सत्य समोर दाखवतेय..

राज्यातील विरोधी पक्षनेता हा मुख्यमंत्री ह्या पदाइतका समान असतो. ह्या संकटात ती परिपक्वता एका जाणकार नेत्याने दाखवणं महत्वाचं होत. पुरोगामी महाराष्ट्राला अशा राजकारणाचा इतिहास नसतांना हे घडत असल्याचं बघून पराक्रमी महाराष्ट्राचं हे दुर्दैव समजावं का? हाच प्रश्न सामान्यांच्या मनात येतो...

सद्य परिस्थिती बघता परमेश्वर सर्वांना सदबुद्धी देवो आणि माझ्या महाराष्ट्राला ह्या संकटातून लवकर मुक्त करो हीच प्रार्थना.

डॉ. प्रशांत शिरोडे.

कणखर देशा ..



महाराष्ट्र दिन आमच्या काळजाच्या अभिमानाचा दिवस. महाराष्ट्र भूमी आज संकटाच्या काळात मोठ्या अंधारातून जात आहे. हि भूमी संकटात सुद्धा मोठ्या धीराने उभी आहे. कोरोनाच्या संकटात देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहे. कणखर बाणा असल्यामुळे ह्या संकटाला मोठ्या प्रयत्नांनी हि भूमी लढा देत आहे. महाराष्ट्र भूमीत सर्वात जास्त परदेशातून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या असल्यामुळे हा आकडा जास्त आहे.

महाराष्ट्र भूमीला अनेक प्रांत आहेत त्यात कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र. प्रत्येक प्रांताची आपली विविधता आणि बोलीभाषा आहे. महाराष्ट्रात दक्षिण आणि उत्तर दोन्ही भारतीय प्रदेशातील पदार्थ बनविले जातात. भारतातील सर्व सण महाराष्ट्रात साजरे केले जातात. महाराष्ट्राला अनेक गोष्टीत विविधता आहे आणि त्या विविधतेत इतर राज्यांनीही विविधता मोठ्या मानाने सामावून घेणारा माझा महाराष्ट्र. माय मराठी बोलीभाषेच्या मधुर शब्दांनी बहरलेला सदाबहार महाराष्ट्र.

इतिहासाची परंपरा महाराष्ट्राला जितकी लाभली तितकी इतर राज्यांना लाभली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्वाचा इतिहास ह्या भूमीला लाभला. शौर्याच्या भूमीला इतिहासाबरोबर भूगोलही तितकाच दिमाखाचा लाभला. ह्या भूमीला डोंगरदऱ्यांच्या सह्याद्री, अखंड महासागराचा अरबी, सपाटीच्या प्रदेशाचा कास पठार, निसर्गाची किमया असलेला कोकण, कोळशाची खान असलेला विदर्भ अश्या अनेक रत्नांची नैसर्गिक देणगी लाभली आहे.

महाराष्ट्र भूमीला साधू संतांची एक अदभूत परंपरा लाभली आहे. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वरांचा वारसा ह्या भूमीला लाभला आहे. ह्याच भूमीत १२ ज्यातिर्लिंगापैकी चार ज्योतिर्लिंग आहेत. सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचा मोठा वारसा ह्या भूमीला लाभला आहे. देशाच्या सैन्यात दोन रेजिमेंट आणि अनेक सैनिक देणार एकमेव राज्य म्हणजे महाराष्ट्र.

हिमालयाच्या मदतीला नेहमीच पाठीराखा असणारा आमचा सह्याद्री. कुठल्याही संकटाला हरवणारा हाच कणखर महाराष्ट्र कोरोनालाही त्याच हिमतीने हरवणार ह्यात तिळमात्र शंका नाही. कणखर देशा.. महाराष्ट्र देशा..

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा..

तंत्रज्ञानाच्या मानगुटीवर..



कोरोनाच्या महासंकटात माणूस खूप वेगळ्या दुनियेचे अनुभव घेतोय. घरात थांबून माणूस जगाची सफर करतोय. दुसऱ्याच्या जगण्याची चिंता करण्याअगोदर स्वतःच्या जीवाची काळजी घेतोय. त्यामुळेच माणसाने स्वतःला घरात कोंडून घेतलंय. रोजचं काम म्हटलं तर ऑफिसला जाण्यापासून तर घरी परतण्यापर्यंत सगळं घरात बसूनच चाललंय. "वर्क फ्रॉम होम" म्हणजेच घरी राहूनच काम करणं शक्य होतंय ते तंत्रज्ञानामुळे..

अरे हा तंत्रज्ञानामुळे खूप काही चालतंय. आज टीव्हीवर बातमी ऐकली आणि मन हळहळल. बातमी होती ती एका मृत्यूची. कोरोनाच्या महासंकटात पतीच्या निधनानंतर पत्नीला प्रवासास शक्य नसल्यामुळे पतीचं अंतिम दर्शन मोबाईलवरच घेतलं. ज्याच्याबरोबर उभं आयुष्य घालवलं त्याच जिवलगाबरोबर अंतिम क्षणाला प्रत्यक्षात मुकावं लागलं, पण मनाला कुठेतरी समाधान म्हणून मोबाईलच्या विडिओ कॉलद्वारे म्हणजेच तंत्रज्ञाने ती इच्छा भरून काढली.

माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आय टी क्षेत्राचा उल्लेख कुठेही होतांना दिसत नाहीये. थांबलेल्या शहरांना, गावांना चालविण्यासाठी आय टी क्षेत्र मोलाची भूमिका बजावत आहे. बँक, मोबाइल, टीव्ही, मीडिया, कंपनी सारखे अनेक विभाग यांच्याच जोरावर चालू आहेत. घरात बसून बोर होण्यापेक्षा इंटरनेटवरची सर्फिंग ह्या कठीण काळात दिवस घालवताना दिसतेय. काही क्षेत्र माणसा अभावी थांबलेत पण बरेचशे क्षेत्र आय टी मुळे चालू आहेत.

ह्या संकटाच्या काळात हॉस्पिटलमधील सॉफ्टवेअर असो वा सरकारने बनवलेले आरोग्यसेतू अँप असो सर्व काही ह्या आय टी मुळे  झालं. सर्वांचे आभार मानताना ह्या लॉक डाऊन मध्ये ह्या आय टी क्षेत्राचे पण आभार मानायला हवेत. कारण त्यांचा कर्मचारी वर्ग राबतोय म्हणून तंत्रज्ञानाच्या मानगुटीवर बसून भरपूर प्रमाणात काम होतांना दिसतंय, नाही तर सर्वच डुबल असत.

सर्व आय टी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एक सलाम..

डॉ. प्रशांत शिरोडे.

शापित योध्दा ..


युद्ध चालू असलं कि त्यात प्रत्येक योध्द्याचा  सहभाग महत्वाचा असतो. युद्ध पुकारलं तर त्या प्रत्येक योध्द्याला आपलं योगदान हे द्यावचं लागत. युद्धभूमीला त्याच्या योगदानाची जाण नक्कीच असते. सर्व योद्धे आपलं कर्तव्य बजावत असताना, कुणा एका योध्द्याकडे लक्ष देण्यात आलं नाही तर त्याच मनोबल खचण्याची शक्यता असते. पण आपल्याकडे लक्ष नसलं तरीही आपल्या कर्तव्यासाठी तो योध्दा शेवट्पर्यंत रणांगणावर लढत असतो. कारण त्याच्यासमोर शत्रूला नेस्तनाभूत करण्याचं ध्येय असत.

कोरोनाच्या महासंकटात देवासारखे धावून आलेले योद्धे म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सफाई कामगार आणि प्रशासनातील कर्मचारी. हे सर्व अहोरात्र ह्या महासंकटात लढत आहेत. कोरोनाच्या लढाईत ह्या प्रत्येकाचा उल्लेख कुठल्यानं कुठल्या माध्यमातून होताना दिसतोय. स्वतःचा जीव धोक्यात घालून आपलं कार्य प्रामाणिकपणे करणाऱ्या ह्या सर्व घटकांचं मनोबल वाढावं हा त्या मागचा उद्देश असतो. ह्या सर्व लढाईत सगळ्यांचं नाव अनेक वेळा घेण्यात आलं, पण "फार्मासिस्ट" म्हणजेच "औषधनिर्माणशास्रज्ञ" मात्र कुणाच्याही नजरेत आला नाही. ह्या महासंकटात त्याचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याच्या मनोबलाचा कुठंतरी विचार होताना दिसत नाही. तरीही तो आपल्या कर्तव्यात कमी पडताना दिसत नाही, त्याने स्वतःला "शापित योद्धा" समजून घेतल्यामुळे त्याचा कुणावर रागही नाही.

कोरोनाच्या घडामोडीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी फार्मासिस्टच्या योगदानाचा उल्लेख करून त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी ट्विट केलं आणि ते ट्विट फार्मा जगतात व्हायरल झालं. एक मंत्र्याच्या दोन शब्दांनी सगळं फार्मसी क्षेत्र खुश झालं. छोटीशी माफक अपेक्षा बाळगणारा हा वर्ग नेहमीच दुर्लक्षित राहिला. त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यापेक्षा त्याच्या उपेक्षाच जास्त झाल्या. उदाहरण द्यायचं झालं तर त्याची जॉब सेक्युरिटी. अलीकडच्या काळात एक दोन महिन्यानंतर कानावर बातमी पडते, अमुक कंपनीतून ३०० फार्मासिस्ट कामावरून काढलीत, तमुक कंपनीतून ८०० लोक काढलीत. खूप मोठ्या घडामोडी झाल्या तरी फार्मासिस्टच्या प्रश्नाला कोणी वाचा फोडताना दिसत नाही. आपल्या पोटावर दगड पडला तरी त्याची दखल घेतली जात नसल्याचं माहित असून तो स्वतःला कुठेतरी गुंतवून घेतो आणि आपलं जगणं चालू ठेवतो. तो मन मारून जगणारा शापित योद्धा म्हणजे फार्मसिस्ट असतो.

कोरोनाच्या महासंकटात हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर्स, मेडिकल एजन्सी, रिसर्च, औषध उत्पादन ह्या प्रत्येक क्षेत्रात लॉकडाऊनच्या काळात आपलं कर्तव्य मोठ्या अभिमानाने निभावताना दिसणारा शापित योध्या प्रसिद्धीपासून दूरच आहे. मेडिकल स्टोअरवर कुठलीही लक्षण असलेला रुग्ण किंवा सामान्य माणूस आला तरी त्याला निसंकोचपणे औषध देणारा योद्धा म्हणजे फार्मासिस्ट. आज "हैड्रोक्सिक्लोरोक्वीन" नावाच्या औषधाची जागतिक स्थरावर मागणी असताना, देशाची गरज पूर्ण करून जगाच्या मदतीला हे औषध बनवून पाठवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारा योद्धा  म्हणजे फार्मासिस्टच आहे. म्हणून त्याच मनोबल वाढविण्यासाठी त्याला त्याच्या कामाची शाबासकी देणं तितकच महत्वाचं आहे.

देशाच्या महासंकटात कणखरपणे उभ्या राहणाऱ्या "फार्मासिस्ट" ह्या शापित योध्द्याला  त्याच्या निस्वार्थी सेवेसाठी तिवार सलाम..

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...