माझा महाराष्ट्र ...



हि मायभूमी,हि जन्मभूमी, हि कर्मभूमी हि आमुची..
महावंदनीय अति प्राणप्रिय हि मायमराठी आमची..

शिवरायांच्या पावन स्पर्शाने सौभागयित झालेल्या महाराष्ट्र ह्या भूमीत अनेक अजरामर व्यक्ती आणि गोष्टी घडल्या. हिंदुस्थानच्या पाठीवर महाराष्ट्र हे नावातच महा म्हणजे मोठं असलेलं राष्ट्र आहे.

देशाला परकीयांच संकट आलं, मुगलांचं संकट आलं, इंग्रजांचं संकट आलं. जेव्हा देशावर संकट आली तेव्हा सर्वात पहिले उभा राहिला तो माझा महाराष्ट्र.. जेव्हा जेव्हा हिमालयावर संकट आली तेव्हा तेव्हा हा सह्याद्री मोकळ्या मनाने आणि निधड्या छातीने धावून गेला. पराक्रमाची आणि यशोगाथेची, शौर्याची आणि विक्रमांची, ज्ञानाची आणि संस्काराची हि महान महाराष्ट्र भूमी. हीच आमची मायभूमी जिणे मराठी भाषेचा महान  वारसा दिला, हीच आमची जन्मभूमी जिणे जन्मताच शिवरायांचा इतिहास दिला, हीच आमची कर्मभूमी जिणे स्वाभीमानाचा रस्ता दाखवला.. महाराष्ट्रभूमी हि वंदनीय, प्राणप्रिय आणि प्रेरणादायी आहे..

शिवरायांनी मुघलांच्या आक्रमणातून हिंदुस्थानाला
मुक्त केलं, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी देशाला स्त्री शिक्षण दिल, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा महान स्वातंत्रप्रेमी दिला, बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून राज्यघटना दिली. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, जयंत नारळीकर, बाबा आमटे ह्या सारखी अनेक रत्न दिलीत. ह्या राज्याचा जणू डीएनए आहेच कि काहीतरी अन्यनसाधारण व्यक्तिमत्व आजपर्यंत दिलीत.

माझा महाराष्ट्रात आजही प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे ते संतांच्या संस्कार, शिवरायांचे प्रेरणास्थान आणि परमेश्वराची कृपा. माझा महाराष्ट्र नेहमीच सुजलाम सुफलाम राहो हीच सदीच्छा...

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा...

डॉ. प्रशांत शिरोडे.

'मत'दान..





लोकशाहीच्या १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाचा आजचा दिवस. मुंबईसह महाराष्ट्रातील  अनेक ठिकाणी होणाऱ्या निर्णायक लढतीचा आजचा दिवस. सत्तेचं निर्णायक मत उत्तरप्रदेशानंतर देणार राज्य म्हणजे महाराष्ट्र. लोकसभेच्या निर्णयाला आणि भारतीय व्यवस्थापानेला बळकट करणार राज्य म्हणजे महाराष्ट्र.

शेवटच्या टप्यात मतदानाला जाताना लोकशाही बळकट आणि टिकून राहण्यासाठी ह्यावेळेचं मतदान. विकासाच्या खऱ्या स्वप्नांसाठी आणि त्यांना प्रत्यक्षात बघण्यासाठी ह्यावेळेचं मतदान. जातीच्या राजकारणाला छेदून राष्ट्रीय ऐक्यासाठी मतदान. लोकशाहीतील लोकहितासाठी लोककल्याणासाठी ह्यावेळेचं मतदान. राजीय नाही तर राष्ट्रीय विकासासाठी मतदान.

सत्तेच्या चाव्या सांभाळताना जनतेला गृहीत न धरणाऱ्या सत्ताधीशांना त्यांच्या चुकांची जाण करून देणारा हा महोत्सव. आंतरराष्ट्रीय स्थराबरोबर राष्ट्रीय स्थर तितकाच महत्वाचा असताना देशाला बळकट करण्यासाठी लोकशाहीचा हा महोत्सव. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत एकसंघ राष्ट्रासाठी आणि समांतर विकासासाठी हा महोत्सव. दाखवलेली स्वप्न आणि त्याची केलीली पूर्तता ह्याच मूल्यमापन करणारा महोत्सव..

महाराष्ट्राने नेहमीच निर्णायक पाऊलांची वाट दाखवली आहे. अन्यायाला वाचा, विकासाला साथ, सर्वोत्तम योगदान अश्या अनेक माध्यमातून देशाला बळकट केलंय. चला देशाला एका योग्य क्षितिजावर घेऊन जाण्यासाठी मतदान करू या.. महाराष्ट्र भूमीची परंपरा टिकवूया.

डॉ. प्रशांत शिरोडे.

'राज'कारण...



लोकसभेच्या तिसऱ्या टप्याच्या मतदान करायला जाताना भारतीय राजकारणाच्या पाऊलखुणांना जरा डोकावून बघत असताना, राजकीय क्षितीजाच्या पलीकडे देश कसा आहे हे बघणं तितकंच महत्वाचं आहे. काँग्रेसची ५० वर्ष, भाजपाची १० वर्ष हा मुख्य केंद्रीय सत्येचा कालखंड.

२०१९ लोकसभा मतदान म्हणजे देशाच्या एका निर्णायक टप्प्यावरच मतदान. काँग्रेसने ५० वर्षाची सत्ता भोगताना देशाचा विकास करत असताना आपलं राजकीय अस्थित्व लोकांना गृहीत धरून चालूच ठेवलं. विकासाचा दर बघता भ्रष्टाचाराचा दरही तितकाच वाढल्यामुळे, विकास पूर्णपणे होण्यासाठी सत्तापरिवर्तन झालं. एक कुटुंबाभोवती सत्तेचं केंद्रीकरण असल्यामुळे राजकीय दृष्ट्या दिल्लीतून निर्णय होणं राज्यिय राजकारणासाठी तितकस ठीक नव्हतं. पारतंत्र्यानंतर देश उभारण्याची जबाबदारी पेलत असताना देशाच्या सुरक्षितेला पाहिजेल तेवढ लक्ष देता आलेलं दिसत नाही. देशद्रोह, ३७० ह्या गोष्टींवरच भाष्य हे संघीय राजकारणाच्या दृष्टीने घातक आहे. जातीय राजकारण अप्रत्यक्षपणे करण्याचं काम ह्या काळात नक्कीच झाल, पण देश एकसंघ ठेवण्यात तितकच यशस्वी राजकारण काँग्रेसने राजकीय पटलावर केलं.

भ्रष्टाचाराला कंटाळून देशाच्या खुंटलेल्या विकासाला चालना देण्यासाठी २०१४ साली विकासाच्या स्वप्नांसाठी सत्तापरिवर्तन झालं ते भाजपच्या माध्यमातून. स्वप्नाच्या पूर्ततेसाठी कासावीस झालेल्या देशाला स्वप्नांची मेजवानीच दाखवण्यात आली आणि बोलता बोलता ५ वर्ष झाली पण स्वप्न स्वप्नच राहिली. विकासाच्या जोरावर सत्तेच्या खुर्चीला चिकटलेल्या भाजपनेही जनतेला गृहीतच धरलं. ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करताना आपण आणलेल्या एकही योजनेचं स्पष्टीकरण न देणार सरकार भावनिक आव्हान करून देशाला पुन्हा त्याच वाटेवर नेताना दिसतंय. गेली ३० वर्ष धर्माच्या राजकारणावर राममंदिर हे आश्वासन पुन्हा एकदा आपल्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध करताना देशाला त्याच आशेवर पुन्हा नेताना दिसत आहे. विकासाची पायवाट विसरून जातीच्या राजकारणातून देशाची दिशाभूल करण्याचा अनोखा प्रयत्न करणं तितकंच लज्जास्पद आहे. लोकशाहीच्या मूलभूत स्तंभांच विकेंद्रीकरण करताना देशाला पुन्हा एकदा गृहीत धरल्याचं दिसतंय..

राजकारणाचा एक नवा अध्याय समोर आणताना देशाची गरज ओळखून गेल्या लोकसभेचे स्वप्नाचं खरं चित्र राजकीय निष्टेतून महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या माध्यमातून बघायला भेटलं. राजकीय नेतृत्व देशाला गृहीत कस धरत ते प्रकर्षाने राजकीय पटलावर यशस्वीपणे उमटवल.जनतेला दिलेली आश्वासन, स्वप्नातील विकास हा सार्वजनिक माध्यमातून पुढे कसा येतो ह्याच उत्तम 'राज'कारण करताना सत्ताधाऱ्यांची झोप मात्र नक्कीच उडवली.

राजकीय पट्टालावरचे डावपेच सामान्यांनी ओळखून, २०१९ च्या लोकसभेला आपलं मत देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी, खऱ्या विकासासाठी आणि सर्व राज्यांच्या विकासासाठी टाकावं..

डॉ. प्रशांत शिरोडे.

राजपर्व..


लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्प्याच्या मतदानाचा दिवस उजाडताना देशासह महाराष्ट्र प्रचाराने आणि अनेक सभांनी नवनवीन शैलीत रोमांचक होवून गेला. एक नवीन राजकारण महाराष्ट्र बघताना तरुण शिक्षित मतदारांना चालूघडामोडी आणि देशाची आगामी होणारी वाटचाल खऱ्या आत्मीयतेने पटवून देण्याचा एक प्रयत्न करण्यात येतोय. जे कोणाला जमलं नाही, जे कोणाला जमत नाही, जे कोणाला जमणारही नाही, असं एक नवीन राजकारणाचं पर्व जनतेसमोर आणणारा विचारी आणि अभ्यासू नेता म्हणजे "राज ठाकरे" आणि त्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण सभांच्या माध्यमातून एक राजकारणातील नवीन पर्व सुरु केलं ते म्हणजे "राजपर्व".

कदाचित माझ्या ह्या स्तंभाला राज ठाकरे समर्थक म्हणून ठरवलं जाईल पण जे मांडतोय ते अराजकीय विचाराने मांडतोय. २०१४ च्या निवडणुकात ६० वर्षाच्या काँग्रेसच्या सत्तेला कंटाळून एक नवीन सत्ताकेंद्र देशाने उभं केलं आणि त्यांनी दाखवलेल्या स्वप्नांना सत्तेच्या माध्यमातून बळ दिल. स्वप्न स्वप्नचं राहिली, नोटबंदी, जीएसटी, स्वच्छ भारत, स्टार्ट अप इंडिया, मेड इन इंडिया, स्मार्ट सिटी, आधार अश्या अनेक स्वप्नाचा खेळ मांडल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापर्यंत सत्ताधारी पक्षाकडून एकही शब्द आपल्या प्रचारातून न निघता निर्लजपणे देशाच्या जवानांच्या जोरावर देशाला गृहीत धरून मत मागितलं जाताना देशाला अंधारात लोटलं जातंय. मी विकास केला ह्या गोष्टीला जनतेसमोर आणायला हिंमत लागते आणि त्याच प्रेसेंटेशन म्हणजेच सादरीकरण देशात पहिल्यांदा गेल्या विधानसभा निवडणुकात मांडणारा पहिला नेता म्हणजे राज ठाकरे.. आजपर्यंतच्या इतिहासात विकासावर इतकं ठामपणे मत मांडणारा नेता भारतीय राजकारणाला लाभला नाही.

देशाचे प्रंतप्रधान, हेकेखोर शाही विकासाच्या जोरावर मत मागताना दिसत नाहीत. देशाच्या सर्वोच्च स्थानी बसल्यावर, जनतेला दाखवलेल्या स्वप्नापैकी एकही स्वप्न पूर्ण न झाल्याने जवानांच्या प्रतिमेला पुढे ठेवून देशाची भूल करतायेत, हेच राज ठाकरे भारतीय राजकारणाला नव्या वळणावर नेताना ह्याच नेत्याच्या आधीच्या आणि आताच्या व्हिडिओतून जनतेसमोर सादर करत आहेत. ह्या नवीन राजपर्वातून भारतीय राजकारणात जनतेला खोट बोलून गृहीत धरण्याचा प्रयत्न पुढील काळात होणार नाही हेच ह्यातून साध्य होईल. "ये तो लावरे व्हिडीओ" असं ऐकल्यावर सत्ताधाऱ्यात धडकी भरली जातेय म्हणून खडसे सोमय्याच्या झालेल्या स्थितीत शिक्षणाचा विनोद केलेलं मंत्री उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. मराठी असून स्वाभिमान नसणारे खऱ्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी केविलवाणे स्वतःची समजूत काढण्यासाठी, एक उमेदवार नाही दिला पण सभा घेत आहेत अश्या नैराश्याच्या माध्यमातून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतायेत.

आपल्या सभेची उत्कृष्ट मांडणी, रक्तात असलेलं संभाषण कौशल्य, सविस्तर अभ्यास, पहिल्या खुर्ची पासून तर शेवटच्या माणसापर्यंत शब्दन शब्द पोहचवण्याची पद्धत, एकही उमेदवार उभा न करता जनतेत जावून विरोधकांपेक्षा मोठ अस्थित्व निर्माण करून देशाला नवीन राजकीय पर्व प्रस्थापित करताना एक उत्कृष्ट प्रयत्न म्हणजे राजपर्व.... देशाला ह्या विचारांच सोनं मिळेल नाही मिळेल, पण शिवरायांच्या महाराष्ट्रभूमीला आगामी विधानसभेत स्थान भेटो हीच शुभेच्छा ...

डॉ. प्रशांत शिरोडे.

नांदी नवराजकारणाची ...



लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्प्याच्या तोफा थंडावत असताना २०१९ निवडणूक एका वेगळ्या टप्प्यावर येवून ठेपली आहे. प्रचाराच्या विविध माध्यमातून, शैलीतून आपली बाजू जनमाणसांना पटवून देण्याचं काम नेहमीसारखं केलं जातंय.. कुणी भक्तीत दंग तर कुणी समजावण्यात दंग..

देशाने ६० वर्षाचा काळ काँग्रेस बरोबर अनुभवल्यानंतर अटलजींनंतर भाजपचा प्रतंप्रधान विकासाच्या आणि देशहिताच्या मुद्यांवर निवडून दिला. बोलता बोलता पाच वर्ष संपलेत पण बोलल्या गेलेल्या शब्दांची जणू बाजूच पलटली. भाजपकडून प्रचारात विकास काम आणि काँग्रेसविरहित सरकारची भूमिका मांडणं अपेक्षित असताना ३० वर्षांपूर्वीच्या मुद्यांना आणि गांधी घराण्याच्या टीकेची साद घ्यावी लागते हे बदलेल्या राजकारणाला जणू पुन्हा त्याच जागेवर आणून ठेवल्याचं दिसतंय. दुसरीकडे काँग्रेसकडे असलेल्या दीर्घ अनुभवाचा पुन्हा एकदा काश्मीर सारख्या मुख्य मुद्यात असलेला विचार जणू सामान्यांना विकासाच्या मुख्य वाटेपासून दूर नेताना दिसतोय. एकाने फेकावं आणि दुसऱ्याने सोडावं जणू लोकशाहीचा तमाशाच मांडलाय.

गेल्या आठवड्यात गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मुद्देसूद भाषण, त्याची खरी मांडणी आणि दोन वेगळ्या परिस्थितीची चित्रफितीद्वारे दाखवलेली संकल्पना जणू नवराजकारणाची नांदीच होती. सामन्यांची होणारी फसवणूक आधीपण आणि आजपण तशीच आहे हे सत्यस्थितीवर पटवून देण्यात त्यांनी योग्य पद्धतीने जनतेला भाषणातून सांगितलं. हे सत्य कदाचित भरपूर कार्यकर्त्यांच्या पचनी पडणार नाही हे मात्र निर्विवाद सत्य आहे..

नव्या राजकारणाच्या नांदीवर लोकशाही कशी बळकट होईल, विकास खरंच कसा होईल, देश एकसंघ कसा राहील ह्या गोष्टींना ध्यानात घेणं महत्वाचं आहे.

फेकणाऱ्याने शब्द फेकत जावे,
सांगणाऱ्याने शब्द सांगत जावे,
सामान्यांनी शब्दामध्ये रोजच मरत जावे,
लोकशाहीचे हाल शब्दातूनच होत जावे..

नवराजकारणाची नांदी हि विकासासाठी, सत्यासाठी, देशहितासाठी आणि लोकशाहीसाठी महत्वाची आहे. फेकणारे, सांगणारे त्यांचं काम करतील, नमो आणि रागा ह्या मुर्खांच्या बाजारात न पडता विकास आणि नैतिकतेच्या जोरावर स्थानिक व्यक्ती पाहूनच मतदान करावं. आणि हे नसेल तर नोटा आहेच.. चला नवराजकारणाची नांदी ओळखूया आणि लोकशाहीला बळकट करूया...

डॉ. प्रशांत शिरोडे..

मुख्यमंत्री....


प्रसारमाध्यमांवर एक बातमी बघितली गोव्याचे  मुख्यमंत्री मनोहर परिकर यांच दुःखद निधन झालं. ऐकून वाईट वाटलं, राजकारणातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व भारतमातेनं हरपलं. अतिशय शांत, साधी राहणीमान आणि उच्च विचार असलेला माणूस. कोकणी भाषेबरोबर मराठी
भाषेवरही तितकंच प्रेम करणारा व्यक्ती.

स्वच्छ प्रतिमा असलेल्या परीकरांनी गोव्याचं मुख्यमंत्रीपद तीन वेळा सांभाळलं आणि देशाचं संरक्षणमंत्रीपद हि सांभाळलं. आयआयटी मुंबई इथून आपलं शिक्षण घेवून विद्याविभूषित असलेला हा राजकारणी साधा ड्रेस आणि चप्पल घालून वावरायचा. गोव्याच्या विकासात मुख्य भूमिका बजावताना आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल प्रत्येक वर्षी घडवून आणण्याचं श्रेय त्यांना जात. गोव्याच्या विकासाला एका वेगळ्या उंचीवर
नेऊन आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ विकसित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

उच्चशिक्षित आणि मुख्यमंत्रीसारख्या पदावर असताना स्कुटरवर कुठल्याही सुरक्षेशिवाय बिनधास्तपणे लोकांमध्ये मिसळणारा नेता. कुठल्याही शासकीय व्यवस्थेला केव्हाही लोककल्याणासाठी धावून जाणारा नेता. राजकीय इच्छाशक्तीला एका आगळ्यावेगळ्या मार्गावर नेवून आपल्या राज्याचा विकास करणारा महान राजकारणी. देशाचं संरक्षणमंत्रीपद सांभाळताना सर्जिकल स्ट्राईक सारखा मोठा निर्णय प्रत्यक्षात  घडवून आणणारा कर्तबगार मंत्री.

मुख्यमंत्री ह्या पदाला आदर्शवत व्यक्तिमत्व असणारे मनोहर परिकर वयाच्या ६३ व्या वर्षी भारतभूमीला सोडून गेले. नावात मनोहर असलेलं व्यक्तिमत्व राजकीय मनाला हरवून गेलं. देशसेवेचे व्रत घेणाऱ्या ह्या दिलदार नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.

डॉ. प्रशांत शिरोडे.

अभिनंदन ...


मिराज, एफ-१६, मिग-२१ हे शब्द दोन दिवसापासून सारखे कानावर पडतायेत. त्याच कारण पण तसंच, नुकतंच भारतीय वायू दलाने केलेलं "एअरस्ट्राईक". एअरस्ट्राईक म्हणजे  परकीय विघातक भूमीवर वायू दलाने मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी केलेला हल्ला. भारतीय वायू दलाने पाकिस्तानी जैश ए मोहंमद ह्या अतिरेकी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रावर पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन केलेला हल्ला.

भारताच्या ह्या नैतिक हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तानकडून दुसऱ्या दिवशी भारतीय हद्दीत येवून बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न भारतीय वायू दलाने हाणून पाडला. ह्या हल्यात पाकिस्तानच एफ-१६ हे विमान पाडण्यात भारताला यश येताना वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान चालवत असलेलं मिग-२१ विमान निकामी झाल्यामुळे ते पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पडले. युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानात पडणं म्हणजे नरकात जाण्यापेक्षा कमी नव्हत. आणि झालंही तसंच पाकिस्तानच्या हद्दीत पडल्यावर अभिनंदन यांनी सभोतालचे लोक बघितले तर ते वेशभूषेने वेगळे जाणवल्यानंतर त्यांनी समयसूचकता दाखवून "जय माता दि" हा जयघोष केला. ह्यानंतर स्थानिक लोकांच्या भावमुद्रा बघून आपण भारतात नसल्याचं समजून घेतल, त्यानंतर स्थानिक लोकांनी त्यांच्यावर चालून जाण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी आपल्या बंदुकीतून एक राऊंड फायर करून तिथून पळ काढला. आपल्याकडील दस्तऐवज आणि माहिती पाकिस्तानच्या हाती लागू नये म्हणून जवळ असलेली कागद स्वतः खाऊन घेतली आणि राहिलेली कागद नदीत फेकून दिली आणि मगच  स्वतःच समर्पण केलं. ह्या कठीण परिस्थितीत हि समयसूचकता दाखवणं तितकंच कौतुकास्पद आहे. त्यानंतर त्यांना स्थानिकांच्या आणि पाकिस्तानी सैन्याच्या अमानुष रोषाला समोर जावं लागलं. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं आणि त्यांची विचारपूस चालू केली. अशा परिस्थितीत आपलं नाव आणि सैन्यदलाचा नंबर ह्याशिवाय दुसरी कुठलीय माहिती न देण्याचं धाडस अभिनंदन यांनी दाखवलं.

आताच थोड्या वेळापूर्वी अभिनंदन ह्यांना पाकिस्तानने ६० तासानंतर भारताच्या स्वाधीन केल. आतापर्यंतच्या भारतीय युद्धकारवाईत युद्धकैद्याला हस्तांतरित करण्याची हि सर्वात वेगवान कारवाई झाली. पाकिस्तानने ह्या हस्तांतराची कारवाई हि जिनेव्हा जागतिक करारानुसार केली. ह्या करारानुसार युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थितीत समोरच्या भूमीत कुठला सैनिक युद्धाच्या हालचालीत अडकला असेल तर त्याला योग्य ती वागणूक देऊन सात दिवसाच्या आत त्याच्या देशाकडे सोपवन बंधनकारक आहे अन्यथा युद्ध अटळ असत. ह्याच नियमाच्या आधारे अभिनंदन ह्यांना भारताकडे सोपवण्यात आलं.

अभिनंदन पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असताना आपल्या नाव आणि नंबर ह्याशिवाय कुठलीही माहिती न देता आपलं धाडस दाखवत असताना आपल्या येथील अतिउत्साही आणि मूर्ख प्रसारमाध्यम त्याच घर, परिवार, सैन्याची माहिती जगासमोर आणताना दिसत होते. २६/११ च्या मुंबई हल्यात ह्या प्रसारमाध्यमांच्या मुर्खपणामुळे मोठी किंमत चुकवावी लागली असताना आपल्या अतिशहाणपणाचा कळस प्रसारमाध्यमांनी पुन्हा गाठला होता. ह्या वर निर्बंध असणं आवश्यक आहे जेणेकरून सैनिकांचं संरक्षण होणं सोपं होईल.

असो अश्या परिस्थितीत पाकिस्तानातून परतणं म्हणजे दुसरा जन्म झाल्यासारखाच आहे. साऱ्या देशाचं लक्ष लागलेला क्षण म्हणजे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतभूमीत पुन्हा भारतमातेच्या सेवेसाठी दाखल होणार आणि सर्व भारतीयांना त्याचा अभिमान वाटणार. आंतरराष्ट्रीय दबाव असो, तमाम भारतीयांची प्रार्थना असो वा सरकारच्या मुत्सदगिरीच यश असो अभिनंदन भारतात येणं महत्वाचं होत. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच मनापासून मायभूमीत स्वागत आणि अभिनंदन..

जय हिंद.. जय महाराष्ट्र..

डॉ. प्रशांत शिरोडे.

मराठी शिववीर..



जय देव, जय देव, जय शिवराया,
या या अनन्य शरणा, आर्या ताराया.
त्रस्त आम्ही, दिन आम्ही, शरण तुला आलो,
परवशतेच्या पाशी, मरणोन्मुख झालो,
साधू परित्राणाया, दुष्कृती नाशाया,
भगवन भगवतगीता सार्थ कराया या...

शिवरायांची आरती??? थोडं आश्चर्यच वाटलं ना..? आपण तर देवाचीच आरती म्हणतो! मग शिवरायांची आरती का? आणि कोणी लिहिली? शिवाजी महाराज दैवत होते का? ह्या साहजिकच पडलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर... देशासाठी स्वतःला वाहून देणाऱ्या सावरकरांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य शौर्यातून प्रभावित होऊन, त्यांच्या कार्याप्रती आदरपूर्वक नतमस्तक होऊन लिहलेली हि भावपूर्ण आरती.

स्वातंत्र्यवीर सावरकर एक स्वातंत्र्यसैनिक, कवी, लेखक, राजकारणी, हिंदुसंघटक आणि साहित्यिक.. आणि त्यांच्या ह्या सर्व गोष्टीत आपला विशेष प्रभाव निर्माण करणार अभूतपूर्व व्यक्तिमत्व.

अरे हा मी शिवाजी महाराजांबद्दल लिहीत  असताना मध्येच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल लिहायला लागलो. दोन महान व्यक्तींना व्यक्त करताना माझं मन कसं लिहावं? आणि कुठून सुरवात करू? ह्या सारख्या अनेक प्रश्नाच्या शोधात अडकलंय. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर ह्या भारतभूमीच्या दोन महान पुत्रांना शब्दांच्या पुष्पसुमनांनी गुंफण म्हणजे महान यशोगाथेचा गौरव करणं...

माझ्या मराठी बोलू कौतुके,
परी अमृतातही पैजा जिंके,
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. .

संत ज्ञानेश्वरांच्या मराठी भाषेबद्दल कौतुकाच्या ओळींना खरं ठरवलं शिवाजी महाराजांनी. परकीयांच्या आक्रमणामुळे मराठी भाषेत अनेक उर्दू शब्द वापरण्यात येत असताना मराठी भाषेचं प्रथम शुद्धीकरण करून तिला राजभाषेचा दर्जा दिला. सावरकरांनी महाराजांचा हाच आदर्श समोर ठेवून मधल्या परकीय आक्रमणातून मराठी भाषेला शुद्धीकरण करून मायमराठीचा सन्मान मिळवून दिला. माझ्या मराठी भाषेला जरी राजकीय दृष्टया अभिजात दर्जा मिळत नसेल तरी ह्या दोन माहात्म्यांमुळे ती आजतागायत अभिजातच आहे.

महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेल्या रत्नानंच कौतुक करावं तितकं कमीच. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापून परकीयांची आक्रमण उधळवून लावली. सावरकरांनी अन्यायाला वाचा फोडत पारतंत्र्यातून भारतभूमीला मुक्त करण्यासाठी इंग्रजांची सत्ता हलवून लावली.

शिवाजी महाराज म्हणजे शौर्याचा सूर्य तर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे क्रांतीचे सागर. शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्यसंस्थापक, तर  स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे स्वातंत्र्ययोद्धा. शिवाजी महाराज म्हणजे पराक्रमाची यशोगाथा, तर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ. शिवाजी महाराज म्हणजे दैवत..तर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे दैवताची सावली...

देव, देश आणि धर्मासाठी आपल्या पराक्रमाची परिसीमा पार करणारे शिवाजी महाराज अनेकांना आदर्शस्थानी आहेत आणि त्या आदर्शांना जपणारे सावरकरांसारखे महान व्यक्ती ह्या भूमीत जन्माला आलेत ते ह्या भूमीच भाग्यच म्हणावं लागेल.  सावरकरांनी आयुष्य जगताना शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून भारतभूमीला परकीयांच्या गुलामगिरीतून मूक्त केल. आदर्शांचा महामेरु शिवाजी महाराज आहेत आणी ह्या आदर्शांना प्रत्यक्षांत आत्मसात करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. भारतभुमीला लाभलेली ही शूरवीरांची श्रुंखला नेहमीचं आदर्शस्थानीं राहों हिच मराठी भाषा दिनी शिवचरणी प्रार्थना. मराठी भाषा दिनाच्या मनोभावे
शुभेच्छा...

जय हिंद.. जय महाराष्ट्र..

डॉ. प्रशांत शिरोडे.

दैवत छत्रपती...



महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज कि ... म्हंटल्यावर आपसूकच हृदयातून "जय" मुखात येणार नाही असा एकही व्यक्ती नसेल. १८ पगड जाती आणि १२ बलुतेदार मिळून स्वराज्य प्रत्यक्षात आणणारे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणूनच महाराष्ट्रातील मराठमोळ्या माणसाच्या हृदयस्थ आहेत. मातीसाठी लढणारे शिवराय कधीच जातीसाठी लढले नाही कारण स्वराज्य हे अदभूत सुवर्णस्वप्न त्यांना प्रत्यक्षात उतरवायचं होत.

जगाच्या पाठीवर अनेक सम्राट, राजेमहाराजे झाले आणि त्याची दखल इतिहासानसुध्दा घेतली पण ४०० वर्षानंतर आत्मियतेने आणि सन्मानाने ज्यांना रयतेच प्रेम भेटतय ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज होय. असा कुठलाच माणूस नाही ज्याला शिवरायांच्या विचारांचा आदर नाही. ज्यांनी शिवराय जाणले त्यांनी ते हृदयस्थ केले. महाराज देव नव्हते पण देवापेक्षा कमी नव्हते. महाराजांचा आदर्श ज्यांनी मनाशी ठेवला त्याच्या वाटेत अडथळा येणं अशक्य आहे. आपल्या उच्चशक्तीला बळ देण, आपल्यातील कमकुवत बाजूला बलस्थान करण, आलेल्या संधीच सोन करण आणि आपलं स्वप्न पूर्ण होत नाही तो पर्यंत हार न मानणं हे स्वराज्य घडवणाऱ्या शिवरायांकडून शिकाव. शिवाजी महाराजांच्या कुठल्याही एका विचाराला मनस्वी स्वीकारल तरी यशाची पायरी चढायचं सोपं होईल.

आज शिवरायांची जयंती.. शिवजयंती हा उत्सव आहे ज्याला कुठल्या धर्माचं, कुठल्या जातीचं किंवा कुठल्या प्रांताच अधिकारत्व लाभलेलं नाही. आपल्या स्वराज्याच त्या काळी बघितलेलं स्वप्न आजच्या काळातही त्याच सन्मानानं स्वीकारलं जात, पण दुर्दैव म्हंटल तर त्याला तितक्या आत्मियतने आत्मसात करताना दिसत नाही. शिवजयंती हि विचारांची व्हावी, शिवजयंती हि किल्लेसंवर्धनसाठी व्हावी, शिवजयंती स्वराज्य प्रेरणेसाठी व्हावी, शिवजयंती माणुसकीच्या बंधनासाठी व्हावी, शिवजयंती जगाच्या कल्याणासाठी व्हावी...

"स्पर्श" ह्या आजच्या वर्षांपूर्वी सुरु केलेल्या ब्लॉगच्या शृंखलेची अर्धशतक पूर्ण होताना ५० वा ब्लॉग शिवचरणी अर्पण करून छत्रपती शिवरायांना जन्मदिनी मानाचा मुजरा करतो..

जय शिवराय...

डॉ. प्रशांत शिरोडे.

शहीद...



काल देशभर प्रेमाची लाट असताना भारतभूमीवर प्रेम करणाऱ्या तिच्या लाडक्या पुत्रांवर आतंकवादाने हल्ला केला. जम्मूकाश्मीरमधील पुलवामाच्या अवंतिपुरा येथील सीआरपीफ च्या जवानांवर अमानुष हल्ला झाला आणि ह्या दुष्कृत्यात भारतमातेच्या ४४ पुत्रांना वीरमरण आलं.

स्वातंत्र्यापूर्वी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आता स्वातंत्र्यानंतरही भारतमातेच्या संरक्षणार्थ अनेकांना आहुती द्यावी लागतेय. भारतीय जवान आपल्या डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस शत्रूराष्ट्रांच्या हालचालींवर लक्ष ठेवून पहारा देत असतात. अनेक सरकार आलीत आणि अनेक सरकार गेलीत पण जम्मूकाश्मीर सारख्या संवेदनशील भागात अशांतता शांत होण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. राजकारण तर खूप झालं पण आता कृतीची गरज आहे. अजून किती जवान आपल्या प्राणांची आहुती देणार? अजून किती परिवार रस्त्यावर येणार? अजून किती छोटे तान्हुले आपल्या बापाला मुकणार? अजून किती मायबहिणी विधवा होणार? बस आता हे असह्य होतंय... आता हा प्रश्न निकाली काढावा लागणार..

राजकीय शक्तींनी एकत्र येऊन ह्या गोष्टीची दाहकता समजून घेण्याची नितांत गरज आहे. जवान भारतभूमीच संरक्षण करतात, आपण त्यांच्या संरक्षणाची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. अनेक मान्यवरांनी आपल्या भावना प्रखरतेने व्यक्त केल्या, त्यात "आपण सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून या हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ आहे " ह्या राज ठाकरेंनी व्यक्त केलेल्या भावनेची सरकारने आणि सर्व राजकीय पक्षांनी दखल घेणं तितकंच महत्वाचं आहे.

माझ्या भारतभूमीच्या ह्या वीरपुत्रानंच हे वीरमरण आता वाया जायला नको. माझ्या भारतभूमीच्या जवानांना दीर्घायुष्य लाभो आणि असा आघात पुन्हा कधीही न होवो हि ईश्वरचरणी प्रार्थना. कालच्या हल्यात शाहिद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली..

डॉ. प्रशांत शिरोडे.

कृषिकन्या ..




बापाचं काळीज मुलीला समजत हे म्हंटल जात ते काही खोटं नाही. आपला बाप काबाडकष्ट करतो आणि त्या कष्टाला पाहिजेल तसं फळ भेटत नाही, हे नेहमीच झालय हे बघवलं जात नाही. शेतकऱ्याची ५० वर्षांपूर्वी जी स्थिती होती ती आजही तशीच आहे. शेतकऱ्याच्या पोटच्या मुलीला जे कळत ते सत्ताधार्यांना आजपर्यंत का कळलं नाही? का कळूनही त्याला दुर्लक्षित  करण्यात येत? शेतकरी आत्महत्या करतो, शेतकरी आंदोलन करतो, शेतकरी संपावर जातो, पण त्याच्या कुठल्याही मागणीला ठोस पर्याय शोधला का जात नाही?

कृषिकन्या लिहण्याच कारण म्हणजे नगर जिल्ह्यातील पुणतांबा गावातील शुभांगी जाधव, निकिता जाधव आणि पूनम जाधव ह्या शेतकऱ्यांच्या मुलींनी बापाच्या काळजासाठी आणि सरकारने दीड वर्षांपूर्वी शेतकरी संपावर गेलेल्या आंदोलनाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अन्नत्याग केलाय. आज प्रसारमाध्यमात चालू आहे त्यातल्या एका कन्येची तब्येत खूप खालावली आहे, पण तिने दवाखान्यात जाण्यास मनाई केली आहे. इतकं भयानक असतानाही सरकारला अजून जाग येताना दिसत नाही. दुर्दैवच म्हणावं लागेल कि कृषिप्रधान देशात कृषीकन्येला अन्नत्याग करावा लागतोय.

गेल्यावर्षी एका कृषीकन्येने सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना म्हंटल होत "सरकार मायबाप आमचा बाप आमच्या लग्नासाठी तरी जिवंत राहू द्या". लहानपणापासून लेकीच्या लग्नाचं स्वप्न रंगवणाऱ्या शेतकरी बापाला लेकीच्या लग्नासाठी पैसा नसल्यामुळे आत्महत्या करावी लागते हे कृषिप्रधान देशाचं दुर्भाग्य म्हणावं तितकं कमीच. पोटच्या पोरांचं शिक्षण करणं शेतकरी राजाला पैश्यामुळे जमत नाही, पोरांच्या इच्छा, स्वप्न पूर्ण करता येत नाही. सगळं काही जणू जाणूनबुजून शेतकऱ्याच्या उरावर ढकललं जातंय अस समजायला काही हरकत नाही.

जाग येऊ दे मायबाप सरकार, तुमच्या मुली जश्या लाडाकोडात वाढवून त्यांच्या मनातील विश्व दाखवण्याचं स्वप्नं असत तसंच शेतकऱ्याचं  सुद्धा असत. थोडं माणुसकीच्या आरशातून बघा म्हणजे शेतकऱ्यातला माणूस सत्तेपलीकडे तुम्हालाही दिसेल आणि त्या कृषीकन्येची तळमळही कळेल.

डॉ. प्रशांत शिरोडे.

गर्व से कहो..

प्रभु श्रीराम काल अनेक वर्षाच्या वनवासानंतर जन्मस्थळावर मोठ्या सम्मानाने विराजमान झाले.. हया दिवसाच खर श्रेय जात ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहे...