साहित्य अन संमेलन...



मराठी भाषा... जगाच्या पाठीवरची एकमेव भाषा, ज्या भाषेचं गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य संमेलन आयोजित केलं जात. ह्या वर्षी ९२ व  मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे जेष्ठ साहित्यिक "अरुणा ढेरे" ह्यांच्या अध्येक्षतेखाली पार पडणार आहे. १८७८ मध्ये पहिले मराठी साहित्य संमेलन "न्यायमूर्ती रानडे" ह्यांच्या अध्येक्षतेखाली पुण्यात झालं. मराठी भाषेची हि साहित्य संमेलन गोवा, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि पंजाब सारख्या इतर राज्यातील मराठी संस्कृतीशी निगडित असलेल्या शहरात झालीत.

साहित्य म्हणजे भाषेचं वैभवच ज्यात लेखक, कवी, संगीत, संस्कृती आणि कला ह्यांचा समावेश असतो. ह्या सर्व गोष्टींचा सन्मान जिथे होतो त्याला साहित्य संमेलन म्हणावं लागेल. साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणाला एक वेगळच महत्व असत ज्यातून साहित्याचं, सामन्याच्या मनातलं आणि चालू घडामोडींवर भाष्य केलं जात. अध्यक्षीय भाषणाची दखल सरकारी दरबारातही घ्यावी लागते.

ह्या वर्षीच मराठी साहित्य संमेलन नेहमीसारख वादाच्या भोवऱ्यात सापडलं. जणू साहित्य संमेलन हे कुठल्यातरी वादाशिवीय चालूच होत नाही, हे जणू समीकरणच झालंय. राजकीय वादात तर कुठलीही गोष्ट सापडते आणि ह्या वेळेचं संमेलनही त्याचाच एक भाग झालं. एका इंग्रजी साहित्यिकाला प्रमुख पाहुणे बोलवून, राजकीय द्वेषापोटी त्याची उपस्थिती न राहण्यासाठी नाट्य घडवून आणण्यात आलं. ह्या घटनेनंतर सर्व साहित्यिकांना, लेखकांना जणू बळच आलं. एरवी शेतकऱ्यांची आत्महत्या, सरकारची कामाची पद्धत ह्या विषयात आपली लेखणी बाजूला ठेवणारे जणू कादंबरी लिहतात कि काय? अशी परिस्थती झाली.

असो, आजच चालू होणार अधिवेशन हे ९२ वर्षात पाचव्या अध्यक्षीय महिलेच्या म्हणजेच अरुणा ढेरे च्या मार्गदर्शनाखाली पार पडतंय. हि मराठी साहित्य आविष्काराची यशोगाथा अशीच चालू राहो ह्याच शुभेच्छा.

डॉ. प्रशांत शिरोडे.

नवसंकल्पवर्ष



हे वर्ष किती लवकर संपलं ना? साहजिकच एक वर्ष संपत असताना दुसऱ्या वर्षी नेहमी येणारा सामान्य प्रश्न? कधी चर्चा इंग्रजी नवीन वर्षाची तर कधी मराठी नवीन वर्षाची.. कधी दिवाळीतील नवीन वर्ष तर कधी धर्माच्या रितीनुसार नवीन वर्ष.. इंग्रजांच्या सानिध्यानंतर आणि जागतिक गरजेनुसार इंग्रजी नवीन वर्षाला थोडं जास्त महत्व प्राप्त झालं.

नवीन वर्ष नेहमी काहीतरी नवीन करण्याच्या उमेदीने उगवत. नवीन संकल्पना, नवीन स्वप्न, नवीन स्पर्धा, नवीन लक्ष.. सगळं काही नवीन नवीन मनात येत आणि नावीन्याला किती प्रमाणात सत्यात उतरवायचं हे व्यक्तिपर अवलंबून असत. जुन्या थांबलेल्या गोष्टींना पुढे नेण्याचा संकल्प सुद्धा नवीन सुरवातच असू शकतो.

आता तर बातमी पण वाचायला भेटते कि १ जानेवारीला जिमला व्यायामाला येणाऱ्यांची संख्या खूप असते आणि आठ दिवसात ती पुन्हा आहे तीच होते. म्हणजे व्यायामाचं स्वप्न नवीन वर्षापुरते असते आणि हळू हळू ते कमी होते. संकल्प करायचा तर तो पूर्णत्वाला न्यायचाच असतो आणि तो ध्येय ठेवून वेळात पूर्ण केला तर नक्कीच नवीन वर्षाचं नावीन्य संकल्पपूर्तीनंतर पुन्हा जाणवत.

२०१८ ला अलविदा करताना २०१९ च नवीन ३६५ पानाचं पुस्तक चांगल्या गोष्टींनी लिहलं जावो ह्याच सद्धीच्छा. हे वर्ष नवीन संकल्पनांबरोबर, गावापासून देशापर्यंत आणि देशापासून विश्वापर्यंत सुखाचं जावो. नवीन कल्पना, नवीन स्वप्न, नवीन ध्येय आणि सर्व नवीन प्रत्यक्षात येवो ह्याच हृदयापासून शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे..

आमदार ..


गणपतराव देशमुख एक सर्वसामान्य आमदार. प्रश्न पडला असेल कि आमदार कसा सर्वसामान्य असू शकतो?  आजपर्यंत स्वतःच्या आहे त्याच घरात राहून सर्वसामान्याना सहजपणे भेटता येणारे आमदार. जवळजवळ ५५ वर्ष नेतृत्व केलेलं असताना अजूनही एसटी बसने प्रवास करणारे आमदार. सयुंक्त महाराष्ट्र चळवळीत अभूतपूर्व सहभाग असणारे भारदस्त व्यक्तिमत्व.

देशातील सर्वात जास्त कार्यकाळ असलेला आमदार, म्हणजे ११ वेळा सलग निवडून येणारे ९२ वर्षीय लोकाभिमुख तरुण आमदार. १९६२ साली वयाच्या ३४ व्या वर्षी सांगोला मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर सलग ५५ वर्ष एक मतदारसंघ, एक झेंडा, एक पक्षातून देशात निवडून आलेला एकमेव आमदार. ५१ वर्ष विरोधी बाकावर बसून दुष्काळग्रस्त मदारसंघाला पाणीदार करण्यासाठी लढणारा लढवा आमदार.

आपल्या विजयी घौडदोडीत एकदा १९२ मतांनी पराभव झाल्यानंतर त्या पराभवाचा निकाल सांगण्यासाठी कुठला अधिकारी पुढे येत नव्हता, विजयी उमेदवार मतमोजणी कक्षातून बाहेर येत नव्हता, कार्यकर्ते फेरमतमोजणीची मागणी करत असताना, आमदार साहेब मतमोजणी अधिकाऱ्याला बरोबर घेऊन जनमाणसासमोर निकाल जाहीर करून आपला पराभव आनंदाने स्वीकारला. दिलदार राजकारणीच राजकारणाचा हा अध्याय घडवू शकतो हे तितकच खरं.

गरिबांपासून श्रीमंतांना सहजपणे उपलब्ध असणारा आमदार. सामान्य राहणीमानापासून ते उच्च विचारसारणीपर्यंत जीवनाचा प्रवास करताना महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्य साधारण स्थान टिकवून ठेवणाऱ्या निष्ठावान आमदार गणपतराव देशमुख यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

शत-प्रतिशत



एक्सिट पोल म्हंटल कि किती विश्वास ठेवावा आणि किती नाही तेच समजतं नसत. आताच पाच राज्यांच्या निवडणूका झाल्या आणि त्यात एक्सिट पोल गेल्या चारवर्षांपेक्षा थोडे वेगळेच आले. सत्ताधारी पक्षाने नेहमीप्रमाणे विजयरथाची चाक तयारच ठेवली होती आणि दुसऱ्या पक्षांनी आपली मनाची धास्ती मनात जागीच राहू दिली होती. पाच राज्यांच्या निवडणुकीचा एक्सिट पोल प्रत्यक्षात कितपत खरा ठरतो ह्याची प्रतीक्षा आज संपली आणि निकाल जवळजवळ एक्सिट पोलच्या अनुमानानुसार लागला आणि सत्ताधारी पक्षाची विजयरथाची चाक जागेवरच उभी राहिली.

सत्ता एक अशी गोष्ट आहे जिचा उपयोग केला तर सन्मान होतो आणि दुरुपयोग केला तर अपमान होतो. ६० वर्ष सत्ता भोगणारी काँग्रेस सत्तेच्या नशेतून जनतेने उतरवली आणि त्याच सत्तेची नशा भाजपालासुद्धा लवकर चढली आणि जनतेने एकाच वेळेस त्यांची हि नशा ह्या निवडणुकीत उतरवली. २०१४ नंतरच्या कुठल्याही निकालानंतर भाजप कार्यालयासमोर मंडप, फटाके आणि जलोषाबरोबर प्रतंप्रधानाचं भाषण व्हायचं, आज मात्र सगळं शांत होत आणि जिथे शुकशुकाट असतो तिथं आज जलोषाच वातावरण बघायला भेटत होत. कदाचित सत्ताधीशाना जनता जनार्दनाचा कल आतातरी चांगलाच समजलेला दिसतोय, असं ह्यातून समोर येतंय.

सत्तेवर असताना जनता जनार्दनाचा विचार न करता हुकूमशाही दाखवणं महागातच पडत. जनता सत्तेत बसवते, पण त्या सत्तेचा उपद्रव केला तर खालीही खेचते हे आजच्या निकालावरून स्पष्ट होताना दिसतंय. आंतरराष्ट्रीय स्थरावर देशाचं नाव वरती नेताना राष्ट्रीय स्थरावर सामन्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे शत प्रतिशत पराभव स्वीकारावाचं लागेल. राम मंदिर, पाकिस्तानला समज, काश्मीरचा कायदा यांचा विसर आणि नोटबंदीसारखे अनेक हेकेखोरपणाने नियोजनशून्य घेतलेले निर्णय ह्या निवडणुकीतून निकालात अवतरले.

मोदी-शहा जोडीने ह्या निकालानंतर एका राज्यापुरताचा विचार सोडून संपूर्ण राष्ट्राचा विचार प्रामाणिकपणाने करून जनतेच्या मनातील, भाजप अंतर्गत नेत्यांच्या सहमतीने, मित्र पक्षांबरोबर कूटनीती न करता हेकेखोरपणा सोडला तर नक्कीच शत-प्रतिशत राहतील. शेवटी भाजप जर दुसरं काँग्रेस होत असेल तर जनता त्यांना शत-प्रतिशत घरचा रस्ता दाखवेलच..

डॉ. प्रशांत शिरोडे.

भीमपर्व..


उधारली हजारो कुळे...
भीमा तुज्या जन्मामुळे..

स्वतंत्र पूर्वीच्या काळात समाजमान्य चालीरीतींत वावरणाऱ्या एक उपेकषित वर्गाला त्यांच्या जीवन पद्धतीची जाण करून देण्यासाठी आपलं आयुष्य पूर्ण झोकावणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.. त्या काळातल्या भारतीय शैक्षणिक अधोगतीत सुद्धा उच्च शिक्षण घेऊन समाज कार्य आणि राष्ट्र कार्य करणारा महापुरुष..

समाजहितासाठी काही विशिष्ट वर्गाला सवलती काही विशिष्ट वेळेसाठी नमूद करून एक संविधानिक दर्जा देणारा माणूस. पण काळाच्या ओघात राजकीय फायद्यासाठी त्या विशिष्ट वेळेला नाकारण्यात आलं जे बाबासाहेबाना कदापि मान्य नव्हतं.. उपेक्षित वर्गाच्या उत्कर्षासाठी ठरवून दिलेल्या सवलती कालमर्यादेपेक्षा जास्त काळ किंवा राजकीयहेतूने कायमस्वरूपी केल्यामुळे सामाजिक विषमता कमी होण्याऐवजी ती जास्त वाढताना दिसते.

छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवून जागतिक संविधानाचा अभ्यास करून राज्यघटना लिहणाऱ्या समितीत आपली भूमिका बजावणारे बाबासाहेब... समाजातील उपेक्षित वर्गाला सवलतींचा फायदा होऊन तो समाज मुख्य प्रवाहात यावा जे बाबासाहेबांचं मुख्य उद्धिष्ट होत. पण अलीकडच्या काळात उपेक्षित वर्गापेक्षा अपेक्षित वर्ग त्याचा फायदा घेताना दिसतोय..

निळ्या आकाशासारखे अविरत अभ्यास करणारे बाबासाहेब आणि त्यांचं भीमपर्व सध्य स्थितीत जातीच्या पुस्तकात सिमीत होत असताना एक मराठी म्हणून बाबासाहेबाना ६२ व्या महापरिनिर्वाणदिनी भावपूर्ण आदरांजली.

डॉ. प्रशांत शिरोडे..

कांद्याचे अश्रू ...



कांदा चिरतांना डोळ्यात पाणी येत तसंच सध्या कांदा विकताना शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येताना दिसतंय. कांदा सामान्यांना पोट भरण्यासाठी चिरताना डोळ्यात पाणी देतो तर तोच कांदा शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचं फळ न मिळाल्यामुळे डोळ्यात पाणी देतो. सध्याची परिस्थिती तशीच आहे, कांद्याचा बाजारभाव १.५० रुपये किलो आहे. कांदा पिकवून योग्य भाव येईपर्यंत साठवला जातो, ज्याचा खर्च साधारणतः ३-४ रुपये प्रति किलो येतो. पण आजचा बाजारभाव बघितला तर कांदा १-२ रुपये किलो भावाने विकला जातोय, म्हणजेच ह्या भावात शेतकऱ्याला उत्पादन खर्चही मिळत नाही.

सध्याची दुष्काळी परिस्थिती बघता कांद्याबरोबर सर्व पिकांचं उत्पन्न कमी आहे म्हणून त्याचा बाजारभाव जास्त असेल अशी सामान्य शेतकऱ्याची भावना आहे. शेतकऱ्याची हि भावना सरकारला कळत नाही, अस मुळीच नाही, पण त्यांना नेहमीप्रमाणे राजकीय स्वार्थ्याचं पडलेलं असत. आताही तसंच झालं, चार राज्यांच्या निवडणूका चालू असल्याने मतांच्या राजकारणाकरता शेतकऱ्याला बळीचा बकरा बनवलंय.

शेतीमालाला भाव असणं म्हणजे भीक मागितल्यासारखं झालय. आम्ही दीडपट भाव देऊ म्हणणारे उत्पादन खर्चाचा निम्मा भाव देतायेत. हे तर सरकारच झालं हो, पण शहरी माणूसही हि २-४ रुपये भाव वाढला कि अशी प्रतिक्रिया देतो कि जणू आभाळच कोसळलंय. पिझ्झा, बर्गर खाण्यासाठी ५०० रुपये गेले तरी कुठलीही कुरकुर न करणारे ५ रुपये कांद्याचा भाव वाढला कि बोंबाबोंब करतात. अश्या लोकांनी शेतकऱ्याची मेहनत, परिस्थिती आणि जगण्याची पद्धत एकदा जाऊन बघायला हवी.

कांद्याचा एक अश्रू चवीच्या आनंदासाठी तर एक अश्रू अथक कष्टाच्या फळासाठी.. एक असतो खवय्यांसाठी तर एक असतो शेतकऱ्यांसाठी.. शेतीप्रधान देशात शेतकरी नावाला राजा म्हणवला जातो, पण प्रत्यक्षात ह्या राजाचे प्रजेपेक्षा वाईट हाल असतात. सातवा वेतन आयोग लावणाऱ्या सरकारने शेतकऱ्याला जगण्यासाठीच वेतन हमीभाव स्वरूपात दिल तरी तो जगण्याची आशा सोडणार नाही.

डॉ. प्रशांत शिरोडे.

मराठी रंगभूमी... कडक..



कडक.. शब्द थोडा वेगळा वाटला ना.. हो वेगळाच आहे त्याच असं कि ह्या आठवड्यात दोन मराठी चित्रपटांनी हिंदी चित्रपटांना तिकीट खिडकीवर चांगलंच खाली खेचल, त्याच एका चित्रपटातील हा मुख्यशब्द. ज्या चित्रपटगृहांना नेहमी मराठीच वावडं असत त्या चित्रपटगृहांनी "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" आणि "नाळ" ह्या दोन मराठी चित्रपटांना जास्त शो देऊन हिंदीतले बादशाह अमिताभ बच्चन आणि अमीर खान यांची भूमिका असलेला "ठग्ज ऑफ हिंदुस्थान" ह्या चित्रपटाचे शो कमी केलेत. आकडे सांगायचे झाले तर ठग्ज ऑफ हिंदुस्थान १३३३ च्या शो वरून १५० शो केलेत आणि नाळ चे ३०० वरण ४०० शो केले त्याबरोबर आणि डॉ.काशिनाथ घाणेकरचे १७७ वरण ३१० शो केलेत.

मराठी रंगभूमीचे सध्याचे चित्रपट काही वेगळेच आहेत. श्वास चित्रपटापासून ते मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, सैराट, नटसम्राट सारख्या एकाहून एक अभूतपूर्व चित्रपटांची हि यशस्वी शृंखला "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" आणि "नाळ" ह्या जबरदस्त चित्रपटांपर्यंत येऊन पोहचली. ह्या दोन्ही चित्रपटांनी जणू मराठी रसिकवर्गाला पुन्हा तिकीट खिडकीवर खेचून हिंदी चित्रपटांना नुसत मागे टाकलं नाही तर अमराठी प्रेक्षकांनाही आपल्या कलेच्या मोहात ओढलं. खरं तर मराठी चित्रपट हे मुद्देसूद आणि एक योग्य कथानकाला जोडून असतात पण हिंदीच्या वर्चस्वापुढे कुठे तरी कमी पडतात. असो पण आता दिवस बदलतायेत.

"आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" ह्या चित्रपटात मराठी नव्हे तर साऱ्या चित्रपट श्रुष्टीवर अदभूत लाभेलला एक कलाकार ज्याने ह्या भूमीवर कलेचा वेगळा अविष्कार पहिल्यांदा दाखवला. मराठी रंगभूमीला पहिली टाळी, पहिली शिट्टी मिळवून देणारा आणि मुख्य कलाकाराच नाव शेवटी सांगण्याची प्रथा देणारा कलाकार म्हणजे डॉ. काशिनाथ घाणेकर. ह्या महान कलाकाराच्या भूमिकेला तितकीच कडक दाद देणारा सुबोध भावे मनाला खूप भावून जातो.

"नाळ" ह्या चित्रपटातून रसिकप्रेक्षकांना भावुक करणारी एक वेगळी निर्मिती समोर आणली आहे. ८ वर्षाच्या श्रीनिवास पोखळे च्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमीच. एका लहान मुलाने प्रेक्षकांच्या नजरा शेवटपर्यंत टिकवून, चित्रपटातील भूमिकेला पूर्ण न्याय देताना उत्तम कथानकातून रसिकप्रेक्षकांच्या डोळ्यातील अश्रुना वाट मोकळी करून देतो.

मराठी रंगभूमीची यशस्वी शृंखलेची हि "नाळ" अशीच टिकून राहो आणि रसिकप्रेक्षकांना एकसे बढकर एक चित्रपट भेटीला येवो ह्याच "कडक" सद्धीच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

सरसेनापती मराठीमनाचा ..


महाराष्ट्राच्या मातृभूमीने अनेक संतांना, वीरपुरषांना, स्वातंत्र्यसैनिकांना, शूरवीरांना, सैनिकांना आणि शास्त्रज्ञाना जन्म दिला. ह्या पावन भूमीची शौर्याची यशोगाथा अगणित आणि अविभूतीत आहे. हिमालयाला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा हा सह्याद्री हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. ह्या मराठमोळ्या भूमीने जन्म दिला संत तुकारामांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना, ज्योतिबा फुलेंना आणि ह्याच शृंखलेत जन्म दिला बाळासाहेब ठाकरेंना ...

शूरवीरांच्या भूमीला नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाला नव्हे नव्हे तर पूर्ण जगाला राजकारणाची वेगळी ओळख करणारा एक वेगळा राजकारणी. अस्सल ठसठशीत मराठमोळा अभिमान असणारा मराठी माणूस, शिवरायांच्या यशोगाथेला अभिमानाने गौरवास्पद करणारा शिवसैनिक, शिवसेना नावाची मराठीमोळी संघटना उभा करणारा क्रांतिकारी, मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी लढणारा महाराष्ट्र सैनिक, व्यंगचित्रांच्या रेषांतून परिस्थितीची जाण करून देणारा व्यंगचित्रकार, हिंदुस्थानातील हिंदूंसह सर्व धर्माना धर्माभिमान शिकवणारा धर्मप्रेमी, सामान्यांना आपलं वाटणारा असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणज़े बाळासाहेब..

राजकारणात सत्ता नसताना सुद्धा समांतरित सत्ता लोकांच्या हिमतीवर चालवणारे, तोंडातून एकदा निघालेला शब्द कधीच परत न घेणारे, कुणाचीही मदत करण्यासाठी नेहमी आपली सत्ता वापरणारे, शिवरायांना डोक्यापासून तर हृदयापर्यंत आत्मसात करणारे, परदेशी लोकांनी ह्या भूमीत येण्याअगोदर शिवरायांचं नाव घ्यावं म्हणून मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव देणारे, देशातील पहिली ट्रेन ज्या स्थानकावर धावली त्या स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव रूपाला आणणारे, मुंबईत राहून पाकिस्तान सारख्या विरोधकांना धडकी भरवणारे, अश्या अनेक अनेक राजकारणाचे पैलू असताना सतेच एकही पद न घेता देशहितासाठी असंख्य गोष्टी करणारे अदभूत शिवसेनाप्रमुख...

बाळासाहेब नावाचं वादळ हे शेवटच्या श्वासापर्यंत मराठमोळ्या, हिंदुस्थानी आणि शिवसैनिकांच्या मनात बसलेलं आहे. अखेरच्या श्वासात सुद्धा जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत सारा देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. जगाचा निरोप घेताना सुद्धा बाळासाहेबांनी पराक्रमाची गाथा चालू ठेवली. हिंदुस्थानातील सर्वात मोठी अंतयात्रा हि लोकमानसात प्रेम असल्यामुळे दिसून आली आणि त्या दिवशी खर्याअर्थानें कधी न थांबणारी मुंबई नावाची धावती दुनिया सुद्धा थांबली होती.

बाळासाहेब तुम्ही महाराष्ट्र नावाच्या शिवरायांच्या विश्वात जन्माला आलात हा आम्हा मराठीमाणसाचा गौरवच म्हणावा लागेल. बाळासाहेब तुम्ही गेलात हे आज पण खरं वाटत नाही कारण तुमच्याबद्दलचा आदर आणि तुमचा दरारा आज पण तेवढाच आहे आणि भविष्यात तो तसाच राहील.. आपण खरंच अदभूत आणि अद्वितीय होता आणि राहाल..

राजकारणापलीकडचा महामाणूस, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली..

जय हिंद, जय महाराष्ट्र ..

(राजकीय वारसा -२)

डॉ. प्रशांत शिरोडे.

अनाथांची माय .. सिंधुताई सपकाळ



माणसाचा जन्म झाल्यावर माणूसपण अनुभवायला भेटलच पाहिजेल. माणसात जन्माला येऊन माणूसुकीच माणूसपण विसरली तर होणारी वेदना असह्य असते. माणुसकीच्या दुनियेत अमाणूसपणा भेटल्यानंतर माणुसकी निभावणार उत्तम उदाहरण म्हणजे "सिंधुताई सपकाळ". स्वतः अनाथ झाल्यानंतर परिस्थितीवर मात करून अनेक अनाथांची माय झालेल्या सिंधुताई.

१४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्ध्यातील नवरगाव येथे सिंधुताईंचा जन्म झाला. चौथी पर्यंत शिक्षण झालेल्या सिंधुताईंचं लग्न वयाच्या नवव्या वर्षी झालं. गुर वळून शेण गोळा करणे हा सिंधुताईंचा रोजचा दिनक्रम. हेच गोळा केलेलं शेण जमीनदार कुठलाही मोबदला न देता विकत असत, त्याचा मोबदला भेटत नसल्यामुळे सिंधुताईंनी आवाज उठवला. सिधुताईंच्या ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविल्यामुळे जमीनदाराने त्यांच्यावर तीन मुलांनंतर पोटात असलेलं बाळ आपलंच असल्याची अफवा पसरवली आणि ह्या अफवेमुळे नवऱ्याने त्यांना मारत मारत घराबाहेर काढलं आणि त्यापाठोपाठ गावानेही वाळीत टाकलं. माहेरी गेल्यावर जन्मदात्यांनीही पाठ दाखवली. सुरवातीच्या काळात स्मशानातील अंतिमसंस्कारासाठी वापरलेलं पीठ स्मशानातील विस्तवावर भाजून पोट भरताना तिथल्या कावळ्यांनीही त्यांना टोचा मारून स्मशानतला मुक्काम हलवायला लावला. पावलापावलवरच्या संकटाना सामोर जाताना अनाथ अवस्था उपभोगल्यानंतर तीच भावना त्यांना अनेक अनाथांच्या संगोपनाकडे घेऊन गेली.

अनाथांची सेवा करण्याची इच्छा सिंधुताईंना रेल्वे स्टेशनवर भीक मागणाऱ्या आईच्या देहाशेजारील ८ महिन्याच्या मुलीला आश्रय देण्यापासून झाली ती सुमारे १०५० अनाथांपर्यंत येऊन पोहचली. अनाथांची सेवा करण्यासाठी ममता बाल सधन, बाल निकेतन, सावित्रीबाई फुले मुलींचे वस्तीगृह, अभिमान बाल भवन, गोपिका गाई रक्षण केंद्र सारख्या संस्था सुरु केल्या. अनाथांच्या उदरनिर्वाहासाठी जगभरात आपल्या उत्तम वक्तृत्वाच्या जोरावर पदर पुढे करून आजही भीक मागतात. गावस्थरापासून ते आंतरराष्ट्रीय स्थरावर आपल्या कार्याच्या आणि वक्तृत्वाच्या जोरावर एक वेगळाच गौरव उभारला. त्यांच्या ह्या कार्यासाठी त्यांना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आणि एक मराठी चित्रपट त्यांच्यावर बनवून त्यांना गौरविण्यात आलं.

माणुसकीने दगा दिल्यानंतर संकटाच्या काटेरी वाटेला समोर जाऊन अनेकांना आश्रय देऊन जगवलं, वाढवलं आणि शिकवलं. ज्या नवऱ्याने घराच्या बाहेर काढलं त्याच नवऱ्याला म्हातारपणात आपल अनाथ बाळ म्हणून आश्रय देणाऱ्या मोठ्या मनाच्या अनाथांच्या मायेला जन्मदिनी दीर्घायुष्य लाभो ह्याच शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

तमाशा...


रसिक होऊ दे दंग, चढू दे रंग असा खेळाला,
साता जन्मांची देवा पुण्याई लागू दे आज पणाला,
हाथ जोडतो आज आम्हाला दान तुजा दे संग,
नटरंग उभा ललकारी नभा स्वर ताल झाले दंग ..

हे गाण्याचे बोल नटरंगला म्हणजे कलेच्या देवतेला वंदन करून रसिकप्रेक्षकांसमोर आपल्या स्वरांचा, नृत्याचा आणि कलेचा खेळ सुखरूप होण्यासाठी  विनंती करण्याचे बोल आहेत.

महाराष्ट्राची लोककला "तमाशा".. सहसा घरात काही भांडण झालं का आपसूकच एक वाक्य येत कि काय तमाशा मांडला? आजपण तमाशा बघणं तस चांगल्या गोष्टीच लक्षण समजलं जात नाही. तमाशाला चांगला न म्हणायचं मुख्य कारण त्यात स्रिया नृत्य करतात आणि अश्लील विनोद उद्गारले जातात. नृत्य कलेचं प्रतीक तर अश्लील विनोद हास्यविनोदांचं प्रतीक पण ह्यात जास्तीचा उत्साह ह्या तमाशाला मुख्य हेतूपासून दूर नेताना दिसतो.

तमाशा हि कला मुख्यतः तीन भागात विभागली जाते एक नृत्य दुसरं गीत आणि तिसरं वघ. तमाशा सुरु होताना पहिले देवाची आरती आणि नटरंग पूजन केलं जात. नृत्यात मुख्यतः भारतीय गीतांवर नृत्य केलं जात ज्यात स्त्रीपुरुष दोन्ही नाचतात. गीताचं सुद्धा तसंच ज्यात भारतीय गीत गायक गातात. गवळण, लावणी, भक्तिगीतांचाही ह्यात सहभाग असतो. अधून मधून विनोदाचे चुटके चालू असतात. संगीत कलेचा हा अविष्कार संपल्यानंतर वघ नाट्य सादर केलं जात, ज्यातून एक सामाजिक विषय घेऊन नाट्यातून सामाजिक प्रबोधन केलं जात. तमाशा हा फडात म्हणजेच तंबूत होत असतो. रोषणाई हा तमाशाचा एक मुख्य आकर्षण असत.

तमाशा हि लोककला आहे आणि ती लोकांच्या करमणुकीसाठी जोपासली जाते. एक विशिष्ट वर्ग पिढ्यानपिढ्या हि कला ज़ोपासतो. घरदार सोडून रसिकप्रेक्षकांच्या आनंदासाठी जर हि कला ज़ोपासली जात असेल तर तिला दाद देणंही रसिकप्रेक्षकांचं कर्तव्य बनत..

डॉ. प्रशांत शिरोडे.

सण दिव्याचा..



सण उत्सवांची परंपरा भारतभूमीला पूर्वापार लाभली आहे. इंग्रजी दिनदर्शिकेतील मकर संक्रातीपासून चालू होणारी सणांची श्रुंखला तुळशी विवाहापर्यंत चालते. प्रत्येक सणाचं एक वेगळं असं महत्व आहे. प्रत्येक सण हा एक विशिष्ट पद्धतीने साजरा केला जातो. सणातून भेटणारा आनंद, उत्साह काही निराळाच असतो. सण मुख्यतः एकत्रित येऊन एकमेकांचे सुखदुःख वाटण्यासाठी साजरे केले जातात. काळाच्या ओघात सण साजरा करण्याची पद्धतही बदलत चालली जी सणाच्या मुख्य हेतू पासून दूर जाताना दिसतेय.

सणांचा राजा दिवाळीचा सण. सलग पाच सहा दिवस चालणारा सण. दिवाळीची चाहूल मनाला नेहमीच लागलेली असते. दिव्यांचा सण हा चैतन्य देतो आणि ह्या चैतन्यातूनच वातावरणात उत्साह संचारतो. दिवाळीत मामाच्या गावाला जाण्याची मज्जा असो वा किल्ले बनवण्याचा उत्साह असो सगळं काही निराळच असत. शुभेच्छांपासून ते आशिर्वादापर्यंत सगळं भरभरून असत. वसुबारसपासून सुरु होणारा सण भाऊबीजेपर्यंत चालतो. "दिन दिन दिवाळी गायीम्हशी ओवाळी, गायी कुणाच्या, गायी लक्ष्मणाच्या.." ह्या उत्साही गाण्याने तार काडी फिरवण्याची आणि फटाके फोडण्याची मजा काही वेगळीच असते.

वसुबारस गायीची आणि वासराची पूजा करून त्यांच्यातील ममता आणि उदारता आपल्या अंगी येण्यासाठी साजरा करतो. धनत्रयोदशी धनाच्या पूजेसाठी, धनाच्या उत्कर्षासाठी, धन्वंतरीची कृपादृष्टीसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी. नरकचतुर्दशी म्हणजे अन्यायावर, असत्यावर विजय मिळविण्यासाठी. लक्ष्मीपूजन लक्ष्मीच्या नित्य सहवासासाठी, घराच्या लक्ष्मीच्या सुखासाठी. दीपावली पाडवा घरातील गोडव्यासाठी, थोरामोठ्यांच्या आशीर्वादासाठी. भाऊबीज बहीण भावाच्या नात्याला अतूट ठेवण्यासाठी ..

जगाच्या पाठीवर सण परंपरेत भारताची ओळख दिवाळी ह्या सणाने होते. भारतीय संस्कृती आणि तिच्या परंपरेत सणांचा विशेष वाटा आहे. दिवाळी हा सण सर्व  धर्मियांकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला  जातो. हे सण उत्सव दिमाखाने साजरे होत राहो. चैतन्य, उत्साह आणि आनंद सर्वाना आयुष्यभर लाभो ह्याच दिवाळीच्या शुभेच्छा...

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...