काळीज बापाचं..



घरात मुलगी जन्माला आली का सगळ्यात जास्त आनंद बापाला होतो आणि तो बाप त्या आनंदात साऱ्या गावाला बर्फी वाटत "लक्ष्मी" जन्माला आल्याचं सांगत फिरतो. जन्माला आल्यापासून तिच्या लग्नापर्यंतच स्वप्न बाप मुलीच्या जन्माच्या दिवसापासून बघतो. मुलीला नेहमीच राजकन्येसारखं ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मुलीवर तसं बापाचं आईपेक्षा थोडं जास्तच प्रेम असत. लहानाचं मोठं केल्यानंतर पोटाचा तुकडा दुसऱ्याच्या स्वाधीन करताना त्याच काळीज तुटू लागत, म्हणून प्रत्येक बापाचा प्रयत्न असतो कि आपली मुलगी चांगल्या वातावरणात, चांगल्या कुटुंबात, चांगल्या मुलासोबत संसारात रमावी.

एकदा एका बस स्थानकावर रात्रीच्या वेळेस एक प्रेमीयुगल चिंतेत बसलेलं होत, त्यांच्या चेहऱ्यावर काळजीच सावट दिसत होत. त्यांच्या शेजारी एक सदपुरुष गावाला जाण्यासाठी शेवटच्या गाडीची वाट पाहत आपल्या विचारात गुंतून बसलेला होता. त्या सद्पुरुषाचं अचानक त्या प्रेमीयुगलांकडे लक्ष जात आणि त्याला न राहता त्यांच्याशी बोलावसं वाटलं. तो आपसूकच त्यांच्याशी संवाद साधायला सुरवात करतो "पोरांनो घरातून निघून आलात का रे? आला असाल तर आईबापाला सांगितलं नसेल ना? अरे माझी पण तुमच्यासारखी एकुलती एक मुलगी होती! माझ्या पोरीचं लग्न करण्यासाठी माझ्याकडे पैसा नव्हता, पण माझ्या लेकराचं चांगलं व्हावं म्हणून नोकरीवाला मुलगा बघितला, नोकरीवाला म्हंटला म्हणजे त्यांच्या अपेक्षा मोठ्या, त्याप्रमाणे त्याने मोठं तोंडही फाडल. सगळं ठीक होत म्हणून मी माझ्याकडच् सगळं गहाण ठेवलं, जीव सुद्धा गहाण ठेवला आणि पोरीचं लग्न ठरवलं. सगळी तयारी झाली, कपडेलत्ते झाले, पाहुणेरावळे आले. उद्या लग्न आणि माझी मुलगी आज घरातून निघून गेली, माझं काळीजच चिरलं गेलं रे बाळांनो.. तिला जायचं होत तर मला सांगितलं असत, मी काहीतरी बघितलं असत रे.. काय चुकलं होत रे माझं..?" आणि तो बाप न राहता ढसाढसा रडू लागला.. ते प्रेमीयुगल विचारात गोंधळून एकमेकांकडे पाहू लागले. तो बाप तसाच रडत रडत आपली गाडी आल्यामुळे तिथून उठून निघून गेला..

आई निर्विवाद सत्य आहे पण बाप तितकाच सत्याचा महामेरू आहे. मुलींनी विचार करावा तितकाच मुलानेही करावा, पण मुलीने थोडा जास्त करावा कारण मुलींसाठी बापानं काळजाचं पाणी थोडं जास्तच केलेलं असत. जन्माला आलेल्या मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं म्हणू तिच्या लहानपणापासून ते लग्नापर्यंत तो आपल्या जीवाचं रान करून मुलीचं स्वप्न पूर्ण करतो. प्रश्न पडतो मग प्रेमाचं काय? प्रेम हा प्रत्येकाचा वैयक्तिक विचारसरणीवर अवलंबून असणारा विषय आहे. पण मुलीने आयुष्याचा मोठा निर्णय घेण्याअगोदर बापाच्या काळजाचा विचार करायला हवा. गोष्ट करायला सोपी असते पण तिचे परिणाम बापालाच माहित असतात. मुलीच्या हातून अस काही घडल्यानंतर सुद्धा त्याची वाचा कुठे न करता उरलेलं आयुष्य त्या गोष्टीभोवती कुडत काढतो तो बापचं असतो.

माझी छकुली नेहमीच राजकन्येसारखी राहो आणि तिला भेटणारा राजकुमार तिला माझ्यापेक्षाही जास्त प्रेम देवो हीच इच्छा बापाच्या मनात असते आणि त्याच काळीज त्यासाठीच तळमळत असत.. शेवटी रक्ताचं नातं आणि मनाने जोडलेलं नातं ह्यात थोडातरी फरक तर असतोच ना! विचार तर व्हायलाच हवा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

पांडुरंग पांडुरंग..



भूतलावावर मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो सर्वदृष्ट्या संवेदनशील आहे. संवेदना ज्याला जाणता येतात तोच खरा मनुष्य.. भगवान श्रीकृष्णाने "गीता" सांगताना अजुर्नाला मनुष्य जीवनाची संवेदना समजावून सांगितली. गीता म्हणजेच मनुष्य जन्माचा सार. "गीता से क्या नाता है, गीता हमारी माता है" ह्या संदेशाचा प्रसार करून गीतेचा अर्थ प्रात्यक्षिकरित्या समजावून सांगणारे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते "पांडुरंग शास्त्री आठवले" यांचा आज जन्मदिवस. हा दिवस स्वाध्याय परिवाराकडून "मनुष्य गौरव दिवस" म्हणून साजरा केला जातो.

"माणूस अस्वच्छ किंवा रोगी राहू शकतो, माणूस अशिक्षित किंवा गरीब राहू शकतो, पण माणूस अस्पृश्य किंवा अपिवत्र राहू शकत नाही, कारण मानवी शरीर हे परमेश्वराचं मंदिर आहे". मनुष्याप्रती असे संवेदनशील आणि गौरवाचे विचार असणारे पांडुरंग शास्त्री आठवलेंचा जन्मदिवस म्हणजेच "मनुष्य गौरव दिवस". "पांडुरंग शास्त्री वैद्यनाथ आठवले" यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० साली रोहे ह्या कोकणातील गावात झाला. संस्कृत, न्याय, वेदांत, भारतीय साहित्य आणि इंग्रजी साहित्यावर त्यांचा विशेष अभ्यास होता.

मानव शांती, भावकृषी, भक्तीफेरी अश्या नवनवीन संकल्पना देऊन त्यांनी मनुष्यसेवेतून देश सेवा केली. त्यांच्या कार्याची सुरवात त्यांनी स्वतः पायी गावोगाव फिरून केली. लोकांना भावाबहिणी सारखं घडवलं. स्वाध्याय कार्य हे स्वखर्चातून, स्वप्रेरणेतून केलं जात. एक वेगळी शिस्त ह्या कार्यात दिसते. साधारणतः महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात ह्या कार्याचा विशेष प्रभाव आहे. ह्याच कार्याचा प्रसार करण्यासाठी मुंबईतील माधवबाग येथील श्रीमद्भगवद्गीता पाठशाळा आणि ठाणे येथील तत्वज्ञान विद्यापीठाची स्थापना केली.

मनुष्याचं माणूसपण जागृत करण्यासाठी आयुष्यभर कार्य करताना कुठल्याही चर्चेत न राहता आपलं कार्य निस्वार्थपणे पुढे नेताना आपल्या अनुयाना त्याच गोष्टीची शिकवण देणारे परमपूज्य पांडुरंग शास्त्रीना प्रेमाने "दादाजी" म्हणजेच मोठ्या भावाच्या नावाने संबोधलं गेलं. त्यांच्या ह्या कार्याची दखल घेत अनेक जागतिक आणि भारतीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं त्यात रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार आणि पद्मविभूषण सारख्या उल्लेखनीय पुरस्कारांचा सहभाग आहे. मनुष्याचं माणूसपण जपण्यासाठी स्वतःच आयुष्य निस्वार्थपणे घालवणाऱ्या महात्म्याला जन्मदिनी भावपूर्ण श्रद्धांजली..

डॉ. प्रशांत शिरोडे..

माझ्या स्वप्नातील भारत..



स्वप्न म्हंटल कि झोपेतून उठल्यावर एक छानस कुठल्यातरी दुनियेची सफर करून आल्यासारखं वाटत ना? कधी परीचा सहवास तर कधी चांदोमामाचा सहवास, कधी राजकन्या तर कधी जलपरी.. स्वप्न बाकी काहीतरी वेगळंच असत. प्रत्यक्षात घडत नसलं तरी ते काही क्षणासाठी खूप आनंद देऊन जात. पण माझं स्वप्न काही वेगळंच आहे. मी ते स्वप्न मनातून बघते आणि त्याची वाट उघड्या डोळ्यांनी बघते.. तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना नक्की कस असेल हे स्वप्न?

माझ्या मनातील स्वप्नाला कसं व्यक्त करू तेच समजत नाही. थोडं मन गोंधळून जात. "भारत माता कि जय" म्हणताना जो आत्मविश्वास भरून येतो ना तो आत्मविश्वास ह्या भारतमातेबद्दल मी बघितलेल्या स्वप्नाबद्दल येतच नाही?  हो, हे भारत भूमीच्या कल्याणासाठी मी बघितलेलं स्वप्न आहे.. भारत एकमेव देश आहे जिथल्या भूमीला माता म्हंटल जात आणि त्याच भूमीत स्त्रीला कुठेतरी कळत नकळत दिली जाणारी दुय्यम वागणूक माझ्या मनाला स्वप्नाच्या दुनियेकडे घेऊन जाते..

स्त्रीसाठी सुरक्षित, सुशीक्षीत भारत पाहण्यासाठी मला स्वप्न बघावं लागत हेच आमचं दुर्दैव. रस्त्यावर चालणाऱ्या आईबहिणीची छेड असो वा त्यांच्यावर सहजपणे होणारे बलात्कार असो.. हे निंदनीय कृत्य संपवण्याच माझं स्वप्न आहे.

आपल्याला आई हवी असते, आपल्याला बहीण हवी असते, आपल्याला बायको हवी असते मग आपल्याला मुलगीच का नको असते? प्रश्न स्वाभाविक आहे. स्त्रीभ्रूण हत्येला पुरुषप्रधान संस्कृती नाही तर अखंड समाजव्यवस्थाच जबाबदार आहे, मग त्यात स्त्री वर्गाचा सुद्धा तितकाच वाटा आहे. माझ्या वंशाचा दिवा हा मुलगी व्हावी हि प्रथम स्त्रियांची इच्छा व्हावी हे माझ्या स्वप्नातील भारताचं बघितलेलं स्वप्न आहे.

आताच झालेल्या दहीहंडीच्या उत्सवाच्या वेळेस एका लोकप्रतिनिधीने मुलीला लग्नासाठी पळवून नेण्याचं धाडसी वक्तव्य केलं. माझा प्रश्न आहे कि पळवून घेऊन जाणाऱ्या मुलीच्या आईवडिलांचा जन्मापासून तर आजपर्यंतच्या स्वप्नाचा विचार बोलण्याआधी केला होता का? अशी बेताल वक्तव्य आणि असह्य चर्चाना विराम माझ्या भारतात लागावा हे माझं स्वप्न आहे.

जिजाऊंचे संस्कार, राणी लक्ष्मीबाईंचे शौर्य आणि सावित्रीबाईंचे शिक्षण समस्त समाज बांधवांच्या मनात रुजाव आणि भारतभूमीसाठी स्त्री पुरुषानं एक दिलान काम करावं हे माझं स्वप्न आहे.

सभोवताली अनेक गोष्टी घडताना परस्रीला आई म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आणि भारत देश कुठे हरवलाय? हे विचार टिकून राहावे आणि स्त्रीचा सन्मान सगळ्या स्थरातून व्हावा हे माझं स्वप्न आहे.

कधी शांततेत विचार करा? नऊ महिने स्वतःच्या पोटात अगदी अलगदपणे आपल्याला वाढवणाऱ्या आईच्या वेदना काय असतील? एका जीवापासून दुसऱ्या जीवाला जन्म देताना तिचा नवा जन्म होतो, ह्या जन्माच्या स्त्री पर्वाचा विचार का होत नाही? लहानाचं मोठं करताना स्वतःची इच्छा बाजूला ठेवून आपल्यासाठी झटणारी मायमाऊली कधी स्वतःच्या इच्छेसाठी जगेल? प्रश्न स्वाभाविक आहेत पण उत्तर पण तितकेच विचारपूर्वक आहेत. हे प्रश्न समजून घेणारा समाज हा माझ्या स्वप्नातील भारत आहे..

चला तर मग स्री शक्तीला बळ देऊन माझ्याच नव्हें तर आपल्या सगळयांच्या स्वप्नातील भारताकडे आतापासूनच वाटचाल करूया आणी भारत मातेला अभिमान वाटेल असा भारत देश घडवूया..

जय हिंद.. जय महाराष्ट्र..

तुमचीच,
एक महाराष्ट्र कन्या..

डॉ. प्रशांत शिरोडे..

बहादूर पंतप्रधान ...


भारतभूमी स्वातंत्र्याच्या आनंद सागरात डुबलेली असताना, पंतप्रधान नेहरूंच्या १७ वर्षाच्या कार्यकाळानंतर स्वतंत्र भारताला दुसरे आणि कधीही चर्चेत नसलेले जे पंतप्रधान लाभले ते म्हणजे "लाल बहादूर शास्त्री". शास्त्रीजींचा जन्म ०२ ऑक्टोबर १९०४ रोजी झाला. भारताच्या  स्वातंत्र्यानंतर​ मंत्रिमंडळात गृहमंत्री, रेल्वे, वाहतूक व दळणवळण मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारून आपल्या कार्याची छबी उमटवणारे सर्व साधारण व्यक्तिमत्त्व म्हणजेच लालबहादूर शास्त्री.

भारतीय स्वतंत्र लढ्यात विशेष सहभाग असताना कधीही प्रसिद्धीस अग्रक्रम न देणारे स्वातंत्र्यसैनिक. स्वतंत्र पंजाबी सुभा (स्वतंत्र पंजाब राष्ट्र​), द्रविडस्थान (स्वतंत्र दक्षिण राष्ट्र), दक्षिणेतील राज्यातील हिंदीचा विरोध अशा अनेक आंदोलनांना अतिशय योग्य पद्धतीने हाताळणारे नेते म्हणून लालबहादूर शास्त्रीना ओळखलं जात. अतिशय साधी राहणीमान, प्रभावशाली नेतृत्व क्षमता असलेला वेगळा राजकारणी. "जय जवान, जय किसान" हि ऐतिहासिक घोषणा जनमानसात देऊन "मूर्ती लहान पण कीर्ती महान" ह्या संज्ञेला सार्थकी ठरवणारे लालबहादूर शास्त्री.

स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानबरोबरच्या दुसऱ्या युद्धात भारतीय सैन्याची धडक थेट कराची शहरापर्यंत धड्कावून तत्कालीन पाकिस्तानचा सर्वेसर्वा आयुब खानाचं वस्रहरण करणारे पंतप्रधान. देशाची गरिबीची परिस्थिती बघून स्वतः एक वेळेचं जेवण बंद करणारे खरे प्रधान सेवक. कुठल्याही प्रवासात देशहिताच्या निर्णयासाठी वाचन करणारे विचारी व्यक्तिमत्व. रशियातील बहुद्देशीय शांतता करारावर सही केल्यानंतर अवघ्या सात-आठ तासातच अचानक मृत्यूने रशियातच त्यांच्यावर घाव घातला. त्यांच्या ह्या मृत्यूचं कारण अजूनही अनुत्तरीतच आहे.

भारतमातेचा हा बहादूर पुत्र कधीही द्वेषाने लाल न होता शास्त्रशुद्ध पद्धतीने देशहितार्थ निर्णय घेणारा एकमेव द्वितीय नेता होता. महात्मा गांधींच्या जन्मदिनी जन्माला येणाऱ्या खऱ्या महात्म्याला इतिहासाने पाहिजेल तेवढा आदर न केल्याचं दुर्दैवच म्हणावं लागेल. आजच्या स्वयंघोषित प्रधान सेवकाने ह्या खऱ्या प्रधान सेवेकाचं आदर्श घेऊन भारतभूमीची सेवा करण जास्त महत्वाचं ठरेल . देशाने शास्त्रीजींना "भारतरत्न" हा गौरव देऊन ह्या पुरस्काराचं महत्व वाढवलं अस म्हंटल तर वावगं ठरणार नाही. लालबहादूर शास्त्रीजींना जयंती निम्मित भावपूर्ण श्रद्धांजली.

डॉ. प्रशांत शिरोडे.

स्वर भारतभूमीचा...



संगीताचं माणसाच्या आयुष्यात एक अभूतपूर्व महत्व आहे. संगीताला अर्थपूर्ण गाण्याबरोबर जर मधुर आवाजाची साथ मिळाली तर ते गाणं काळजाला भावून जात. तसंच रत्नांच असत, अनेक रत्नं असतात पण कोहिनूर सारखा रत्नं एकमेव द्वितीय असत. संगीतातल्या अनेक गाण्यांना अश्याच एकमेव द्वितीय रत्नाचा सहवास लाभला आणि ह्याच अभूतपूर्व स्वरांच्या जोरावर भारतभूमीला एक "भारत रत्नं" लाभलं ते म्हणजे गानकोकिळा "लता मंगेशकर".

लता दीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ साली "दीनानाथ मंगेशकर" ह्या संगीत सम्राटाच्या घरात झाला. भाऊ हृदयनाथ, बहिणी आशा, उषा आणि मीना ह्या घरातल्याच कलाकारांचं सहवास आयुष्यभरासाठी लाभला. वयाच्या पाचव्या वर्षी बालकलाकार म्हणून कला क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर वयाच्या नवव्या वर्षी गाण्याच्या क्षेत्रात प्रवेश केला. गेली सात दशके संगीत क्षेत्रातले अनेक यशाचे शिखर सर करताना मराठी, हिंदीसह भारतातल्या सर्व भाषेत तीस हजाराच्या वरती गाणी गाऊन विश्वस्थरावर अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या ह्या कलेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सुद्धा घेतली आहे.

संगीत क्षेत्रात कार्य करत असताना फिल्म फेअर, दादासाहेब फाळके, पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभुषणसह "भारतरत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आपल्या कारकीर्दीत १७ विविध पुरस्कारांनी २५ वेळा सन्मानित करण्याचा मान लतादीदींनी मिळाला. आतापर्यंत स्वरसम्राग्नी वर १५ पुस्तक लिहली गेली. आजच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची बहीण मीना लिखित अजून एक पुस्तक प्रकाशित होत आहे.

महाराष्ट्राचं भूषण असलेल्या भारताच्या स्वररत्नाला नव्वदीतल्या वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा. महाराष्ट्राला तुमच्या यशोगाथेचा सार्थ अभिमान आहे. भारताची हि स्वर यशोगाथा आयुष्यभर अमर राहो ह्याच सदीच्छा.

डॉ. प्रशांत शिरोडे.

वरदान औषधाचं..


रोजच्या जीवनशैलीत बदल होताना औषध काळाची गरज केव्हा झाली हे समजलं सुद्धा नाही. आजारांची शृंखला दिवसेंदिवस वाढतच आहे आणि त्यावर संशोधन होऊन नवीन औषधाचं निर्माण होतच आहे. औषध निर्माण होत असताना त्यावर खूप मोठं संशोधन होत असतं आणि त्यानंतरच ते कुठल्याही आजारावर वापरलं जात. औषध बनवण्याचं शास्र म्हणजेच "औषधनिर्माणशास्त्र" म्हणजेच आपल्या सर्वाना ज्ञात असलेलं "फार्मसी" आणि ह्या क्षेत्रात शिक्षण घेतलेले म्हणजेच "फार्मासिस्ट". आज जागतिक फार्मासिस्ट दिवस.

भारतभूमीला औषधांचं वरदान अगदी पूर्वीपासून आयुर्वेदातूनच लाभलं आहे. आयुर्वेदिक, होमीओपॅथिक आणि ऍलोपॅथी सारख्या विविध प्रकारच्या औषध निर्माण प्रक्रिया आजच्या युगात ज्ञात आहेत. रासायनिक म्हणजेच ऍलोपॅथी प्रक्रियेतून १८९० साली "इपिनेफ्रिन" हे रक्तदाबावरील औषध पहिल्यांदा निर्माण करण्यात आलं. भारतात सण १९०१ साली बंगाल केमिकल्स अँड फार्मासुटिकल वर्क्स हि कंपनी सर्वप्रथम चालू झाली. त्यापाठोपाठ १९०३ मध्ये अलेम्बिक, १९५० मध्ये हिंदुस्थान अँटिबायोटिक कंपनी सुरु झाली.

जागतिक अर्थव्यवस्थेचं कंबरडं मुडलेलं असताना भारतीय अर्थव्यवस्था फार्मसी क्षेत्राच्या जोरावर यशस्वीरीत्या उभी होती आणि आज पण उभी आहे. भारत देश स्वतःची औषधांची गरज भागवत असताना ८०% जागतिक पातळीवर औषध निर्यात करून जगाची गरज पूर्ण करणार जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. हि सर्व प्रगती भारतात असलेल्या फार्मासिच्या ज्ञानातून आणि कौशल्यातून झाली आहे. भारत १९३१ साली पदवी शिक्षण (बी. फार्मसी), १९४० साली पदव्यूत्तर शिक्षण (एम. फार्मसी), १९४३ साली पदविका शिक्षण (डी. फार्मसी) आणि अलीकडच्या काळात म्हणजे २००८ पासून सुरु झालेला फार्म. डी. अशा सर्व अभ्यासक्रमातून तयार झालेल्या "फार्मासिस्ट" मुळे आज जगाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. आज त्याच फार्मासिस्टच्या गौरवाचा दिवस.

औषधाचं लाभलेलं वरदान सेवेच्या माध्यमातून जनमाणसापर्यंत पोहचवण्याचं काम करणारा फार्मासिस्ट. उद्योगातून व्यवसायाकडे आणि व्यवसायातून जनसेवेकडे कार्यरत असणाऱ्या सर्व फार्मासिस्टला भारतमातेची सेवा करण्याचं कार्य उत्तरोत्तर घडो ह्याच जागतिक फार्मसिस्ट दिवसाच्या शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

आतुरता आगमनाची..



प्रत्येक सणाचं एक वेगळं महत्व असत.. सण म्हंटल तर त्यात उत्साह, आनंद आणि भाव आलाच. स्वातंत्रपूर्व काळात देश इंग्रजांच्या कूटनीतीतून जातीधर्माच्या भेदात अडकला होता. लोकांना एकत्रित आणून स्वातंत्र्याच्या लढ्याला बळ देणं हि काळाची गरज होती आणि हि गरज लोकमान्य टिळकांनी ओळखली. त्यांनी १८९३ साली "गणेशोत्सव" आणि १८९५ साली "शिवजयंती" हे सण साजरा करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून लोकांना राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण दिली.

गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता काही वेगळीच असते. सगळीकडे घरी देव पाहुणा म्हणून वास्तवास येण्याची चाहूल लागलेली असते. वातावरण बाप्पाच्या आगमनासाठी प्रफुल्लित हर्षमय आणि उत्साहित होत. सगळीकडे स्वागताची जणू धावपळ चालू असते. बाप्पाच्या आवडीची आसनव्यवस्था आणि खाद्यपदार्थांची व्यवस्था केलेली असते. सगळं सगळं जणू वेगळच असत.

गणेशोत्सव सर्वाना एकत्रित आणण्यासाठी आणि एकत्र येऊन भक्तिभावाने देवाची प्रार्थना करण्याच्या मुख्य उद्देशाने साजरा केला जातो. पण अलीकडच्या काळात ह्या सार्वजनिक उत्साहाला कुठं राजकीय तर कुठं व्यावसायिक गोष्टींचं आवरण लागलं आहे ते जणू सार्वजनिक उत्साहाच्या मुख्य उद्देशापासून दूर घेऊन जातोय. परमेश्वर ह्या संकल्पनांना दूर करून भावश्रद्धेनं हा सण मोठ्या प्रमाणात होऊ देवो हीच सदिच्छा.

राष्ट्रीय एकात्मतेच्या उद्देशाने सुरु झालेल्या गणेशोउत्सवातून माझ्या महाराष्ट्राचं, माझ्या हिंदुस्थानाच आणि विश्वाचं कल्याण होवो आणि त्यातून "हे विश्वची माझे घर" हि संकल्पना प्रत्यक्षात येवो ह्याच मनापासून शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

सण पोळ्याचा..



आपले सर्व सण हे आपल्या आनंदासाठी असतात  आणि काही सण हे धार्मिक कारणामुळे साजरे केले जातात. पोळा हा एक वेगळा सण ज्याचं महत्व पण वेगळच आहे.. शहरी भागात हा सण क्वचितच साजरा केला जातो आणि ग्रामीण भागातला हा अतिशय महत्वाचा सण.

शेतकरी वर्षभर आपलं काबाडकष्ट करताना त्याला मोलाची साथ बैल हा प्राणी देतो. शेतातली नांगरणी, पेरणीसारखी अनेक काम ह्या प्राण्याच्या मदतीने केले जातात. शेतकऱ्यांसाठी वर्षभर कष्ट करणाऱ्या ह्याच बैलांसाठी पोळा हा सण साजरा केला जातो. वर्षभर केलेल्या मदतीचं ऋण व्यक्त करण्यासाठी शेतकरी राजा हा सण मोठ्या हौशेने साजरा करतो.

बैलांना सकाळी छान अंघोळ घातली जाते, त्यानंतर त्याला व्यवस्थित चारा आणि पाणी दिल जात. त्यानंतर बैलांना छानसे नवीन दोरीचे साज म्हणजेच मोरकी, शेल, नाथ आणि माथोडीने सजवलं जात. बैलांच्या शिंगाना कलर लावला जातो. त्यांनतर त्याच्या गळ्यात आणि पायात घुंगुरुच्या वस्तू लावल्या जातात. त्यांच्या अंगावर कलरचा साज किंवा झालर चढवली जाते. बैल जोडी पूर्णपणे सजल्यानंतर तिला हनुमानाच्या मंदिराला प्रदक्षिणा मारण्यासाठी नेलं जात नंतर घरी त्याची विधिवत पूजा करून त्यांना पुरणपोळी चा नैवेद्द दिला जातो आणि धान्य खाऊ घातलं जात.

एका प्राण्याच्या मदतीबद्दल त्याच्या कष्टांची कृतज्ञता व्यक्त करण्याचं मोठ मन शेतकरी राजा  खास सण साजरा करतो हि एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. ज्यांना हा सण कधी बघितला नसेल त्यांनी नक्कीच कधी ना कधी बघावं.

डॉ. प्रशांत शिरोडे.

गोविंदा आला रे आला..


गोपाळकाला, दहीहंडी जवळ आली का "गोविंदा आला रे आला" हे गाणं सगळीकडे घुमघुमूं लागत. सगळीकडे अगदी सकाळपासून दहीहंडीच्या अंतिम सरावाची लगबग आणि नवीन कीर्तिमान उभारण्याची चाहूल लागलेली असते. जसा जसा दिवस मावळतीकडे जातो तसा तसा उत्साह गगनाला भिडत जातो. रात्री श्रीकृष्ण जन्माचा आनंद आणि दहीहंडीच्या दिवशी नाचून गाऊन दहीहंडी फोडण्याचा उत्सव साजरा केला जातो..

श्रीकृष्ण जन्माचा आनंद व्हायलाच हवा कारण जर भगवान कृष्ण जन्माला आले नसते तर "भगवत गीता" नावाचं अमृत ह्या जगाला भेटलं नसत.
यशोदेच्या रूपातून आईच प्रतीक भेटलं नसत.
सुदामाच्या रूपातून मैत्रीचं प्रतीक भेटलं नसत. राधेच्या रूपातून प्रेमाचं प्रतीक भेटलं नसत आणि रुख्मिणीच्या रूपातून संसाराचं प्रतीक भेटलं नसत.

दहीहंडी म्हणजे मराठमोळ्या अस्सल मराठी माणसाचं प्रतीक. महाराष्ट्राच्या अनेक भागातून साजरा होणारा हा सण मुख्यतः मुंबई आणि उपनगरातून भव्य प्रमाणातून साजरा केला जातो. साधारणतः एक महिन्यापासून रोज संद्याकाळी कामावरून आल्यावर तरुण वृद्धांपासून सर्व मंडळी सरावात सहभागी होतात. दहीहंडी हा सण सांघिक खेळाचं, मराठी संस्कृतीचं आणि ऐकते च प्रतीक आहे आणि हा सण मोठ्या आनंदाने साजरा व्हावा हीच सदीच्छा.

अनेक विश्लेषणानंतर न्यायालयीन चौकटीतून बाहेर येऊन दहीहंडी हा सण साजरा होतोय. अलीकडच्या काळात ह्या सणाला व्यावसायिक आणि राजकीय पद्धतीची किनार लागली आहे, कुठे थरांची तर कुठे पैश्यांची स्पर्धा लागली आहे. ह्या स्पर्धेत अनेकांना शारीरिक दुखापतींना समोर जावं लागत आणि त्यातून कौटुंबिक स्वास्थ बिघडत. स्पर्धा करावी पण घरी असलेल्या आपल्या हितचिंतकांनी काळजी करून ती करावी.

असो, दहीहंडी हा मराठमोळा सण उत्सहात आणि आनंदात साजरा होवो. ह्या सणांतून ऐकते चा संदेश सर्व जातीधर्मानपर्यंत जावो. सर्व गोविंदांच आरोग्य सुरक्षित आणि आनंदी राहो ह्याच शुभेच्छा..

डॉ. प्रशांत शिरोडे.

अटल अंत.



मौत कि उम्र क्या दो पल भी नही, जिंदगी सिलसिला, आज कल की नही,
मैं जी भर जिया, मैं मन से मरू, लौटकर आऊंगा, कूच से क्यो डरु...

ह्या ओळी ज्यांच्या तोंडून ऐकल्या जायच्या तो आवाज आता पुन्हा ऐकू येणार नाही. "अटल बिहारी वाजपेयी" भारताला आजतागायत लाभलेले सर्वश्रेष्ठ प्रंतप्रधान. लोकसभेत असो किंवा कुठल्याही सभेत असो अटलजींनी भाषणाची सुरवात केली की, ते बोलतच राहावे अस वाटायचं. त्यांचा भाषणातील हावभाव, सखोल अभ्यास, अचूक मुद्दा आणि बेधडक वक्तृत्व हि त्यांची वैशिष्ट्ये होती. हिंदी भाषा ऐकायची तर ती अटलजींच्या तोंडूनच. एक उत्कृष्ट पत्रकार, भावपूर्ण कवी आणि निस्वार्थ राजकारणी..

देशाचे तीन वेळा प्रतंप्रधान राहिलेले अटलजींनी १३ दिवसांचं त्यांनतर १३ महिन्यांचं आणि नंतर ५ वर्षाचं मित्रपक्षांना बरोबर घेऊन पाहिलं काँग्रेस विरहित सरकार यशस्वीरीत्या चालवून दाखवलं. आपल्या प्रंतप्रधान पदाच्या पहिल्या भाषणात पूर्व प्रतंप्रधान इंदिरा गांधी याना "लोह पुरुष" संबोधून त्यांच्या कार्याला जणू मानवंदनाच दिली. कुठल्याही प्रांतात भाषण करताना तिथल्या राज्यभाषेत भाषांची सुरवात करून लोकांची मन जिकंत असत. महाराष्ट्राचं त्यांना भलं कौतुक होत, ते नेहमी म्हणायचे महाराष्ट्रात एकमेकांना भेटलं का "राम राम " म्हणतात आणि त्यात जात धर्म काही पाहिलं जात नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि वि. दा. सावरकर ह्या विभूतींबद्दल त्यांना विशेष प्रेम होत. स्वर्गीय बाळासाहेबांच्या सूचनेने दिल्लीत लोकसभेत ह्या विभूतींचे भव्य शिल्प आणि तैलचित्र उभारण्यात आलं.

वाजपेयी जी पत्रकार असताना त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींबरोबर काश्मीर दौऱ्यावर असताना जे काही बघितलं ते बघून त्यांनी राजकारणात येण्याचं  ठरवलं. स्वातंत्र्यापासून काँग्रेसला एक सच्चा विरोधक भेटला. खूप प्रयत्नानंतर जनता दलातून अवघे दोन खासदार निवडून आले असताना काँग्रेसकडून त्यांना हास्यास्पद वागणूक देण्यात आली तेव्हा लोकसभेत उत्तर देताना अटलजी म्हणाले आम्ही एक दिवस बहुमताने तुमच्या बाकांवर बसू आणि तुम्ही तेव्हा ह्या बाकांवर असाल. ह्यातून त्यांचा उदंड आत्मविश्वास आणि उत्तम सकारात्मक नेतृत्व दिसत होत. आजच भाजप हे अटलजींच्या कर्तृत्वाचं फळ आहे.

अटलजी प्रतंप्रधान असताना पोखरण येथे अणुचाचणी करून देशाच्या प्रगतीत मानाचा तुरा लावला होता. कारगिल सारख्या विश्वासघातकी युद्धात सैन्याला तात्काळ पूर्ण अधिकार देऊन युद्धासाठी मजबूत पाठबळ दिल. अटलजी "भारतरत्न" ह्या पुरस्कारासाठी तुम्ही योग्य होतात, म्हणून तुम्ही दुसरे भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम सारख्या महान विचारवंताला हिंदुस्थानाचे राष्ट्रपती म्हणून तुम्ही पुढाकार घेऊन सन्मानाने विराजमान केलत.

अटलजी आज तुम्ही आमच्यात नाही पण बाळासाहेबांसारखे अद्वितीय राजकारणी भारतभूमीला सोडून गेले हि हिंदुस्थानची खूप मोठी हानी झाली जी कधीच भरून निघणार नाही. तुमच्याच शब्दात सांगायचं तर "मौत कि उम्र क्या दो पल भी नही, जिंदगी सिलसिला, आज कल की नही". तुमच्या देहाचा अंत झाला पण तुमच्या व्यक्तिमत्वाचा अंत अटल आहे...

भावपूर्ण श्रद्धान्जली.

डॉ. प्रशांत शिरोडे.

पत्र भारतमातेला...

प्रिय भारत माता,

आज तुझ्याशी खूप बोलावसं वाटतंय. सभोतालच वातावरण बघून मला तुझ्याशी बोलून मन मोकळं करावस वाटतंय. तू थोडं माझ्या मनातील भावनांना समजून घे. नेहमी तुज्या लेकरांना पदरात मायेनी कुरवाळून घेते तशी मला हि कुरवाळून घे.

"जन गण मन अधिनायक जय हे" नुसती राष्ट्रगीताची धून कानावर आली तरी छाती अभिमानाने भरून येते. "रवींद्रनाथ टागोरांनी" तुज्या वैशिष्ट्यांच वर्णन अगदी अचूक शब्दात केलय. अगदी हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळ्या प्रांतांची, विविध वैशिष्ट्यांची रचना ह्या अभिमान गीतात आहे. भाषावर प्रांतरचना, प्रांतवार वेशभूषा, खाद्यपदार्थात विभिन्नता, वातावरणातील रचनात्मकता, अश्या अनेक विविधतेतून तुजी एकतेची शिकवण सर्व गोष्टींना एकसंघ ठेवते.
 
स्वातंत्र्याच्या गौरवदिनी ७२ वर्षांपूर्वीचा इतिहास आठवला तर खूप असह्य झाल्यासारखं होत. नुसतं इंग्रजांनीच नाही तर अनेक परकीय शक्तींनी तुला फार वर्षांपासून घेरलं होत. जगाच्या पाठीवर तू एकमेव आहेस जिथे मातृभूमीला आई समान मानलं जात आणि अभिमानानं म्हंटल जात "भारत माता कि जय". आई बद्दल असलेलं प्रेम, भावना आणि आत्मीयता हि दुसऱ्या कुठल्याच नात्यात नसते. जस आईच आणि तिच्या बाळाचं नातं हे अवर्णनीय असत, तस तुज आणि सर्व भारतीयांचं नातं आहे.

परिकीयांचं आक्रमण, पारतंत्र्याची दाहकता सोसलेली असताना स्वातंत्र्यानंतर तुजी शांततेची आणि सलोख्याची अविरत इच्छा पाहिजेल तशी पूर्ण होताना दिसत नाहीये. तुज्या लेकरांकडून कळत नकळत काही असमर्थनीय गोष्टी घडताना दिसतायेत त्यात प्रामुख्याने स्त्रीयांवर होणारे अत्याचार, धार्मिक तेढ, जातीय असमतोल, प्रांतीय वाद, राजकीय स्वार्थ आणि ह्यामुळे तुज्या ऐक्याच्या प्रतिमेला तडा जाताना दिसतोय. कुठं तरी तुजी शेकडो वर्षांची संस्कृती दिवसेंदिवस संस्कारांच्या अभावामुळे लोप पावताना दिसत आहे. लोकसंख्या, अस्वच्छता, असभ्यता तुज्यातल्या गौरवला काळिमा फासत आहे.

प्रगतीच्या पथावर विकसनशील राष्ट्राकडून विकसित राष्ट्राकडे जाण्यासाठी तुज्या लेकरांना सामंजस्याची बुद्दी दे. देश, देव आणि धर्मासाठी बळ दे. नैसर्गिक आपत्तीतून सर्वाना सावरण्याचा सामर्थ्य दे. सत्कार्य करण्याची आणि तुजी सेवा करण्याची बौद्धिक प्रगल्बधता दे.

तुज्या अस्मितेचा तिरंगा "पिंगाली व्यंकय्या" यांनी खूप मनापासून बनवला पण आज त्याचा निळा, माझा भगवा आणि तुजा हिरवा ह्यातच आम्ही व्यस्त असताना प्रश्न पडतो कि तिरंगा कोणाचा सीमेवर फडकणारा तिरंगा हा तिथल्या वाऱ्यामुळे नाहीतर सैनिकांच्या श्वासामुळे फडकतोय. जर सैनिकांचे श्वास ह्या तिरंग्याला मोठ्या अभिमानाने उंच ठेवतात मग हा तिरंगा त्यांचाच का?

भारत माते तुज्या सेवेचं आणि तुजी इच्छा पूर्ण करण्याचं मातीतून आलेलं संस्कारांचं कर्म हातून घडून तुज्या यशोगाथेला हातभार लावू दे हीच मनोभावे इच्छा..

तुझाच..
एक भारतीय..

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...